शंकराचार्य, शंकराचार्य आणि शंकराचार्य


उत्तर प्रदेशात इटवा येथे यादव जातीच्या एका व्यक्तीला कथा सांगितल्यानंतर मारहाण करण्यात आली. केस कापण्यात आले. काही मीडिया रिपोर्ट अनुसार हे त्याच्या यादव जातीमुळे करण्यात आलं, तर काही रिपोर्ट अनुसार त्या कथाकाराने एका महिलेच्या अंगाला अनुचित स्पर्श केल्यानंतर हे घडलं. ती महिलाही मीडियासमोर येऊन हे सांगायला लागली.

यातला विवाद ती महिला समोर आल्यानंतर थांबणार, एवढ्यात अविमुक्तेश्वरानंद या शंकराचार्यांनी "कथा सांगायचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा" हे विधान केलं. आता याचा वापर यादव समाजाला पेटवून त्यांना जातिनिष्ठ मतदान करायला लावण्यासाठी होणार हे निश्चित आहे. यादव समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करणारे अखिलेश यादव अविमुक्तेश्वरानंद यांचे परम शिष्य आहेत हे सुद्धा याठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे. 

अविमुक्तेश्वरानंद यांचा शंकराचार्य या पदावर पट्टाभिषेक सुद्धा वादग्रस्त असून त्यावर कोर्टात केस सुरू आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता शंकराचार्य पद मिळाल्यावरही त्यांच्यातला राजकारणी शांत होताना दिसत नाही. कधी काळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असलेल्या अविमुक्तेश्वरानंद यांचे राहुल गांधी, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, मोहन भागवत या सर्वांशी संबंध आले आहेत. राजकीय दृष्ट्या ते कधी राहुल गांधींचा बचाव करतात, कधी त्यांना धर्माबाहेर काढलं म्हणतात, तर कधी एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देतात तर कधी उद्धव ठाकरेंची स्तुती करतात. अंबानी च्या लग्नात नरेंद्र मोदीनाही आशीर्वाद देऊन आलेले शंकराचार्य पॉलिटिकल करेक्टनेस मध्ये विशारद आहेत. 

पण इथे विषय त्यांच्या विधानाचा आहे. कथा वाचक ब्राह्मणच असावेत, की नाही या प्रश्नाचा आहे. हिंदू धर्मात वेगवेगळे संप्रदाय आहेत. प्रत्येकाचे आचार विचार बऱ्याच प्रमाणात मिळते जुळते असले, तरी त्यांमध्ये काही भेद सुद्धा आहेत. 

महाराष्ट्रात आपण नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि रामदासी/रामानंदी संप्रदाय प्रामुख्याने पाहतो. अशा वेगवेगळ्या सर्व संप्रदायामध्ये सामंजस्य घडवून त्यांच्यात एकता स्थापित करण्याचं काम हजारो वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य (पहिले शंकराचार्य) यांनी केलं. ते स्वतः "स्मार्त" संप्रदायातील होते. स्मार्त म्हणजे स्मृतीला रेफर करणारे. याचा अर्थ स्मार्त संप्रदायातील लोक वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि उपनिषदे यांना प्रमाण मानतात. 

स्मृती ग्रंथ म्हणजे नेमके काय?
वेदांचा अर्थ contextualize करणे, म्हणजे वेदांना गर्भित असलेला अर्थ वेळोवेळी अधिक स्पष्टपणे मांडणे यासाठी स्मृतींची रचना केली गेली. थोडक्यात स्मृती हे वेदांचं वेगवेगळ्या ऋषींनी केलेलं interpretation आहे. एखाद्या गोष्टीला interpret करण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात, तसे क्षत्रिय कुळत जन्मलेल्या मनु महाराजांच्या दृष्टीने लिहिलेली मनुस्मृती, पराशरांची पराशर संहिता, याज्ञवल्क्य ऋषींची याज्ञवल्क्य संहिता असे अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यांना प्रमाण मानणारे व अभ्यास करून वेळोवेळी त्यातील गोष्टी सांगणारा संप्रदाय म्हणजे स्मार्त संप्रदाय आहे. 

