मी स्वतः कोणत्याही संघटनेचा सदस्य नाही, पण संभाजी भिडे किंवा भिडे गुरुजी या व्यक्तीबद्दल तुम्ही फक्त बातम्यांमध्ये जे लिहिलं जातं तेवढं वाचलं असेल तर तुम्हाला पुढील गोष्टी कळतील.
- आंबे खाऊन मुलं होतात म्हणणारे भिडे गुरुजी
- संभाजी भिडे की मनोहर कुलकर्णी?
- संभाजी भिडेंचा दंगलीत सहभाग
- संभाजी भिडे पुन्हा बरळले : म्हणे ज्ञानोबा-तुकोबा पेक्षा मनु श्रेष्ठ
- भिडे गुरुजी यांचा महिला पत्रकाराला टिकली साठी हट्ट
- तरुणांची माथी भडकवणारे संभाजी भिडे
यापुढेही अशा अनेक बातम्या दिसत राहतील. मात्र यात एक पॅटर्न observe करा, यातली एकही बातमी वैचारिक नाही. त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा अधिकृत विचार "राष्ट्रात निर्मू शिवसूर्यजाळ" यावर कधी चर्चा, विश्लेषण दिसणार नाही. त्यांच्या विरोधी विचारांशी त्यांची तुलना आढळणार नाही. यामागे कारण हे आहे, की महाराष्ट्रात हाही एक प्रमुख विचार आहे, हे मीडियाला लपवायचं आहे.
आंतरराष्ट्रीय वैचारिक चळवळींचा अभ्यास केल्यावर हा पॅटर्न अधिक चांगल्या प्रकारे समजतो. यासाठी एक उदाहरण घ्या:
समजा तुम्ही एक वेगळा सामाजिक विचार मांडत आहात. तुमच्या विचाराला लोकांनी समर्थन दिलं आहे, तुमच्या विचारांचे पुस्तकं, मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, हे सर्व काही तयार होत आहे. या साखळीतील प्रत्येक घटकाला आपापले फायदे मिळत आहेत. जसे की तुमच्या विचारानुसार साहित्य लिहिणाऱ्यांमुळे वक्त्यांना raw material (कच्चा माल) मिळत आहे, त्यांचे भाषण ऐकून लोक influence (प्रभावित) होत आहेत. त्या influence चा राजकीय पुढाऱ्यांना फायदा होत आहे, राजकीय सत्ता मिळाल्यावर त्यासाठी कष्ट घेणारे लेखक, पत्रकार, आणि विचार देणारे तुम्ही स्वतः, या सर्वांना यथायोग्य आर्थिक सामाजिक लाभ होत आहेत. हे सारं काही 15-20 वर्ष सुरू आहे. आता तुम्हाला सहजासहजी वेगळा विचार समाजात आलेला चालेल का? अजिबात नाही! त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.
जर सामाजिक विचार कोणत्या वर्गाला टार्गेट करण्यावर किंवा फूट पाडण्यावर आधारित असेल, तर तो maintain करणं अजूनच अवघड होऊन जातं. कारण द्वेष हा porn सारखा असतो. एकच दृश्य पुन्हा पुन्हा पाहून संवेदना बोथट होत जातात, त्यामुळे उत्तेजित होण्यासाठी वेगवेगळे दृश्य पाहावे लागतात. नवे दृश्य अधिक तीव्र, अधिक थरारक आणि वास्तवाच्या अधिकाधिक दूर जाणारे असतील तरच तो खेळ सुरू राहतो. मात्र यात ultimately माणूस गुरफटतो, स्वतःचं नुकसान करून घेतो.
त्याचप्रमाणे द्वेषावर आधारित चळवळ असते. उदा. ब्रिगेड ही संघटना बघा. त्या संघटनेने सुरुवातीला जे मुद्दे उपस्थित केले त्यात फक्त नाटककाराचा पुतळा पाडणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवणे, इतिहासकारांनी केलेल्या काही चुका दाखवून देणे असे कार्यक्रम होते. या गोष्टी बहुतांश लोकांना नैसर्गिक वाटायच्या. नवा विचार होता. पण त्याचा मूलाधार ब्राह्मणांचा द्वेष असल्याने तो छोटासा वैचारिक कार्यक्रम अपुरा ठरला.
