हिंदुत्व की भाजप?

सध्या देशभरात हिंदुत्वाची चळवळ hit होत आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे पक्ष सत्तेतही येत आहेत, आणि विरोधी पक्षातही प्रमुख स्थान मिळवत आहेत. एकेकाळी पुरोगामी चळवळीत पाय रोवून बसलेले नेतेही विचारधारेशी तडजोड करून हिंदुत्वाच्या विचाराशी जुळवून घेऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. सेक्युलर पक्षातील लोकही कधी नव्हे ते निवडणुकीच्या काळात मंदिरांत फिरताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी पाहून ही गोष्ट स्पष्ट होते की सामान्य भारतीय मतदार हिंदुत्वाकडे आकर्षित होत आहे. 

जिकडे सत्ता असते, तिकडे सर्व लोक जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. सत्ताधाऱ्यांचे विचार चित्रपट, गाणी, सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरतात. त्यानुसार सर्वांना आता स्वतःची हिंदू ही ओळख दाखवण्याची, मिरवण्याची इच्छा होत आहे. अनेकांना हिंदुत्वाचा कार्यकर्ता व्हायचं आहे. अशा वेळी हिंदुत्वाचा मूळ विचार समजून घेणं आणि त्याची आजच्या context ला अनुसरून पुनर्मांडणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी काही जुन्या गोष्टी नीट समजून घेऊ.

हिंदुत्व सावरकरांनी तयार केलं आहे का?

नाही. सावरकरांनी हिंदुत्व ही संकल्पना तयार केलेली नाही. त्यांनी तिचा शोध लावलेला आहे. ज्याप्रमाणे न्यूटन ने गुरुत्वाकर्षण तयार केलेलं नाही, त्याने तो सिद्धांत मांडला, formulate केलं, अगदी तसाच हा प्रकार आहे. न्यूटन ने फॉर्म्युला लिहिण्या पूर्वीही वस्तू जमिनीवरच पडत असत. मात्र न्यूटनच्या गणितीय मांडणीमुळे संपूर्ण अंतराळात गुरुत्वाकर्षण कसं काम करतं हे मोजता आलं, उपग्रह पाठवता आले, आपल्या गरजेनुसार यंत्रनिर्मिती करण्यासाठी त्या गणितीय मांडणीचा उपयोग झाला. त्याच प्रमाणे सावरकरांचा राजकीय हिंदुत्वाचा फ्रेमवर्क अनेक संघटनांनी आणि नेत्यांनी वापरलेला असून त्याचे सुखद राजकीय परिणाम आपण आज पाहत आहोत.

आपल्याला जो प्रदेश भारत नावाने दिसतो, त्याहून थोड्या मोठ्या प्रदेशावर भारताच्या संस्कृती मुळे एक वेगळेपणा आहे जो इतर जगापासून भारताला वेगळं बनवतो. यात काही सांस्कृतिक मूल्य आहेत, इतिहास आहे, वागण्या बोलण्याच्या सवयी आहेत, एक उपजत असलेलं स्वातंत्र्य आहे. या सर्व गोष्टींना एका फ्रेमवर्क मध्ये आणून सावरकरांनी हिंदुत्वाची चळवळ सुरू केली. ही चळवळ प्रामुख्याने राजकिय सत्ता मिळवण्याची व हिंदू, बौद्ध, शीख, जैन समाजाला संरक्षक कवच देण्याची होती. थोडक्यात हिंदु हितासाठी सजग असलेल्या लोकांना राजकीय सत्ता हवी, हा विचार सविस्तरपणे सावरकरांनी मांडला. आज तो विचार देशभर पसरतोय, हिंदूंच्या विरोधात काम न करणारा पक्ष सत्तेत आहे, हे सर्व नक्कीच आनंद होण्यासारखं आहे. 

मात्र ही राजकीय सत्ता नेमकी कशासाठी मिळवायची होती? काय फरक पडतो देश कोणीही चालवला तर? 