स्मृती म्हणजे धर्माचे अंतिम सत्य आहे का?
नाही. या स्मृती ग्रंथातील गोष्टी कालसापेक्ष असतात. म्हणजे मी स्मृती लिहिणारा ऋषी असेल, तर वेदांमध्ये लिहिलेल्या तत्त्वांना मी आज कशाप्रकारे पाहतोय त्याच्या आधारावर मी आज एक interpretation लिहेल. ते interpretation अजून 100वर्षांपूर्वीच्या पंडितांना पटेल असं नाही, किंवा 100 वर्षानंतर ते relevant राहील असेही नाही. या गोष्टीची जाणीव पहिल्या शंकराचार्यांना होती. स्मृती ग्रंथात काय लिहिलं आहे, याचा विचार न करता त्यांनी सोवळे वगैरे सोडून अस्पृश्य चांडाळ व्यक्तीला गळाभेट दिली, स्त्री ला वादविवादाचं पंच (umpire) केलं, त्याकाळी विभाजित झालेला धर्म पाहून वेगवेगळ्या संप्रदायाच्या लोकांशी चर्चा केली, सर्वांना सोबत घेतलं भारतभर प्रवास केला. अनेक विद्वानांना चर्चेत हरवलं, अनेक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या संप्रदायाच्या आराध्य देवतांची उपासना केली, सगळ्यांना आवडेल अशी inclusive पंचायतन पूजा पद्धत तयार केली. महाराष्ट्रात पंढरपूरलाही येऊन राहिले, पांडुरंगावर अष्टक लिहिलं. 

त्यांच्या या सर्वसमावेशक विचारांमुळे सर्व संप्रदाय त्यांना अतिशय मानाचं स्थान देतात. त्याच आदी शंकराचार्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यात 4 रिसर्च सेंटर उभे केले. त्यांना वैदिक पीठ असं म्हणतात. प्रत्येक पीठाला एकेक वेद आणि इतर काही धार्मिक साहित्य वाटून दिलं, आणि त्यावर अभ्यास करायला व लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवायला सांगितलं. 

त्या प्रत्येक पीठाच्या प्रमुखाला शंकराचार्य ही पदवी दिली जाते. आपलं पृथ्वीवरील कार्य संपत आलं आहे असं वाटल्यावर प्रत्येक शंकराचार्य आपल्या एका शिष्याला आपला वारस घोषित करतात. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. 

पीठाच्या प्रमुख व्यक्तीवर एकच जबाबदारी असते. वैदिक ज्ञान व लिखित साहित्य जपणे. त्यासाठी त्यांना राजकीय/सामाजिक दृष्टीने काहीही करण्याची मुभा आहे. याचा इतिहासावरही परिणाम झालेला आहे. 

दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्य स्थापन करणारे हरिहर व बुक्कराय हे एकेकाळी राजकीय दबावामुळे मुस्लिम धर्मात गेले होते. त्यावेळी विद्यारण्य नावाच्या साधूंनी त्यांना पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली व स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा सल्ला दिला. पुढे हे विद्यारण्य शंकराचार्य पदावर विराजमान झाले व विजयनगरचे अमात्य / मंत्री सुद्धा सुरुवातीला राज्याची व्यवस्था लागेपर्यंत राहिले.

धार्मिक ज्ञान रक्षण करण्यासाठी धर्माचा आदर करणारी सत्ता महत्त्वाची होती त्यामुळे विद्यारण्य यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकांचा वैदिक ज्ञान संवर्धित करण्यासाठी फायदाच झाला.

पुढे त्याच प्रदेशातील शंकराचार्यांनी टिपू सुलतानलाही आशीर्वाद दिल्याचे इतिहासात दाखले आढळतात. टिपू सुलतान हा हिंदूंचा छळ करणारा, मंदिरं पाडणारा, मराठी व कन्नड भाषेचा द्वेष करणारा क्रूर शासक होता. तरीही त्याला समर्थन देऊन तेव्हाच्या शंकराचार्यांनी स्वतःचे ग्रंथ, मठ व शेकडो वर्षांचे लिखित ज्ञान वाचवले. वर सांगितल्याप्रमाणे शंकराचार्य पदावरील व्यक्तीची पहिली प्रायोरीटी वैदिक ज्ञान वाचवणे ही आहे. 

टिपू सुलतानला मराठ्यांनी हरवल्यानंतर मराठ्यांच्या फौजेतील किरायाच्या (बहुतांश मुस्लिम) शिपायांनी शंकराचार्य मठाची तोडफोड केली. मराठ्यांच्या पंतप्रधान व सेनापती असलेल्या पेशव्यांना ही गोष्ट कळताच त्यांनी शंकराचार्यांना क्षमा मागितली, नुकसान भरून काढले, त्यांनी धरलेले उपोषण सोडवले व त्यांना पुण्यात बोलावून सत्कार केला गेला. आपल्या शत्रूला आशीर्वाद दिला म्हणून मराठ्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला नाही. उलट त्यांनी केलेलं काम हे ज्ञानाच्या रक्षणासाठी होतं हे समजून घेऊन सत्कारच केला. 

