मोरांच्या पिसाऱ्याचे बंड
पर्यावरण केवळ भाजपशासित राज्यांमध्येच अस्तित्वात आहे का? तेलंगणामधील वृक्षतोड आणि प्राण्यांसाठी कोणतेही आंदोलन नाही?
तेलंगणा सरकारने गचीबोवली मधील लाखो एकर हिरवी गार जमीन नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हे वनक्षेत्र बरबाद करत असताना पक्षी त्रस्त झाल्याचे आणि त्यांच्या केविलवाण्या ओरडण्याचा आवाज असलेले फोटो व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. विद्यार्थी आंदोलन करत होते, तसेच हैदराबाद उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, तरीही असा निर्णय घेण्यात आला. दक्षिण भारतातील चित्रपट अभिनेते, अभि आणि नियू, ध्रुव राठी यांसारखे प्रभावशाली लोक यावर चिंता व्यक्त करत होते. केंद्रीय मंत्रालयानेही याबाबत अहवाल मागितला आहे. पण प्रश्न असा आहे की, मेधा पाटकर, स्वरा भास्कर, सोनम वांगचुक आणि इतर पार्ट टाइम आंदोलक कुठे गायब झाले आहेत!?
पक्षपाती पर्यावरण चळवळ
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मेधा पाटकर यांनी गुजरातमधील सरदार सरोवर धरण प्रकल्पाला विरोध केला होता. त्यांच्या एनजीओने दावा केला की, हा प्रकल्प स्थानिकांना विस्थापित करेल आणि पर्यावरणाची हानी करेल. मात्र, काही दशकांनंतर तो प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आणि शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. यावरून असे दिसते की काही चळवळी एका बाजूनेच पाहिल्या जातात आणि त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केला जात नाही.
मुंबईतील आरे जंगल प्रकरणात बॉलिवूड कलाकार, ख्रिस्ती शाळा आणि एनजीओंनी एकत्र येऊन मेट्रो कारशेडच्या बांधकामाविरोधात मोठा गाजावाजा केला. श्रद्धा कपूर आणि अनेक प्रभावशाली व्यक्तींनी याला पर्यावरणीय आपत्ती म्हणून सादर केले. पण त्याच वेळी तेलंगणात मोर आणि इतर वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असताना हेच आवाज कुठे गेले? पर्यावरण चळवळ केवळ भाजपशासित सरकारच्या विरोधातच कार्यरत असते का?
काही आठवड्यांपूर्वी लडाख चे सोनम वांगचुक यांनी पुण्यातील रिव्हरफ्रंट प्रकल्पाला विरोध केला. वांगचुकराव अगदी पाकिस्तानातही पर्यावरण विषयावर व्याख्यान देऊन आले होते. परंतु त्यांनी अजूनही तेलंगणातील पर्यावरण विनाशावर आवाज उठवला नाही. साधं ट्विट सुद्धा दिसत नाही. हे दर्शवते की पर्यावरणाचे प्रश्न फक्त राजकीय हेतूंशी सुसंगत असतील तेव्हाच चर्चेत येतात.
पर्यावरण चळवळ आणि राजकीय हेतू
पर्यावरण चळवळ काही ठराविक भागांमध्येच का कार्यरत असते आणि इतर ठिकाणी शांत का असते? याचे उत्तर कदाचित त्यामागील राजकीय विचारधारेच्या प्रेरणेत आहे. अनेक पर्यावरणीय आंदोलने डाव्या विचारसरणीच्या राजकीय हेतूंना समर्थन देतात आणि बहुतेक वेळा अव्यक्तपणे हिंदवी विचारसरणीच्या सरकारांच्या विरोधात जातात.
हिंदू सणांविरोधात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय मुद्दे उपस्थित केले जातात. होळी, दिवाळी आणि गणपती विसर्जनाला प्रदूषणाच्या मुद्द्यावरून टार्गेट केले जाते. मात्र, ईदला होणारी प्राण्यांची कत्तल, ख्रिसमस ट्री तोडणे किंवा नववर्ष फटाके उडवण्यावर असा आक्षेप घेतला जात नाही. पर्यावरण चळवळ निवडक ठिकाणीच सक्रिय का होते आणि खऱ्या पर्यावरण विनाशाकडे दुर्लक्ष का केले जाते? या सर्व पोस्ट तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील, पण त्यावर उपायांवर क्वचितच चर्चा होते.
खऱ्या पर्यावरण चळवळीचे पुनरुज्जीवन
ही चर्चा फक्त 'त्यांनी तसे केले, मग आम्ही का नाही?' एवढ्यावरच संपवायची नाही. याचा सखोल विचार करायला हवा. पर्यावरण ही डाव्या विचारसरणीच्या लोकांची खासगी मालमत्ता आहे का? नाही ना? हिंदू संस्कृती ही हजारो वर्षांपासून निसर्ग संवर्धनाची आदर्श आहे. झाडांची पूजा करणारी आणि पर्यावरणाशी सुसंगत सण साजरे करणारी संस्कृती हीच आहे. मग खऱ्या पर्यावरण समस्यांसाठी आपण डाव्यांवर का अवलंबून राहतो?
तेलंगणातील मोर आणि इतर पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे, पण त्यासाठी कोणतीही मोठी चळवळ दिसत नाही. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आवाज उठवण्याची वाट पाहण्याऐवजी तेलंगणातील स्थानिकांनी स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे. सुदैवाने ही गोष्ट सुद्धा घडताना दिसत आहे. आपल्या परंपरांमध्ये नेहमीच निसर्गासोबत राहण्यावर भर दिला गेला आहे. आता या परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण चळवळ उभारण्याची वेळ आली आहे.
समाजाने एकत्र येऊन, राजकीय हुजरेगिरी बाजूला ठेवून, आपल्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पुढे यायला हवे. कोणती बॉलिवूड ची नटी सांगते म्हणून आम्हाला आमच्या वृक्षवल्लीचा कळवळा येतोय, की आम्ही तुकोबांचे अभंग ऐकून वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणतोय याचा आपण विचार केला पाहिजे. पर्यावरण चळवळ ही केवळ राजकीय सोयीनुसार वापरण्याची गोष्ट न राहता, खऱ्या अर्थाने निसर्ग आणि मानवतेच्या फायद्यासाठी असावी. तेलंगणातील मुख्य प्रवाहातील कार्यकर्त्यांचे मौन ही एक जागृतीची घंटा आहे. आपण सर्वांनी मिळून ही लढाई लढली पाहिजे, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण वाचवता येईल. तेलंगणाच्या मोरांच्या आणि इतर पक्षांच्या केविलवाण्या आवाजांनी जागा झालेला पशुप्रेमी सामान्य भारतीय माणूस, हा दुटप्पी पर्यावरणवाद्यांच्या विचाराला JCB लावल्याशिवाय राहणार नाही. हे मोरपिसाऱ्याचे बंडच म्हणावे लागेल!
✍️प्रथम उवाच
0 Comments