मग नवनवे प्रयोग केले गेले. तर्कावर आधारित इतिहास लिहायचा म्हणून इतिहासातील प्रत्येक चुकीची गोष्ट ब्राह्मणांना चिटकवण्याचा प्रयत्न सुरू झाला, कारण पॉर्न प्रमाणे द्वेष वाढवत नेला तरच ते राजकीय थ्रिल मिळणार होतं. मग शिवरायांच्या मृत्यूसाठी ब्राह्मण जबाबदार, तुकोबांचा ब्राह्मणांनी खून केला, गुढीपाडवा ब्राह्मणांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूचा जल्लोष साजरा करण्यासाठी सुरू केला, हे सर्व जावईशोध कसल्याही पुराव्याशिवाय लावले गेले. एकच गुन्हा, 2 वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी केला असेल तर त्यातला ब्राह्मण शोधून गुन्हा फुगवायचे प्रकार घडले. समर्थ रामदास आतंकवादी ठरवले गेले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम जे एकाच मंदिराचे पाया आणि कळस समजले जात होते, त्यातही जात पाहायला शिकवलं गेलं. इतिहासात जे कृष्णाजी भास्कर सारखे शत्रुपक्षातील ब्राह्मण होते, त्यांचं चुकीचं काम बाजूला ठेऊन जात highlight केली गेली.
हे सर्व द्वेषाचे प्रोजेक्ट एकाच दिशेने टार्गेटेड होते. ब्राह्मणांचा द्वेष पसरवून anti brahmin vote bank तयार करणं.
मग त्यासाठी एकेक राजकीय घटक जोडायचा म्हणून इतिहासात त्या त्या घटकाला आपलेसे वाटेल असे घटनाक्रम जोडले गेले, चक्क काल्पनिक पात्रही बनवले गेले.
महाराजांच्या सैन्यात मुस्लिमांची चक्रवाढ व्याजासारखी वाढ सुरू झाली, अचानक फातिमा हे सावित्रीबाई फुलेंच्या पत्रातील नाव फातिमा शेख नावाच्या पूर्ण चरित्रात imagine केलं गेलं. कोणी महाराजांना बौद्ध म्हणायला लागला, कोणी वेगळा शिवधर्म काढायला लागला, कोणी मराठा हा धर्म आहे म्हणायला लागला. ज्याला जसा द्वेष पसरवून मजा येईल, तशा वेगवेगळ्या वैचारिक position घेतल्या गेल्या. हा खेळ खेळताना सर्वात मोठा फॅक्टर होता प्रत्येक वर्तमानातील आणि भूतकाळातील समस्येचं खापर ब्राह्मण समाजावर फोडणे. सरसकट ब्राह्मण समाज शिवद्रोही आहे असं चित्र तयार करणे. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजातून या गोष्टीवर अगदी नगण्य प्रतिक्रिया आली.
आता हा विचार साखळी बद्ध पद्धतीने सेट झालेला असताना 2014 मध्ये अचानक सत्ता बदलली. साखळीतील एक्स फॅक्टर गायब झाला. जे विचार सत्तेच्या मदतीने दाबून ठेवले होते, ते सत्ता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने समोर आले.
आता वर सांगितल्या प्रमाणे स्वतःला या ब्रिगेडी साखळीच्या केंद्रात ठेवून पहा. तुम्ही 20 वर्षे जो द्वेषाचा विचार पोसला, त्याला उभा छेद देऊन एक ब्राह्मण म्हातारा ज्याने स्वतःचं आयुष्य शिवशंभू चरणी वाहून घेतलं आहे, तो प्रकाशात येतो. कसलाही जातीय तिरस्कार न करता हिंदू एकतेच्या ध्येयमंत्राने लाखो धारकरी जमवतो. त्याच्या सोबत सर्व जातींचे शिवभक्त लोक मराठा ही प्रादेशिक ओळख म्हणून एकत्र येतात, शिवभक्त मुस्लिमांचा तयार केलेला ऐतिहासिक बुडबुडा औरंगाबादच्या नामांतरावरून फुटतो, ब्राह्मण म्हणजे शिवद्रोही या द्वेषाच्या पॉर्नला सुद्धा लोक बोर होतात.
अशावेळी तुम्ही काय कराल? तुमच्या द्वेषयुक्त चळवळीला धोका असलेले सर्व विचार कसे बालिश आहेत, चुकीचे आहेत, वाचायच्या-बघायच्या पण लायकीचे नाहीत हे संगण्याशिवाय तुमच्याकडे काही उपाय असेल का?
