टिळक : लोकमान्य की अमान्य?


लोकमान्य टिळक हेही ज्योतिराव फुलेंप्रमाणेच संमिश्र मतमतांतरे असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांना ते पूज्य वाटतात कारण त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही गर्जना केली, देशाला त्यांच्या रुपात एक राष्ट्रीय नेतृत्व मिळालं. आजपर्यंत कोणत्याही आधुनिक काळातील मराठी नेत्याने राष्ट्रीय पातळीवर जनमत मिळवलेलं दिसत नाही. सावरकर, आंबेडकर, फुले, आणि इतर अनेक लोक वैचारिक दृष्टीने आज महत्त्वाचे असले, तरीही त्यांच्या काळात समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभा राहिला नाही. ती लोकमान्यता टिळकांना मिळाली. 

मात्र, अनेकदा टिळकांचे शाहू महाराजांशी झालेले वाद, शिवसमाधी साठीचा भ्रष्टाचार, सयाजीराव गायकवाड महाराजांचा वाडा लुबाडणे, पोथीनिष्ठता, त्यांचे शूद्रांबद्दल आक्षेपार्ह विचार होते, टिळकांनी ब्राह्मण मराठा वाद वाढवला असेही अनेक आरोप त्यांच्यावर केले जातात. 

मागे ज्योतिराव फुलेंचं केलं (link) , त्याप्रमाणे टिळकांच्याही चरित्राची संक्षिप्त पाहणी केली पाहिजे असं मला वाटतं.

जीवनप्रवास:

टिळक हे गरीब घरात जन्मलेले नव्हते. त्यांच्या वडिलांना श्रीमंत म्हणता येत नसले, तरीही शिक्षणाचा खर्च निघेल एवढी धनसंपदा नक्कीच त्यांच्याकडे होती. थोडक्यात टिळक मिडल क्लास कुटुंबातून येत होते, व त्यांच्या चित्पावन ब्राह्मण असण्याने घरात शिक्षणाला फार महत्त्व होतं. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये गणित व संस्कृत विषयात पदवी (Bachelors) आणि पुढे मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं. पत्रकार, शिक्षक, संस्थाचालक, राजकीय आंदोलक आणि लोकमान्य नेता अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. (1)

संस्थानांशी संबंध :

मराठेशाहीतील उरल्यासुरल्या वैभवाचं प्रतीक म्हणजे इंग्रजांच्या काळातील संस्थाने. शिंदे, होळकर, गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती, औंध, नागपूर आणि अशी अनेक मराठी संस्थानं त्याकाळात अस्तित्वात होती. बहुतांश संस्थानांच्या राजांशी टिळकांचे उत्तम संबंध होते. केसरी व मराठा ही टिळकांची वृत्तपत्रे त्याकाळी आवर्जून या संस्थानांमध्ये वाचली जायची. आजच्या काळात influencer मार्केटिंग जशी चालते, त्याच प्रकारे टिळकांनी बडोद्याच्या गायकवाड घराण्याची सत्ता लुबाडण्याचा इंग्रजांचा डाव उधळला होता. 

सयाजीराव गायकवाड महाराज हे टिळकांचा प्रचंड आदर करत असत. टिळकांची व महाराजांची एक गुप्त भेट बडोद्यात झाल्याची व त्याच भेटीत इंग्रजांना संशय न येता पुण्यातील केसरीवाडा टिळकांना दान करण्याची चर्चाही झाली होती हे बाबा भांड यांनी लिहून ठेवले आहे. अनेक प्रसंगात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांनाही गायकवाड महाराजांनी मदत केल्याचे उदाहरण आहेत. 

अनेकदा या सरदारांचे आपापसात पटत नसतानाही टिळकांनी सर्वांशी चांगले संबंध बनवून ठेवले होते. उदा. शिंदे व गायकवाड कुटुंबात आपापसात वाद चालायचे. मात्र टिळकांचे संबंध दोघांशीही चांगले होते. 