हिंदुत्व हे वैचारिक स्वातंत्र्य जपणाऱ्या भारतीयतेचं सुरक्षा कवच आहे. हिंदुत्व सत्तेत असेल तर वेगवेगळ्या पंथ संप्रदायाचे लोक आपापली मते मांडू शकतात, मुक्तपणे वादविवादही करू शकतात, प्रसंगी संघर्ष सुद्धा करू शकतात; पण आपलं मत समोरच्यावर लादू शकत नाहीत. ह्या मुक्त हिंदुत्वाला सर्वात मोठा धोका authoritarian विचारांपासून आहे. माझा ईश्वर हाच खरा, माझा प्रेषित हाच खरा, असे हट्टी आणि आक्रमक विचार ज्या अब्राहमिक (ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू) पंथांमध्ये येतात, त्यांना भारतात राहताना ही गोष्ट प्रकर्षाने पाळावी लागेल की त्यांचा देव सर्वश्रेष्ठ आहे "हे त्यांचं मत आहे". त्याला absolute truth म्हणून जर कोणी establish करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला विरोध होणार. ते इतर पंथांवर वैचारिक टीका करू शकतील, मात्र त्यांना तशी टीका त्यांच्या मजहबी विचारांवर सुद्धा सहन करावी लागेल. आणि ही गोष्ट सर्व पंथांना लागू होईल हे ठामपणे सांगणारा समाज घडवणं हा राजकीय हिंदुत्वाचं एक मूलभूत हेतू आहे. 

असा समाज घडवण्याचं स्वप्न सावरकरांनी पाहिलं, पण हे स्वप्न पाहणारे सावरकर पहिले नव्हते. हे तत्त्व महर्षी वाल्मिकी पासून छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत, आदी शंकराचार्यांपासून-स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि वीर सावरकरांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांनी पोषित केलेलं आहे. या परम तत्वाच्या विरोधात जाणारे काही कायदे अलीकडच्या काळात संविधानात जोडण्यात आले. जसं की सर्व शिक्षा अभियानात धर्माच्या आधारावर होणारा शैक्षणिक भेदभाव, वक्फ बोर्डाला जमीन हडपण्याचे मिळालेले अमर्याद अधिकार, मुस्लिम समाजाला वेगळे कायदे (चार लग्न करणे, पोटगी न देणे, महिलांना तलाक चा अधिकारच न देणे, हलाला करणे, 18 वर्षांपेक्षा कमी वयात मुलीचं कायदेशीर लग्न करणे), हिंदू श्रद्धा व देवतांचा सतत अपमान, जबरदस्तीने धर्मांतर, मंदिरांवर टॅक्स लावून इतर धार्मिक स्थळांना पैसे वाटणे, इत्यादी.

या गोष्टींचा प्रखर विरोध करण्याची हिंमत भारतीय सेक्युलर पक्षांमध्ये नाही हे सावरकरांनी केलेलं prediction खरं ठरलं. आणि त्यामुळे तयार झालेली अन्यायाची भावना, असंतोष, भ्रष्टाचार, या सर्व गोष्टींमुळे हिंदुत्वाच्या विचाराला सत्ता प्राप्त झाली. आता त्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौजही वेगात तयार होत आहे. पण या कार्यकर्त्यांना हा प्रश्न कधी न कधी पडेलच, की आपण काम नेमकं कशासाठी करतोय? भाजपला सत्तेत बसवण्यासाठी, हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी, की आपल्या हिंदू समाजाच्या हितासाठी, की अजून कशासाठी?

