मी सत्यशोधक
ज्योतिराव फुले यांच्याबद्दल लिहिलेलं वाचताना सर्वात आधी पूर्वग्रह बाजूला ठेवा; कठीण आहे; सर्वांना जमत नाही. पण तुम्हाला जमत असेल तरच वाचा.
आपल्याला ही गोष्ट माहीतच असेल की ज्योतिराव फुलेंनी स्त्री शिक्षणाचं कार्य केलं, शाळा काढल्या, अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केलं, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, ते एक सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते, इत्यादी.
काहींनी त्यांच्याबद्दल नकारात्मक सुद्धा ऐकलं असेल की ते हिंदू देवीदेवतांबद्दल, वारकरी संप्रदाय, संत परंपरा, ब्राह्मण समाज यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका करायचे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अडाणी म्हंटले, मराठ्यांनी सिंहगड किल्ला मुस्लिमांना लाच देऊन घेतला अशी ओळ पोवाड्यात लिहिली (pdf पृष्ठ 80), शहाजी राजांना आदिलशाहने कैद केल्यावर महाराज घाबरले (pdf पृष्ठ 81)
आता प्रश्न पडतो यातलं काय खरं मानायचं, काय खोटं मानायचं? वास्तविक पाहता वरील सर्वच चांगल्या-वाईट गोष्टी खऱ्या आहेत. मग त्यांचा सन्मान करायचा की शिव्या द्यायच्या? याचं एका शब्दात उत्तर आहे "सन्मान". पण मी हे का म्हणतोय, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचवा लागेल.
राजकिय मुद्दे
सर्वप्रथम याच्याशी निगडित राजकीय मुद्दे पाहूया. राजकीय लोक यावर भूमिका घेताना कचरतात, कारण त्यांना वाटतं फुलेंच्या विचारांवर जास्त काही बोललं तर त्यांच्या जातीचे म्हणजे माळी समाजाचे मतदार आपल्यापासून दूर जातील. फुलेंच्या काळात गाजलेली ब्राह्मणेतर चळवळ ( या चळवळीत राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे या सगळ्यांची काही न काही चांगली/वाईट भूमिका होती) ही चळवळ फुलेंच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झाली. त्याच्या समर्थनात आणि विरोधात राजकीय विचारधारा तयार झाल्या आणि त्या विचारधारा अजूनही पुढे पुढे सरकत आहेत. त्यामुळे ज्योतिराव फुले यांचे राजकीय मूल्य फार जास्त आहे.
महात्मा
ज्योतिराव फुलेंना महात्मा फुले का म्हणतात, याचा विचार केल्यावर सर्व विचारांचे लोक हे मान्य करतील, की "आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या प्रश्नांची आपल्या पद्धतीने उत्तरे शोधणे आणि न घाबरता प्रत्यक्ष कृती करणे" हा एक असा गुण आहे ज्याने ते महात्मा ठरतात.
फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं, इंग्रजांच्या राजकीय समर्थनाचा वापर करून समाजसुधारणेचे प्रयत्न केले. त्यांची वैचारिक जडणघडण ख्रिश्चन प्रचारकांपासून प्रभावित होती, त्यामुळे त्यांनी त्याच लाईन वर स्वतःचे विचार मांडले. पण ते ही गोष्ट कायम सांगत राहिले, की सत्य शोधा आणि त्यावर ठाम रहा.