हीच गोष्ट सध्या ब्रिगेडी साखळीची झाली आहे. या साखळीने पूर्वी मुस्लिम द्वेषाचं स्टिकर भिडे गुरुजींना लावायचा प्रयत्न केला, पण लाखो धारकऱ्यांच्या सोबत मोहिमेत 1 मुस्लिम स्त्री अगदी सुरक्षित राहिली. धारकऱ्यांना रिकामे, अडाणी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला उत्तर दुर्गसंवर्धनाच्या कामातून आणि संपूर्ण नशामुक्तीच्या शपथेतून मिळाले.
अशा परिस्थितीत भिडे गुरुजी ह्या व्यक्तीच्या 100 वाक्यातील 2-3 शब्द out of context उचलून अवैचारिक आणि वैयक्तिक स्वरूपाची टीका करण्याची वेळ ब्रिगेडी साखळीवर आली आहे.
भिडे गुरुजींचे सर्व विचार पटण्यासारखे आहेत का?
माझं वैयक्तिक उत्तर आहे : नाही. पण तसे तर कोणत्याच एका व्यक्तीला कोणत्याच दुसऱ्या व्यक्तीचे विचार 100% पटत नसतात…
धारकऱ्यांमध्येही अनेक प्रकारचे लोक आहेत. काही मूळ विचार वाचणारे लिहिणारे आणि बोलणारे आहेत. काही अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करून निःस्वार्थ भावनेने शिवकार्यात सहभागी होणारे आहेत तर काही राजकीय प्रवाहानुसार वाहणारे आणि वाचन न करता मुस्लिम द्वेष म्हणजेच हिंदुत्व असं समजणारेही आहेत. पण ते fringe element असून तो त्या संघटनेचा मूळ विचार नाही. जेव्हा मोकळेपणाने विचारांवर चर्चा होईल, तेव्हा न पटणारे विचारही लोक मांडतीलच. पण यातही ब्रिगेडी साखळीचं नुकसान आहे. कारण जेव्हा ब्रिगेड आणि प्रतिष्ठान यांच्या विचारांची तुलना होईल, तेव्हा प्रतिष्ठानचे अनेक विचार स्वीकारलेही जातील. हे टाळण्यासाठी वैचारिक मुद्देच प्रकाशात न आणता तिसऱ्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे हा अजेंडा चालवला जातो. अनेक भोळे धारकरी त्या propoganda ला उत्तर देण्यात वेळ घालवतात. या प्रश्नोत्तराच्या खेळात प्रश्न विचारणारा तोपर्यंत जिंकत राहतो जोपर्यंत त्याच्याकडचे प्रश्न संपत नाहीत. ही गोष्ट सावरकरी चळवळीत प्रामुख्याने होत आली आहे. या खेळात फालतू प्रश्न उपस्थित करणाऱ्याच्या विचारावर काहीच चर्चा होत नाही. चर्चा होते ती फक्त उत्तर देणाऱ्यावर.
भिडे गुरुजी असं का बोलले, तसं का बोलले नाही, त्यांची डिग्री खरी की खोटी, ते भिडे की कुलकर्णी, या प्रश्नांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीशी काहीही संबंध नसतानाही भावनेच्या भरात ब्रिगेड्यांना उत्तरं दिली जातात, कधी मरामारीही केली जाते. पण ब्रिगेड्यांना प्रश्न मात्र कोणीच विचारत नाही.
जेव्हा त्यांना तितक्याच हट्टाने प्रश्न विचारले जातील, तेव्हा कळेल की ब्रिगेडी चळवळीचं मूळच जातीय द्वेष आहे. ज्या दिवशी धारकऱ्यांना हे कळेल, की उत्तर आपल्या स्वतःच्या लोकांना द्यायची असतात आणि प्रश्न आपल्या विरोधकांना करायचे असतात, त्या दिवशी भिडे गुरुजींची बदनामी आपोआप थांबेल आणि मूळ वैचारिक विषयांवर चर्चा सुरू होईल. पण त्यांची संयमाची आणि लेखन-वाचनाची तयारी आहे का?
"दिसमाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।"
हे समर्थांनी उगाच सांगितले नव्हते. त्याशिवाय गत्यंतर नाही…
✍️ प्रथम उवाच
3 Comments
👍🏻
ReplyDelete👑👍🏻
ReplyDeleteदादा शिर्षक सुधारून घ्या...
ReplyDeleteसंभाजी भीड झालंय ते बदला