सावरकरांनी वारंवार हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे असं नमूद केलंय. पण तो त्यांच्या काळातील वातावरणानुसार त्यांनी मांडलेला मुद्दा होता. स्वतः सावरकर देश-काल-परिस्थितीनुसार स्वतःला अद्यतनित करा असं सांगतात. हे अधोरेखित करून, सावरकरांचेही विचार आज शंभर वर्षानंतर, extend करणे गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे फोन मध्ये इन्स्टॉल केलेल्या app ला अपडेट करण्याची गरज भासते, त्याचप्रमाणे आजच्या राजकीय हिंदुत्वाला एका सोशल अपडेट ची गरज आहे. त्यालाच मी सामाजिक हिंदुत्व म्हणत आहे.

सामाजिक हिंदुत्व म्हणजे नेमकं काय?

समाजात समरसता निर्माण होईल, यासाठी बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी पुढाकार घेणं, आणि जातीय-धार्मिक संघर्षात सत्याची, न्यायाची बाजू निर्भीड होऊन ठामपणे घ्यायला शिकणं म्हणजे सामाजिक हिंदुत्व.

राजकीय हिंदुत्वात संघर्ष करून संपूर्ण राजकीय सत्ता मिळवणे हे ध्येय आहे, तर सामाजिक हिंदुत्वात समाजावर प्रेम करणारा हिंदू माणूस घडवणं हे ध्येय आहे. राजकीय आणि सामाजिक हिंदुत्व हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, त्यांचा एकमेकांना प्रचंड उपयोग होऊ शकतो; मात्र काही ठिकाणी विरोधाभासही जाणवू शकतो. 

उदा. राजकीय हिंदुत्वाच्या विचाराने आपल्याला पूर्वजांच्या पराक्रमाला आठवायला शिकवलं. महाराणा प्रताप, शिवछत्रपती, आणि अशा अनेक पराक्रमी महापुरुषांचे कार्य ऐकून वैचारिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं रक्त सळसळतं, हा राजकीय हिंदुत्वाच्या मांडणीचा प्रभाव आहे. पण स्वराज्यासाठी जीव देणाऱ्या मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाची, लेकरांच्या भविष्याची काहीही काळजी करायची गरज पडणार नाही ही शिवरायांची प्रेमळ गॅरंटी आपण विसरलो आहोत का? 

स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कापणारे शिवबा आपल्याला माहीत आहेत, पण त्यांनी त्या पाटलाच्या निर्दोष बायका-पोरांचा खर्च सुद्धा कसा manage करायचा हे तेव्हाच ठरवून दिलं होतं. धारातीर्थी पडलेल्या तान्हाजीरावांच्या मुलाचं लग्न स्वतः लावणारे आणि बाजीप्रभूंच्या कुटुंबावर आर्थिक अडचण न येऊ देणारे प्रेमळ महाराज आजच्या हिंदू समाजाला हवे आहेत. 

भारतीय सैन्याच्या शहीद सैनिकांच्या विधवांसाठी मुंबईत फ्लॅट देण्याची "आदर्श योजना" काँग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्र सरकाने आणली होती. त्यात भ्रष्टाचार झाला आणि अशोक चव्हाण यांच्यावरही त्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा या केससाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे अशोक चव्हाण आज हिंदुत्ववादी भाजप मध्ये सामील झाले आहेत. लगोलग त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. आदर्श घोटाळ्याची केस मात्र 14 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. सामाजिक हिंदुत्व अशा राजकीय गोष्टींच्या प्रखर विरोधात असेल. 