आर्य आक्रमण सिद्धांतज्योतिराव फुलेंनी लिहिलेल्या ग्रंथांत अनेकदा "विदेशी धूर्त आर्य भट ब्राह्मण" असा तिरस्कारयुक्त उल्लेख येतो. याला आधार त्याकाळच्या आर्य आक्रमण सिद्धांताचा आहे. या सिद्धांतानुसार आर्य लोकांनी मध्य आशिया (इराण) हुन येऊन भारतावर आक्रमण केले, वेद उपनिषदे ही त्या आर्यांची वैचारिक गोष्ट आहे, इथले मूलनिवासी म्हणजे इथला ब्राह्मणेतर समाज आहे. अशा प्रकारची थेअरी त्याकाळात इंग्रजांकडून प्रचलित केली जात होती. विशेष म्हणजे यावर टिळक आणि पंडित नेहरूंचाही विश्वास होता. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही थेअरी anthropologically रिजेक्ट केली. आंबेडकरांचे तर्क भविष्यात खरे ठरले आणि या थेअरीसाठी कसलाही युद्ध झाल्याचा, आक्रमण झाल्याचा पुरावा मिळाला नाही आणि सर्वानुमते आर्य आक्रमण सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर खोटा ठरला. अगदी ज्यांनी पूर्वी हा सिद्धांत मांडला होता, त्यांनी नंतर आर्यन मायग्रेशन थेअरी मांडायचा प्रयत्न केला (हाही अजून सिद्ध झालेला नाही), पण थोडक्यात आर्य आक्रमण सिद्धांत खोटाच ठरला.
आजच्या पुरोगाम्यांचा जातीयवाद
आता या सिद्धांतावर आधारित ज्योतिराव फुलेंचं ते साहित्य वापरून अजूनही समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातात. त्यासाठी ज्योतिराव फुलेंच्या साहित्याचा आधार घेणारे अनेक वक्ते आहेत. या लोकांमुळे ज्योतिराव फुलेंच्या चरित्रावर आजही शिंतोडे उडत आहेत आणि त्यांना अपेक्षित असलेली सामाजिक उन्नती रोकली जात आहे. ज्योतिराव फुलेंनी जी जी गोष्ट वाचली, त्याकाळात उपलब्ध साधनातून ती पडताळून पाहिली, जी पडताळली गेली ती सत्य मानली आणि त्यावर आधारित मत बनवलं. ही methodology जर आजच्या हिंदू समाजाने स्वीकारली तर अर्धे प्रश्न सहज सुटतील, पण दुर्दैवाने असं होत नाही.
"मी ज्याला महापुरुष मानतो त्याच्या कधीच काहीच चुका होऊ शकत नाहीत", ही व्यक्तिपूजा सर्वात घातक आहे. डॉ.आंबेडकर या व्यक्तिपूजेच्या प्रचंड विरोधात होते. मात्र दुर्दैवाने आज स्वतः आंबेडकर, सावरकर, टिळक, फुले, आणि सर्वच महापुरुषांच्या बाबतीत ही व्यक्तिपूजा होताना दिसते. विशेषतः त्या त्या जातीचे लोक अशी व्यक्तिपूजा कारतात.
मग त्याचा परिणाम असा होतो, की सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक दृष्टीने चुकीचं लिहिलं, की त्यांचे जातीय समर्थक ते झाकण्याचा प्रयत्न करणार आणि जातीय विरोधक त्या वाक्याचा वापर करून सावरकरांचे सरसकट सर्व विचार सोडा म्हणणार. किंवा फुलेंनी महाराजांना अडाणी म्हंटलं, म्हणून फुलेंचं सर्व काम बाजूला ठेऊन जातीय विरोधक लोक त्यांच्या विरोधात आतून पेटणार; काही लोक त्यावर पोस्ट करणार, काही फक्त राजकिय दबाव म्हणून गप्प बसणार....
हे धगधगत्या ज्वालामुखीसारखं वातावरण जगातल्या कोणत्याही समाजासाठी फार घातक आहे.
कोणाकडून काय शिकावं?
