छावा-सावरकर-ब्रिगेड आणि हिंदुत्व


नव्या पिढीच्या लोकांचं जातीयवादी मानसिकतेला समर्थन कमी होत चालल्याचं पाहून जुने विषारी प्रयोग करण्याचा आटोकाट प्रयत्न संभाजी ब्रिगेड ही संघटना व तिच्या विचाराने प्रेरित झालेले ब्रिगेडी लोक करत आहेत. छावा सिनेमा हे त्यासाठी एक tool म्हणून वापरला जातोय. अनेकांना हे लोक नेमकं काय करतात, कशासाठी करतात याची माहिती नसल्याने अनेक लोक संभ्रमात जात आहेत. अशावेळी काही गोष्टी पुन्हा एकदा सांगणे आवश्यक झाले आहे. 

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांचे व विशेषतः हिंदुत्वाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचे जुने लिखाण उकरून बाहेर काढले जात आहे, ज्यात कालसापेक्ष चुका आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या हिंदुपदपादशाही पुस्तकातील हे चित्र बघा:


या छत्रपती संभाजी महाराजांना अयोग्य सेनानी, संयम नसलेला व व्यसनाधीन म्हंटलं आहे. त्याशिवाय असेच काहीसे उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी लिहिलेल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातही केलेले आहेत. त्याशिवाय राम गणेश गडकरी, व इतरही अनेक नाटककारांनी अशाच प्रकारचे उल्लेख आपापल्या साहित्यात केले आहेत. यावर कसलेही स्पष्टीकरण नसून हे सर्व उल्लेख निर्विवाद चुकीचे आहेत. परंतु, निष्कर्ष काढण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

छत्रपती संभाजी महाराज व चुकीचा इतिहास :

छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाई यांच्यात छत्रपतीपदावरून गट पडले होते हे सर्वांना ठाऊक आहे. सोयराबाई गटातील प्रमुख लोक जसे की अण्णाजी दत्तो (अनाजी पंत), हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी चिटणीस व इतर काही मंत्री होते. त्यातील काहींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जीवघेणे कटकारस्थान केले असल्याने संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. कोणत्याही आदर्श राजाने हेच करणं अपेक्षित होतं. या घटनेत ज्यांना शिक्षा मिळाली ते मंत्री ब्राह्मण जातीचे, चिटणीस हे CKP (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) व हिरोजी फर्जंद हे मराठा जातीचे सरदार होते. इथे जात मुद्दाम सांगतोय. छत्रपती संभाजी महाराजांनी ब्राह्मण आणि मराठा जातिच्या सहकाऱ्यांना कटकारस्थान करण्याची शिक्षा दिली होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 

अनाजी पंतांना आणि चिटणीस वगैरे यांना शिक्षा देण्यामागे ते ब्राह्मण आणि कायस्थ आहेत हे कारण नव्हतं. त्याच बरोबर हिरोजी फर्जंद यांना शिक्षा देण्यामागे ते मराठा आहेत हेही कारण नव्हतं. छत्रपती परंपरेत कोणीही जातीय ओळख लक्षात घेऊन कसलीही शिक्षा केलेली नाही. मात्र स्वराज्याच्या हितासाठी नातेवाईकांना सुद्धा सोडलेले नाही हे लक्षात घ्या. 

(ब्रिगेड नेहमी या इतिहासाचा वापर ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यासाठी करत आली आहे. अनाजी "पंत" हे रूपक आजही ब्राह्मण समाजच्याच नेत्यांसाठी सर्रास वापरलं जातं, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होतो. त्याच बरोबर ब्राह्मण समाजाच्या संबंधित कोणत्याही कार्यक्रमाच्या व्हीडिओ, फोटोवर भटुकडे, अनाजी पंतांच्या औलादी असा द्वेष करणाऱ्या लोकांची प्रेरणा असाच जातीयवादी इतिहास असू शकतो.)

पण आता इतिहासात पुन्हा एकदा मागे जाऊ. हत्तीच्या पायाखाली देऊन तो विषय संपलेला दिसत नाही. कारण त्या दोषींपैकीच चिटणीसच्या नातवाने म्हणजे मल्हार रामराव चिटणीस याने लिहिलेल्या चिटणीस बखरीत संभाजी महाराजांना दारूच्या अधीन गेलेला, अविचारी व मदांध राजा म्हंटलेलं आहे. ही बखर संभाजी महाराजांच्या वीरगतीच्या 100 हुन अधिक वर्षांनी लिहिल्या गेलेली आहे. त्याआधी फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच व्यापाऱ्याने सुद्धा अशाच प्रकारचा मजकूर लिहिला आहे. परंतु तेव्हा इतिहास संशोधन ही ज्ञानशाखाच भारतात विकसित झालेली नसल्यामुळे तशा बखरींमधून लिहिलेला इतिहासच लोकांमध्ये प्रचलित राहिला. इंग्रजांनीही इतिहास हा जातीय दृष्टीने पुढे नेण्यात कसलीही कसर सोडली नव्हती.

मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर संभाजी महाराजांची बदनामी करणारा प्रचलित इतिहास पुन्हा एकदा संशोधन करून खोडून काढण्याचं काम वा.सी. बेंद्रे, कमल गोखले व सदाशिवराव शिवदे यांच्यासारख्या इतिहास अभ्यासकांनी केलं. पण हे काम होण्यापूर्वी सर्व जातीचे व सर्व विचारांचे लोक जो इतिहास वाचत होते, त्यानुसार संभाजी महाराज हे राज्य करण्यास अयोग्य, व्यसनाधीन वगैरे आहेत असाच सर्वांचा समज होता. मुळात यामागे कारण असलेल्या मल्हार चिटणीस ने तशी बखर सूडबुद्धीने लिहिली या काही इतिहास अभ्यासकांच्या दाव्यात नक्कीच तथ्य वाटते. पण ही सूडबुद्धी त्याच्या कायस्थ जातीमुळे नसून त्याच्या पूर्वजला मिळालेल्या शिक्षेतून आलेली आहे, हे कोणालाही कळेल. 

उदा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आतंकवादी ओसामा बिन लादेनला मारण्याचा निर्णय घेतला. मग ओसमच्या मुलांनी जर आज बराक ओबामा विरोधात ब्लॉग लिहिला, तर ते ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम विचारामुळे असेल की वैयक्तिक कारणांनी? ज्यांना हे काम ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम वाटत असेल त्यांना ब्रिगेड मध्ये मोठ्या पदावर लेखक म्हणून जबाबदारी मिळू शकेल.

पण चिटणीसचा हा असत्य इतिहास महाराष्ट्रावर फार मोठे आघात करणारा ठरला. सुमारे 100 वर्ष पूर्ण महाराष्ट्र चुकीचा इतिहास ऐकत व वाचत होता. 1960 ला वा सी बेंद्रे यांनी पहिलं संशोधन संभाजी महाराजांच्या चरित्रावर केलं. त्यानंतर कमल गोखले (1971) यांनीही आपलं संशोधन प्रकाशित केलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास समाजाला कळू शकला. 

आता संभाजी ब्रिगेड चिटणीस च्या चुकीची शिक्षा संपूर्ण ब्राह्मणसमाजाला देण्याचा कायम छुपा प्रयत्न करत असते. तर त्या हिशोबाने बेंद्रे व गोखले ज्यांनी ती ऐतिहासिक चूक दुरुस्त केली, तेही ब्राह्मणच होते; मग त्यांच्या कामगिरी चं श्रेयही ब्रिगेड संपूर्ण ब्राह्मण समाजाला देताना कधी दिसली आहे का? अर्थातच नाही. कारण ब्रिगेडचा एककलमी अजेंडा फक्त ब्राह्मण समाजातील एकेक महापुरुष पकडून त्यांना टार्गेट करणं हाच आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, संघाच्या गोळवलकरांनी, व अनेक नाटककारांनी लिहिलेली पुस्तके ही 1960 पूर्वीची म्हणजेच आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांनी लिहिलेल्या इतिहासात त्याच गोष्टी आहेत ज्या चुकीच्या आहेत. पण चुकीच्या इतिहासावर आधारित लेखन करणारे न सावरकर हे एकटे महापुरुष आहेत, न हा एकमेव प्रसंग. 

उदा.शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात महात्मा फुले यांनी शिवरायांना अक्षरशत्रू(अडाणी) म्हंटले आहे. समर्थांना शिवरायांचा गुरू म्हणलेलं आहे. पण यात महात्मा फुले यांची काहीही चूक नसून त्याकाळी इंग्रज इतिहासकार ग्रांट डफ यानेमहाराजांना अडाणी म्हणणारा इतिहास लिहिला होता. तोच फुले यांनी वाचला आणि स्वतःचं मत बनवलं. फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिल्याच्या कित्येक वर्षानंतर श्रीशिवभारत हा प्राचीन ग्रंथ सापडला व त्यात हा पुरावा मिळाला की छत्रपती शिवाजी महाराज अशिक्षित नव्हते. पण त्याआधीच महात्मा फुले यांचा मृत्यू झाला होता. परंतु कदाचित महात्मा फुले आणि ग्रांट डफ यांची जात ब्राह्मण नसल्यामुळे कधी कोणता ब्रिगेडी वक्ता, लेखक याबद्दल चकार शब्दही काढत नाही. 