सयाजीराव गायकवाड महाराजांची भूमिका जशी क्रांतिकारकांना मदत करण्याची होती, तशी कोल्हापूरच्या शाहू महाराजांची नव्हती. गायकवाडांचं बडोदा संस्थान ज्याप्रमाणे क्रांतिकारकांसाठी safe place असायचं, त्याच्या उलट परिस्थिती कोल्हापूरची होती. शाहू महाराजांचा मार्ग इंग्रजी सत्तेच्या विरोधात न जाता सुधारणा करण्याचा होता. तरीही वेदोक्त प्रकारणापूर्वी शाहू महाराज आणि टिळक यांचे विरोधी संबंध नव्हते. 

सामाजिक भूमिका:

सामाजिक दृष्टीने टिळक हे पोथीनिष्ठ व कसल्याही सुधारणेला विरोध करणारे होते. जातीव्यवस्था, वर्णाश्रम, जातीनिहाय व्यवसाय हे सर्व टिळकांना योग्य वाटायचं. आणि ही गोष्ट त्यांना सर्व वर्गांसाठी वाटायची. उदा. शूद्रांनी लिहिण्यावाचण्याचं, विशेषतः इंग्रजीचं शिक्षण घेऊ नये कारण ते ब्राह्मणांचं काम आहे असं त्यांना वाटायचं. त्याचबरोबर पुण्यात अनेक ब्राह्मणांनी हेअर सलून वगैरे उघडल्यावर त्यालाही टिळकांनी न्हाव्यांचा धंदा बुडवू नका म्हणत विरोध केला होता. 

अशा भूमिका आजच्या काळात समर्थन करण्यासारखा अजिबात नसून टिळकांना गुरू मानणाऱ्या सावरकरांनीच या जातिनिष्ठ व्यवस्थेचा विरोध आणि धिक्कार केला होता. मात्र, टिळकांचे चरित्र या एका मतापूरते मर्यादित नक्कीच नाही. 

या पोथीनिष्ठतेचा परिणाम म्हणूनच शाहू महाराजांशी वेदोक्त प्रकारावरून त्यांचे वाद झाले, त्यावर प्रकाश टाकुच. मात्र या जातीव्यवस्था पाळण्याच्या नादात त्यांना स्वतःलाही मनस्ताप झालेला आहे त्यावर फारशी चर्चा होत नाही. 

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा नवरा म्हणजेच गोपाळ जोशी यांना सुधारणेच्या कामांची आवड होती, मात्र कोणत्याही गोष्टीत अति विनोद करणे हा त्यांचा स्वभाव होता. वाटेल तेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा, नंतर गंध लावून त्याच ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या समोर मिरवायचं असे उद्योग ते करत असत. त्यांनी एकदा पुण्यातील  चर्च मध्ये स्वतःचं व्याख्यान आयोजित केलं आणि अनेक मोठ्या व्यक्तींना निमंत्रण दिलं. टिळकांसह अनेक सुधारक, नास्तिक वगैरे अनेक लोक व्याख्यानाला गेले. तिथे ऐनवेळी सगळ्यांना चहा देण्यात आला. मानाने दिलेला चहा टाळताही येईना, टाकताही येईना म्हणून टिळकांसह अनेकांनी तो चहा पिला. आज आपल्याला ही अतिसामान्य गोष्ट वाटत असली, तरीही चर्च मधील विहिरीच्या पाण्यानेच धर्मांतराचा विधी पार पडत असे. त्याचा चहा पिणे म्हणजे म्हणजे धर्म बाटला की काय अशी शंका लोकांच्या मनात आली. त्यावर कोर्ट कचेऱ्या, शंकराचार्यांना पत्र लिहिणे, असे अनेक प्रकार झाले. टिळकांना काशीला जाऊन प्रायश्चित्त घेऊन यावे लागले व तसे लिहून द्यावे लागले तेव्हा त्यांची या "गुन्ह्यातून" मुक्तता झाली. 