पश्चिम बंगाल मध्ये भाजपच्या महिला उमेदवाराची बलात्कार करून हत्या करण्यात आली, कर्नाटकात शिवमोग्गा इथेही भाजपची सत्ता गेल्यावर काही राजकीय हत्या झाल्या, केरळ मध्ये किमान डझनभर RSS च्या स्वयंसेवकांचे खून झाले आहेत. एखादा तरी आंदोलक त्याठिकाणी उपोषणाला बसलेला दिसला का? हे जर झालं असतं, तर संपूर्ण सामाजिक हिंदुत्वाची शक्ती भाजपमागे ठामपणे उभी राहिली असती. पण असलं काहीही घडलं नाही. ज्या ज्या ठिकाणी अशी आवश्यक असलेली राजकीय दखल घेतली जात नाही, त्या त्या ठिकाणी सामाजिक हिंदुत्व कमकुवत होत असते. समाजात नकारात्मक संदेश जातात जे राजकीय सत्तेलाही नुकसानच करतात. ही सर्व इतर राज्यातील उदाहरण सोडाच, मीडिया रिपोर्ट्स नुसार आर्थिक विवंचनेतून तुकाराम महाराजांचे वंशज महाराष्ट्रात आत्महत्या जर करत असतील, तर किमान ह्या दुःखद घटनेनंतर तरी एखादी ठोस आर्थिक विकास योजना त्यांच्या नावाने शासनाला सुरू करता आली नसती का? पण यासारखे प्रश्न कायम अनुत्तरित राहतात.

राजकीय हिंदुत्वाला सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांची किंमत तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत स्वतः सामाजिक हिंदुत्व समाजाला सांगितले जाणार नाही. जेव्हा हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांचा हत्येच्या, धारकऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या येतात, तेव्हा त्या घटनेत पीडित व्यक्तीचे पूर्ण कुटुंब होरपळत असते. त्यांच्या जखमेवर आवश्यक तेवढी आर्थिक फुंकर मारली गेली नाही, तर कधी न कधी त्या कार्यकर्त्यांचे वंशज, त्यांचे वंशज, तांदळाच्या पोत्यासाठी धर्मांतर करतील तेव्हा आपल्या पोटदुखीचा उपयोग नाही. कारण धर्मासाठी आहुती देणाऱ्यांच्या पोटात दोन घास जात आहेत की नाही हे पाहण्याचं आपलं कर्तव्य आपण एक समाज म्हणून विसरत आहोत.

पण सामाजिक हिंदुत्वाचा अर्थ फक्त राजकीय लोकांच्या उणिवा दाखवणे असू शकत नाही. अनेकदा सत्तेत राहण्यासाठी काही न पटणाऱ्या गोष्टी सर्वच राजकीय पक्षांना कराव्या लागतात. राजकीय हिंदुत्व हे सामाजिक हिंदुत्वाच्या निर्भय प्रचारासाठी आवश्यक आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. 

त्यासाठी सामाजिक चळवळीत वेगवेगळ्या आयमांची (dimensions) ची गरज आहे. वर उल्लेख केलेला स्वयंभू हिंदू समाज निर्माण करणं ही समाजिक चळवळीची जबाबदारी आहे, "राजकीय पक्षांची ती जबाबदारी नाही". मग असा समाज कसा तयार करणार?

1. लोकाभिमुख संघटना उभारणे : अमुक तमुक महापुरुषांचं नाव घेऊन त्यांचा इतिहास पोहचवणाऱ्या संघटना स्थापन करण्याचा आणि भावनिक आवाहन करण्याचा काळ आता राहिलेला नाही. या संघटनांचे कार्य आजही गरजेचे आहेच, मात्र आजच्या काळात ते कार्य पुरेसे मात्र नाही. येणाऱ्या पिढ्या कॅट लव्हर, जिम फ्रीक, बिच पर्सन वगैरे शब्दांमध्ये जास्त रस घेणाऱ्या आहेत. त्यांची जडणघडण ज्या शैक्षणिक वातावरणात होत आहे, ते वातावरण बदलणं नक्कीच गरजेचं आहे. मात्र त्यासाठी त्या पिढीला दोष देऊन उपयोग नाही. तसेच हे शैक्षणिक आणि सामाजिक बदल एका रात्रीत होत नाहीत. मग तोपर्यंत हिंदुत्वाच्या चळवळीला त्या gen Z विचारांपर्यंत पोहोचावे लागेल. तेही त्याच माध्यमातून जे लोकाभिमुख आहे. जसे की भरपूर लोकांना ट्रेकिंग चे आवड आहे, तर त्यांना दुर्गसंवर्धन कार्यात जोडलं पाहिजे. ज्यांना गाण्याची आवड आहे, त्यांच्याकडून फ्युजन अभंग बनवून घेतले पाहिजेत. आणि या सर्वांशी निगडित आर्थिक लाभही त्या त्या कल्पक लोकांना मिळाले पाहिजेत. अशी व्यवस्था समाजिक हिंदुत्वाला गरजेची आहे.