ज्योतिराव फुले हे महान समाजसुधारक होते, पण ते इतिहासकार नव्हते; धर्मपंडित नव्हते त्यामुळे त्यांनी धर्म अथवा इतिहासाच्या अनुषंगाने केलेल्या लेखनात काही चुका असल्या, तरीही त्या चुका आज आपण दुरुस्त करून त्यांच्या चांगल्या कामांमधून शिकलं पाहिजे. (आता ही गोष्ट जो सावरकरांबद्दल लिहितो तो ब्राह्मणवादी वाटतो, मी फुलेंबद्दल लिहून कदाचित माळीवादी वाटेल). पण इथे जात येणे योग्य नाही. मला धर्माचं ज्ञान घ्यायचं असेल तर मी आदी शंकराचार्यांचे विचार वाचले पाहिजेत, तुकोबांचे अभंग ऐकले पाहिजेत, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदायाच्या जाणकारांशी चर्चा केली पाहिजे. आणि जो धार्मिक पंथ योग्य वाटेल तो निवडला पाहिजे. पण अर्थशास्त्राच्या प्रश्नांसाठी हे सर्व तेवढे उपयुक्त ठरणार नाहीत जेवढा आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कामी येईल.
जातजर जातीच्याच दृष्टीने विचार केला तर कोणताही धार्मिक हिंदू माणूस संतश्रेष्ठ सावता माळींच्या "कांदा मुळा नी भाजी, अवघी विठाई माझी" या अभंगावर तल्लीन होतो. पण त्याच जातीत जन्मलेल्या फुलेंच्या खालील ओळींवर तो काय प्रतिक्रिया देईल?
फुलेंनी श्री गणेशावर खालील ओळी लिहिल्या:
"पशुपरी सोंड, तोंड मानवाचे l सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी
बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड | फुकितो शेंबूड सोंडेतून ||
अन्तेजासी दूर भटा लाडू देतो|नाकाने सोलीतो कांदे गणू ||
चिखला तुडवूनी बनविला मोरया| केला ढबू -ढेर्या भाद्रपदी ||"
(संदर्भ : समग्र फुले वाङ्मय, विभाग 2, पृष्ठ 499
Pdf link : इथे क्लीक करा )
या कवितेत ते पुढे मारवाडी आणि ब्राह्मणांना टार्गेट करतात, या जातीच्या लोकांना ऐतखाऊ आणि गरिबांना लुटणारे म्हणतात. फुलेंचे असे विचार कोणत्याही जातीचे गणेशभक्त कधी मान्य करतील का?
त्याकाळच्या इंग्रजांनी लिहिलेल्या प्रचलित इतिहासाचा अभ्यास करून फुलेंनी शिवरायांना अडाणी म्हंटलं होतं, त्यांच्या धार्मिक आकलनानुसार त्यांनी देवी देवतांवरही टीका केली. याला सर्वांनी समर्थन द्यावं असं अजिबातच नाही. मुळात या विचारांचा विरोध करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला आहे.आणि हे व्यक्तीस्वातंत्र्य स्वतः ज्योतिरावांनी सुद्धा जपलं आहे. देवावर टीका करणाऱ्या ज्योतिरावांच्या स्वतःच्या पत्नीने म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी सरस्वतीच्या लेकरांनो शाळेत या अशीही कविता लिहिली, ते ज्योतिरावांना पटले असेल का? पण तरीही त्यांनी ते लिखाण दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि स्वतःचा विचारही बदलला नाही. मग आज आपण फुले देवतांवर टीका करायचे म्हणून तुम्हीही तसंच करा, असं म्हणणाऱ्या आणि समाजात वातावरण बिघडवणाऱ्या लोकांना काय म्हणणार?
फुलेंचं कर्तृत्व : पुरोगामी, हिंदुत्ववादी
मुळात फुलेंचं कर्तृत्व अशा साहित्यापुरतं मर्यादित अजिबात नाही. पुरोगामी लोकांनी ते मर्यादित करण्याचा जो जातीयवादी प्रयत्न चालवला आहे, त्याला बळी पडू नका.
ज्योतिरावांनी विधवा पुनर्विवाह व्हावे यासाठी प्रयत्न केले, अस्पृश्य लोकांसाठी स्वतःच्या घरची विहीर खुली केली, शिक्षणासाठी आलेल्या इंग्रजांच्या कमिशनसमोर स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या शिक्षणाचे प्रश्न मांडले, बालकाश्रम चालवले. हेच तर सामाजिक हिंदुत्वाचं काम आणि ध्येय आहे! हिंदुत्वाच्या दृष्टीने विधवा पुनर्विवाहासाठी बालपणी कविता करणारे सावरकर आणि त्यासाठी धडपड करणारे फुले दोघेही महान आहेत. पण पुरोगामी तुम्हाला यात जात पाहायला भाग पाडतील, सावध रहा!