स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला शंकराचार्य पद दिल्याची घटना घडली. त्यानंतर वेगवेगळ्या अँटी हिंदू घटना घडत असतानाही शंकराचार्य पदावरील कोणत्याही व्यक्तीने राजकारणात लुडबुड केली नाही. न हिंदूंच्या समर्थनात न हिंदूंच्या विरोधात. तामिळनाडूच्या जयललिता यांनी तर मुख्यमंत्री असताना शंकराचार्यांना चक्क खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले होते, पण तेव्हाही इतर शंकराचार्यांनी काही विशेष केलं नाही.

तरीही, त्यांचं जे ठरवून दिलेलं कर्तव्य आहे, वैदिक ज्ञानरक्षा त्यात कसर न पडल्यामुळे अजूनही त्यांचा आदर केला जातो. त्यांनी दिलेले निर्णय, मत, इत्यादी हे वर सांगितल्याप्रमाणे स्मार्त संप्रदायाचे असतात, संपूर्ण हिंदु धर्माचे नाही. हे सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शंकराचार्यांनी एखादी गोष्ट सांगितली, म्हणजे सर्व हिंदूंनी ते तसंच केलं पाहिजे हा काही धार्मिक नियम नाही. कारण तसे खरोखरच असते, तर टिपूला शंकराचार्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवले असते. 

अशाप्रकारे हा भ्रम बाजूला करा, की शंकराचार्यांनी बोललेल्या विधानाचा विरोध केला, म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करत आहोत. 

आता आजच्या काळात दिलेल्या विधानाला अनुसरून शंकराचार्य जे म्हणत आहेत, की फक्त ब्राह्मणांनाच कथा सांगण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट स्मृती ग्रंथांवर चालणाऱ्या स्मार्त संप्रदायाला आवडत असेल, तर त्यांना फक्त ब्राह्मणांच्या कथेला जाण्याचा पूर्ण धार्मिक, सांप्रदायिक आणि संवैधानिक अधिकार आहे. मात्र, ही गोष्ट सर्वांसाठी थोपवून अरेरावी करण्याचा, मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही, न धार्मिक, न संवैधानिक. सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व जातीतील लोकांना पुढे येउज पांडित्य मिळवावेच लागेल. हे काम ब्राह्मण समाजातील तरुणांची व तरुणींची सध्याची धार्मिक स्थिती पाहता तरी त्यांना झेपणारे वाटत नाही. मग फक्त जन्माच्या आधारावर हा अधिकार ब्राह्मणांना का मिळावा? इथेही मेरिट महत्त्वाचे आहे. 

शेवटी हे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल, की वैदिक ज्ञानरक्षा करण्याच्या कार्यात आधुनिक काळातील शंकराचार्य सपशेल अपयशी ठरले आहेत. 4 शंकराचार्य असताना इंग्रजांनी वैदीक ज्ञानाचे चुकीचे इंग्रजी भाषांतर जगभरात पोहोचवले, हे त्या अपयशाचे जिवंत प्रमाण आहे. त्याशिवाय 21व्या शतकातही वैदिक ज्ञानसंपदेला सांस्कृतिक मार्क्सवादाचा फार मोठा धोका अनेक विदेशी विद्यापीठांच्या माध्यमातून सुरू असताना शंकराचार्य पदावरील व्यक्ती आधुनिक इन्फॉर्मेशन warfare चा अभ्यास सोडून राजकीय स्टंट करताना दिसत असेल, तर पदाचा व परंपरेचा पूर्ण सन्मान करून त्यावरच्या व्यक्तीच्या अयोग्य वागण्यावर मात्र सणसणीत टीका  झालीच पाहिजे. शंकराचार्यांच्या बेसावधपणामुळे वैदिक ज्ञानावर फार मोठं संकट मागच्या 10 वर्षात आलं होतं. काही चाणाक्ष व कालसुसंगत अभ्यास करणाऱ्या हिंदूंमुळे तो धोका टळला. त्यावरही सविस्तर जाणून घेऊच, पण नंतर कधीतरी...

✍️ प्रथम उवाच

इन्स्टाग्रामवर फॉलो करा : @prathamuvach

Whatsapp Join करा : Ispitam Community 

Post a Comment

0 Comments