2. आपला आवाज बुलंद करणे : ज्याप्रमाणे प्रवाही पाण्याला नदी म्हणतात आणि थांबलेल्या पाण्याला डबकं म्हणतात. त्याच प्रमाणे सोशल मीडियावर प्रबळ झालेली वैचारिक चळवळ फक्त सोशल मीडियापुरती राहिली, तर तिचं रूपांतर वैचारिक डबक्यात झाल्याशिवाय राहत नाही. हिंदुत्व ही एक जीवनदायिनी गंगा आहे, फक्त काही ट्रोलर्स चा समूह नाही. हे जगाला कळण्यासाठी मेन्स्ट्रीम मीडिया, न्यूज चॅनल्स पासून ते वाचक चळवळी, शॉर्ट फिल्म्स या सर्व माध्यमांमधून हा आवाज बुलंद झाला पाहिजे. सध्याचा मेन स्ट्रीम मीडिया हा भाजपला अनुकूल भूमिका घेतो; हिंदू समाजाला अनुकूल नाही. भाजप स्वतः हिंदू समाजाचा पाठिंबा घेऊन सत्तेत आला आहे आणि हिंदू समाजावर चालत आलेले वैचारिक आघात थांबवण्यासाठी काम करत आहे हे खरं असलं, तरीही फक्त भाजप म्हणजे हिंदू समाज नाही. त्यामुळे हिंदू समाजाला स्वतःच्या मीडियाची आणि कला समूहाची नितांत गरज आहे. 

3. नव्या प्रश्नांवर संदिग्धता दूर करणे : LGBTQ, फेमिनिझम, मानवतावाद, पर्यावरणवाद, रेसिजम, सांस्कृतिक मार्क्सवाद या सर्व नव्या काळातील मुद्द्यांना हिंदुत्वाच्या दृष्टीने विचारात घेण्यात यायला हवं. वरील सर्व मुद्दे अत्यंत गंभीर असून हिंदुत्ववादी लोकांची पुढची पिढी याच मुद्द्यांवर स्वतःचं मत बनवणार आहे. या सर्व मुद्द्यांमध्ये काही चांगल्या गोष्टी असून त्यांचा strategic स्वीकार करून इतर उणिवा ठामपणे मांडल्या गेल्या पाहिजेत. आजच्या स्थितीत मराठी भाषेत हे सर्व मुद्दे कोणी चर्चेतही घेत नाही एवढी गंभीर अवस्था हिंदू समाजाची आहे.

4. प्रॅक्टिकल प्रश्न सोडवणे व इतिहासाच्या विकृत मांडणीचा कायमचा उपाय करणे: मागच्या 25 ते 30 वर्षांपासून जातीय तेढ निर्माण करणारा काल्पनिक इतिहास अनेक संघटना रचत आहेत. कसलेही पुरावे नसताना फातिमा शेख, रायप्पा महार सारखे पात्र इतिहासात घुसवले जात आहेत. एकही कागदोपत्री पुरावा नसताना लाखो लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचते आणि लोक त्याला सत्य मानायला लागतात. जर legal activism हा प्रकार मुस्लिम पर्सनल law बोर्ड करू शकतो, तर हिंदू वकील स्वतः हिंदू वकील महासंघ तयार करून अशा मीडिया चॅनल्स आणि युट्युब चॅनल्स वर खोट्या माहितीसाठी केसेस का टाकू शकत नाहीत!? असं होत नाही, कारण यासाठी आर्थिक आणि राजकीय पाठबळ आवश्यक आहे. मात्र राजकीय पाठबळ नसतानाही मुस्लिम पर्सनल law बोर्ड आपल्या हिताचे काम कसे करवून घेतो, याचा विचार व्हायला हवा. आणि ते तंत्र शिकायला हवे. हिंदू शिक्षण संस्था, हिंदू व्यापारी संघटना, यांपासून ते अगदी वेगवेगळ्या जातींमध्ये समन्वय साधणाऱ्या संस्था आणि हिंदू उद्योजकांपर्यंतही सामाजिक हिंदुत्वाचा शिरकाव व्हायला हवा. यातून विविध जातीतील आणि आर्थिक स्तरातील हिंदू लोकांचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम solve होतील, आणि भावना भडकवणाऱ्या जातीयवादी घटकांना हे लाभार्थी हिंदू लोक स्वतःच उध्वस्त करतील.

