पानिपत हा काय इतिहास आहे का?

विधानसभेतल्या गोंधळातून पानिपतचं युद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अफगाणिस्तानच्या अब्दाली ने मराठ्यांचा पराभव केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. पण पानिपत हा खरोखरच फक्त इतिहास आहे का? भावनिक होऊन लिहितोय, पण पानिपत हे सत्य आहे. वर्तमान आहे. तुमचा माझा सर्वांचा वर्तमान. 

पानिपत युद्धाच्या वेळी पूर्ण भारतात सर्वाधिक बलवान मराठा साम्राज्य होतं. हिंदुस्थानची पाटीलकी गाजवत होते आपले पूर्वज. मुघल बादशहा बोटावर नाचायचा मराठ्यांच्या. यशाचा घोडा एवढा तुफान दौडत असताना आलेलं unexpected अपयश म्हणजे पानिपत. 

सर्व सरदार छत्रपतींच्या कार्यासाठी एकत्र आहेतच, असा विश्वास सर्वांना होता. पण होळकरांशी भाऊंचे झालेले मतभेद, आणि त्यावरून आपल्या माणसांनी सोडलेली साथ म्हणजे पानिपत. हे फक्त इतिहासात घडतं का? असा कोण आहे जगात ज्याला आजपर्यंत कधी कोणी सोडलेलं, दूर केलेलं नाही? माणसं दुरावतात. पुन्हा जवळ येतात, किंवा कधी येतही नाहीत. पण वेळ आल्यावर जे असतात त्यांच्याच सोबत जे काही best possible आहे, ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे पानिपत. 

"लाख बांगडी फुटली" सारख्या म्हणी मराठीत तयार झाल्या कारण लाखो मराठी माणसांनी आपल्या बायकांना विधवा करून स्वतःच्या रक्ताचा आणि मांसाचा चिखल केला पानिपतच्या मैदानावर! साधा शेयर बाजारात थोडा लॉस झाला की माणूस पुन्हा पैसे गुंतवताना कचरतो. जगात सर्वच माणसे यशस्वी नसतात, पण प्रत्येकाला आयुष्यात एक सुवर्णकाळ असा मिळतो, ज्यात तो सातत्याने प्रगती करत जातो. तेव्हा पानिपतासारखा रिऍलिटी चेक मिळतोच. तो पराभव आहे की झेप घेण्यापूर्वीची पीछेहाट, हे मात्र कर्म ठरवतात. 

एखाद्या प्रगती करणाऱ्या माणसाला unexpected पराभवाचं नेमकं किती दुःख होतं, हे दुसरा कोणीही समजू शकत नाही. सेनापती, भाऊ आणि बाप म्हणून हरलेल्या पेशव्यांचं दुःख, पूर्ण घराण्याची चिता झालेल्या महादजी शिंद्यांचं दुःख आज आपण कधीच नाही समजू शकणार. पण ते बाजूला सारून जी मर्दुमकी त्यांनी दाखवली, तो नव्याने केलेला शंखनाद म्हणजे पानिपत! 

अब्दुल कलाम म्हणायचे एकदा यश मिळालं की पुन्हा यशस्वी होण्याचं ओझं वाढत जातं. नाहीतर आधीचं यश म्हणजे केवळ नशिबाचा भाग होता असं वाटायला लागतं. हे प्रेशर तेव्हा मराठ्यांना जाणवलं नसेल का? आजही प्रत्येकाला यश मिळाल्यावर जाणवत नाही का? 

पण हे प्रेशर महादजींनी हँडल केलं. पुन्हा एकदा मराठी सत्तेचा वचक उत्तरेत बसवला. पण ज्या नजीबखानाने माझ्या बापाला हाल हाल करून मारलं त्याला सोडणार नाही! असा संकल्प करणारे महादजी उत्तरेत गेले तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नजीबखान already मेला होता. महादजींनी त्याची कबर फोडली. हाडं विस्कटून टाकली. पण हे करूनही त्यांच्या मनाला शांती मिळाली असेल? आजही मराठी माणूस पानिपत विसरू शकला नाही. तुमच्या आयुष्यातला सर्वात दुःखद प्रसंग, पराभव आठवून आजही शहारा येतोच ना? मन पानिपत फक्त इतिहास कसा? तो जपला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे कारण तो तर वर्तमान आहे. तुमचा माझा सर्वांचा वर्तमान....

✍️प्रथम उवाच

Post a Comment

0 Comments