वास्तविक पाहता हिंदुत्व हे लोकांना जोडण्यासाठीचं वैचारिक औषध आहे, तो समाजात वाद वाढवणारा आजार नाही. त्याकाळात कोणती जात अस्पृश्य आहे आणि कोणती नाही, कोण दलित आहे की नाही हे सगळं इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे निकष लावून ठरवलं होतं त्याचे काय काय परिणाम झाले, केव्हा झाले यासाठी जगविख्यात प्रिंस्टन विद्यापीठाचे प्रोफेसर राजीव मल्होत्रा यांचं Varna Jati and Caste हे पुस्तक वाचावं लागेल. मात्र हे सर्व काही आज अभ्यास करायला सोपं आहे.
तार्किक विचारजरा स्वतःला 19व्या शतकात घेऊन जा. तुमच्या साठी सत्य काय असेल? जातीच्या आधारावर लेकरांना वर्गाबाहेर बसवलं जातंय, मुलींना शिक्षण दिलं जात नाहीये, विधवांचे पुनर्विवाह बंद आहेत, तुम्ही स्वतः सुद्धा रूढी परंपरेत जखडलेले आहात. अशा परिस्थितीत इंग्रजांनी काय केलं, ब्राह्मणांनी काय केलं, असले प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील, की प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असेल? जे तुमचं उत्तर आहे, तेच ज्योतिरावांनी केलं आहे. कोणतीही क्रांती फक्त पुस्तकी बाता मारून होत नसते, त्यासाठी ग्राउंड वर्क लागते. ह्या ग्राऊंड वर्क साठी मोटिव्हेशन वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळं असलं तरी काहीच फरक पडत नाही. मंगल पांडे यांनी जे युद्ध चरबी लावलेल्या काडतुसा विरोधात सुरू केले होते, त्याचे रूपांतर मोठ्या स्वातंत्र्ययुद्धात झाले. मंगल पांडे यांचे वैयक्तिक विचार, बंड करण्यामागे असलेलं मोटिव्हेशन याने त्यांच्या मूळ कार्याची महती कमी होत नाही. हेच लॉजिक आंबेडकर, फुले, सावरकर, टिळक सर्वांना लागू होते. ज्योतिरावांची महती या ग्राउंड वर्क मध्ये आहे.
आजच्या काळातही अनेक हिंदुत्ववादी सत्य सांगताना घाबरतात, मलाही या विषयापासून लांब रहा वगैरे बोलतात, त्यांनीही भेकडपणा सोडून फुलेंचा सत्यशोधकपणा स्वीकारला पाहिजे.
मात्र आज जे लोक फुलेंच्या मार्गावर चालण्याचा दावा करतात, त्यातील काहींनी हा प्रॅक्टिकल अप्रोच सोडून जातीयवाद वाढवण्याचा मार्ग निवडला आहे. फुलेंच्या चरित्रात फातिमा शेख सारखे काल्पनिक पात्र घुसवून फुले कुटुंबाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित त्यांना सत्तेबाहेर बसावे लागले.
एक आधुनिक हिंदू व्यक्ती या नात्याने आपल्याला दोन्ही बाजू माहीत असाव्यात. कोणताही महापुरुष त्याच्या योगदानासाठीच समाजात महापुरुष म्हंटला जातो. त्याचे सर्वच विचार आपल्याला पटतील असे नाही. जे पटत नाहीत तेही विचार माहीत असावेत, आणि जे पटतात ते आत्मसात करावेत हा साधा मंत्र हिंदू समाजाने पाळला तर जगातील प्रचंड बलशाली समाज होण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. महात्मा ज्योतिरावांना आणि त्यांच्या ग्राउंड वर्क ला त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
✍️ प्रथम उवाच
0 Comments