पण त्यांची पोथीनिष्ठता न स्वतःच्या साठी सुटली न शाहू महाराजांच्या. वेदोक्त प्रकरण म्हणजे शाहू महाराजांच्या अंघोळीचा किस्सा असून अंघोळ करताना मंत्र वेदांमधून म्हणायचा की पुरणातून म्हणायचा यावरून तो वाद झाला होता. शाहू महाराजांच्या दरबारातील ब्राह्मणाने दत्तकपुत्र असलेल्या महाराजांना क्षत्रिय म्हणायचं की नाही अशी शंका उपस्थित केली होती. टिळकांनीही केसरी मध्ये या वादात अनावश्यक उडी घेत पोथीपुराणात काय लिहिलं आहे ते ठामपणे सांगायला सुरुवात केली. हे प्रकरण पाहून बडोद्याच्या गायकवाड महाराजांनीही एका पूजेत वेदोक्त मंत्रांचा आग्रह धरला. आणि नंतर स्वतःच बिनकामाचा वाद नको म्हणून सोडूनही दिला. 

वास्तविक पाहता वरचे दोन्ही प्रसंग अतिशय निरर्थक, वेळ वाया घालणारे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर "crap" होते. पण या प्रसंगातून टिळकांचे आणि शाहू महाराजांचे संबंध फार बिघडले. 

आर्थिक भूमिका

टॅक्स भरणारे लोक कायम भरडले जातात ही गोष्ट लक्षात येऊन टिळकांनी टॅक्स सुधारणेसाठी आवाज उठवला. त्याकाळात सर्वाधिक टॅक्स भरणारा शेतकरी वर्ग होता. आजच्यासारखी शेती टॅक्स फ्री नव्हती. तेव्हा टिळकांनी टॅक्सचे पैसे सरकाने युरोपात न पाठवता भारतात उद्योग पूरक वातावरण तयार करण्यासाठी वापरावे अशी भूमिका घेतली. 

त्याहून आश्चर्य म्हणजे टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रात सर्वप्रथम कम्युनिस्ट विचार मराठीत मांडणारा लेख लिहिला गेला होता. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कार्ल मार्क्स चे विचार मोलाचे आहेत असं त्यांना वाटायचं. कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या AITUC (All India Trade Union Council ) या संघटनेचे टिळक उपाध्यक्ष होते. मात्र त्यांनी अतिशय स्पष्टपणे मी स्वतः कम्युनिस्ट नसून फक्त माझ्या देशातील गरीब कामगारांच्या हितासाठी काम करू इच्छितो अशी भूमिका घेतली होती. या गोष्टींचा अण्णाभाऊ साठेंवरही प्रभाव पडलेला असून त्यांनीही टिळकांवर स्तुती करणाऱ्या कविता रचल्या आहेत. त्यासोबतच केसरीवाड्यात मातंग समाजाने टिळकांचा पान सुपारी देऊन जाहीर सत्कार केल्याचे चित्रही उपलब्ध आहे. टिळकांना 'तेल्या-तांबोळ्याचे पुढारी' असेही म्हंटल्या जात असे. वसईतील मराठा, माळी व इतर जातीतील गरीब लोक टिळकांना पाहण्यास व त्यांचे विचार ऐकण्यास इच्छुक आहेत या आशयाचं पत्रही उपलब्ध आहे. (लोकमान्य टिळक चरित्र खंड 2, न चि केळकर)

या सर्व साधनातून काही गोष्टी स्पष्ट होतात, 

1. टिळक हे कर्मठ पोथीनिष्ठ ब्राह्मण होते, त्यांचं जातीव्यवस्थेला समर्थन होतं, मात्र अस्पृश्यतेला समर्थन नव्हतं. 

2. अनेकदा टिळकांना भटमान्य म्हंटले जाते, मात्र ही वस्तुस्थिती नसून त्याकाळी सर्व जातीय हिंदू, कम्युनिस्ट व मुहम्मद अली जिना सारखे मुस्लिमही टिळकांच्या नेतृत्वाला मानत होते. (टिळकांच्या एका केस साठी जिनाने वकिली केली होती)