5. प्रॅक्टिसिंग हिंदू अत्यावश्यक : सावरकरांचे राजकीय हिंदुत्व आज जे काही यश प्राप्त करत आहे, त्यामागे सर्वात मोठी शक्ती ही सश्रद्ध, आस्तिक आणि देवधर्म पाळणाऱ्या हिंदू लोकांची आहे. सावरकरांचे चिकित्सक विचार या समाजाला माहीतच नाहीत. अनेकदा हिंदुत्ववादी लोक त्या विचारांना उघड विरोध करतात, आणि सावरकरांचं लेबल लावलं की तेच विचार त्यांना चिंतनीय वाटतात. हाच प्रकार आंबेडकर, फुले, टिळक यांच्याही बाबतीत होतो. त्यामुळे महापुरुषांचे धार्मिक विचार हे फक्त "त्यांचे वैयक्तिक विचार" आहेत. ते अनेकांना पटतील, अनेकांना पटणारही नाहीत. त्या गोष्टीचा आवश्यकतेपेक्षा मोठा मुद्दा बनवण्यात अर्थ नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठांचे प्रेरणास्थान असलेले शिवशंभू छत्रपती लढले ते याच सश्रद्ध हिंदू समाजासाठी. एक श्रध्दावान हिंदू किंवा त्याची पुढची पिढी कदाचित सावरकरांचे नास्तिक हिंदुत्व स्वीकारेल; पण नास्तिक सेक्युलर व्यक्ती जर पराकोटीचा हिंदुद्वेष मनात ठेवून वाढत असेल, तर त्याला असंख्य तर्क देऊनही त्याचा मनातला पूर्वग्रह कधीच सुटणार नाही. त्यामुळे ज्या लोकांना प्रॅक्टिसिंग हिंदू रहायचं आहे, त्यांना विनाकारण नास्तिक हिंदुत्वाचे डोस पाजण्यापेक्षा त्यांना धार्मिक साहित्याकडे संशोधनात्मक दृष्टीने वळवणे हितकर ठरते. आजपर्यंत भारताची सांस्कृतिक ओळख ही सश्रद्ध धार्मिक आणि देवभक्त वीरांच्या सामर्थ्याने टिकली आहे. त्यामुळे सामाजिक हिंदुत्वात धार्मिक मान्यतांचा विरोध नसावा, फक्त धार्मिक कार्यात अंधश्रद्धा, अवैज्ञानिक समजुती, छद्मविज्ञान (psuedoscience) यांच्याविरोधात आपली भूमिका असावी. 

सामाजिक हिंदुत्व ही कोणाच्या विरोधात संघर्षाची घोषणा नसून आपल्या हिंदू समाजाला सर्वांगीण सामर्थ्य प्रदान करणारी संजीवनी आहे. सामाजिक हिंदुत्वाच्या धाग्याने संघटित झालेला हिंदू समाज संघर्षाला घाबरणारा तर नसेलच; पण त्याच्याशी संघर्ष करण्याचीही कोणाची हिंमत होणार नाही हे नक्की.

✍️प्रथम उवाच

Post a Comment

0 Comments