      (शेतकऱ्यांचा आसूड, महात्मा फुले यातील चित्र)


हिंदुत्वाचा विचार हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचंच प्रतिबिंब असून महाराजांनी आज्ञापत्रात सांगितलं होतं "कंटकपुष्पवृक्षावरील कंटकाचा परित्याग करून पुष्पच तेवढे अंगीकारावे" म्हणजे काटे आणि फुल एकाच झाडावर येतात तेव्हा आपण फक्त फुलं वेचून काटे बाजूला करतो, तसंच माणसांच्या चांगल्या गोष्टी स्वराज्यकार्यात जोडाव्यात असा त्याचा मथितार्थ आहे. त्याच विचाराला अनुसरून महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांनी समाजासाठी जे जे उत्तम कार्य केले त्यापासून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या काळात प्रचलित इतिहासानुसार जे चुकीचं इतिहासलेखन त्यांच्याकडून झालं आहे, ते त्यांना कसलाही दोष न देता दुरुस्त करावं हाच हिंदुत्वाचा अजेंडा आहे. मात्र ब्रिगेड याच्या अगदी उलट वागून फक्त वाद होईल असेच विषय पुढे आणताना आणि विशेषतः ब्राह्मण महापुरुषांचीच सो कॉल्ड चिकित्सा करताना दिसते.

सावरकरांना यथेच्छ शिव्या देऊन त्यांची पुस्तकं जाळण्याचा सल्लाही ब्रिगेडी व so called पुरोगामी देत असतात. वस्तुस्थिती तर ही आहे, की संभाजी महाराजांची बदनामी खोडुन काढणाऱ्या कमल गोखले यांना स्वतः सावरकरांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे. कमल गोखले यांचे पती श्री. पू. गोखले यांनी स्वतःच्या पुस्तकात हा प्रसंग लिहून ठेवला आहे, ज्यात सावरकर स्वतः कमलताईंना व्यवस्थित संशोधन करण्यास व संशोधन पूर्ण झाल्यावर मलाही सांग असं कुतूहलाने सावरकर म्हणतात. तसेच स्वतःचं मतही सांगतात की, एवढं दुर्दम्य साहस करणारे, बलिदान देणारे संभाजी महाराज व्यसनाच्या आहारी गेलेले असतील असं वाटत नाही.

त्याशिवाय स्वतः सरसंघचालकांनी 2018 मध्येच बंच ऑफ thoughts मधील उल्लेख आता relevant नसल्याचे स्वतःहून सांगितले होते. 


आता हे सर्व सत्य जाणून आणि शेकडोवेळा स्पष्ट करूनही तेच ते दावे वारंवार केले जातात. यातून ही गोष्ट स्पष्ट आहे, की असा विचार पसरवणाऱ्या लोकांना इतिहास, व त्यातून काही शिकवण घेण्यात कसलाही रस नसतो. फक्त समाजात जातीत तेढ वाढणाऱ्या अशा विधानात त्यांना रस असतो. याउलट हिंदुत्व ही विचारधारा सर्वसमावेशक व सर्व जातीच्या, पंथाच्या व अगदी जात न मानणाऱ्या लोकांनाही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या धाग्यात जोडून ठेवते. 

यावर ऐतिहासिक स्पष्टीकरण देऊन काहीही साध्य होणार नाही. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न केले जातील तेव्हा उघडपणे त्यांना "द्वेष पसरवणारे लोक" हे स्पष्ट सत्य सर्वत्र बोललं पाहिजे. हे काम फक्त ब्राह्मण समाजाचं नसून सर्व हिंदूंचं आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही एका जातीला टार्गेट केल्यावर जेव्हा इतर जातींचे लोक आधी विरोध करतील तेव्हाच असे विषारी विचार समाजातून नष्ट होतील आणि सर्व जातींच्या लोकांना सन्मानाने जगण्याचा संवैधानिक अधिकार उपभोगता येईल. 

मात्र, हिंदुत्ववादी आणि विशेषतः ब्राह्मण समाजातील लोक स्वतःच या बाबतीत गप्प बसताना दिसतात. जे नॉन ब्राह्मण हिंदू लोक, ब्रिगेडच्या फुटीर मांडणीला विरोध करतात, त्यांना भटांचा गुलाम, भटाळलेला, आणि असे अनेक लेबल लावले जातात. मागच्या काही काळात या जातीयद्वेषाची झळ ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरही जातींना बसू लागली आहे. त्यावरही लवकरच लिहिण्याचं ठरवलं आहे. कारण अशाप्रकारच्या चिंधीगिरीला घाबरून राहणारा समाज भविष्यातील मोठ्या गुलामगिरीसाठीच स्वतःला तयार करतोय हेच कटू सत्य आहे. शेकडो वर्षांची मानसिक गुलामगिरी झटकून टाकण्याची व छत्रपतींचा सर्वसमावेशक विचार स्वीकारण्याची हीच वेळ आहे. पण त्यासाठी हिंदू समाज तयार आहे का?

✍️प्रथम उवाच


Post a Comment

1 Comments

  1. अतिशय योग्य पद्धतीने आपण लिखाण करून पुरोगामी डोळे उघडलं आहे

    ReplyDelete