टिळक आणि शिवचरित्र

वेदोक्त प्रकरण ज्या पद्धतीने घडले त्यावरून टिळकांना सरसकट मराठाविरोधी ठरवले जाते. मात्र टिळकांच्या भूमिकेमागे त्यांची अतिरेकी पोथीनिष्ठा होती हेच वास्तव आहे. पोथीनिष्ठ व्यक्ती स्वतः सुद्धा काटेकोर श्रुती-स्मृती-पुराण यांच्यानुसार चालते व इतरांनाही भाग पाडते. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. मात्र याचे परिणाम इतिहासात नेहमी वाईटच झाले आहेत हेच यातून शिकण्यासारखे आहे. ते न करता आजचे पुरोगामी त्यांच्या अजेंड्यावर चालत टिळकांना Anti Maratha सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर मात्र काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

शिवसमाधीचा जीर्णोद्धार करून त्यावर मेघडंबरी उभी करावी असं टिळकांचं स्वप्न होतं. त्यासाठी टिळकांनी सर्वप्रथम प्रयत्न केले, पैसेही जमवले मात्र ज्या बँकेत ते पैसे जमा झालेले होते ती बँक मात्र बुडाली. मात्र त्यांनी स्थापन केलेलं रायगड स्मारक मंडळ आजही कार्यरत असून त्यांचं शिवकार्य आजही सुरू आहे. 

त्याशिवाय टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेले देऊसकर नावाचे शिक्षक बिहार मध्ये काम करत असत. शिवजयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी झाली पाहिजे हा विचार त्यांना इतका भावला, की त्यांनी बंगाल मध्ये जाऊन बंगाली शिकून बंगाली भाषेत शिवचरित्र लिहिले. बंगालमध्ये शिवजयंती सुरू केली. त्यानंतर कलकत्ता येथे झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात टिळकांनी जोरदार अध्यक्षीय व्याख्यान दिले. त्याशिवाय मुस्लिमांच्या हातून शिवचरित्राच्या पाच हजार प्रति मोफत वाटून घेतल्या. लाला लजपतराय यांनाही शिवचरित्राची गोडी लागली व त्यांनी पंजाबात शिवचरित्र छापले. त्यासाठीचे संदर्भग्रंथही त्यांना टिळकांनी पाठवले होते. 1905 साली जपानमध्येही टोकियो शहरात टिळकांच्या समर्थकांनी शिवजयंती त्याकाळात साजरी केली होती. हा शिवचरित्राचा झंझावाती प्रचार टिळकांनी केला, मात्र याचे श्रेय त्यांना क्वचितच दिले जाते. टिळकांच्या आर्थिक आयुष्याला बरबाद करणारा शेवटचा खटलाही त्यांच्यावर याच कारणाने झाला होता, की त्यांनी अफ़जलखान वधाची झाकी एका कार्यक्रमात दाखवली. टिळकांच्या मते शिवजयंती हा हिंदूंचा धार्मिक उत्सव होता व शिवचरित्रातील सर्व गोष्टींपासून प्रेरणा घेणे हा हिंदूंचा धार्मिक अधिकार होता. त्या खटल्यात टिळकांचा विजय झाला असला, तरीही केस हरल्यानंतर त्यासाठीचा खर्च टिळकांना द्यायला इंग्रजांनी नकार दिला. त्या शेवटच्या काळात टिळकांच्या लेखणीची धारही कमकुवत झालेली होती. 

त्यादरम्यान घडलेल्या अनेक दलितसमर्थक घटना यांवर टिळकांनी समर्थन किंवा विरोध करणारेही काहीही छापले नाही असेही आरोप त्यांच्यावर करण्यात आले. यामागे टिळकांची पोथीनिष्ठता होती, की संभाव्य आर्थिक मदतीमुळे कोणालाच न दुखावण्याचे धोरण, याचे उत्तर काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. कमालीचे टिळकविरोधी असलेल्या ज्योतिराव फुलेंनीही एका केसमधून टिळकांना जामीन मिळवून दिला होता. 

मग दलितांना आधुनिक शिक्षणासाठी विरोध करणाऱ्या, शाहू महाराजांना वेदोक्त नाकारणाऱ्या टिळकांचा विरोध करायचा, की निष्ठेने शिवचरित्रप्रसार करणाऱ्या, दलित कामगारांच्या एकजुटीसाठी झटणाऱ्या तेल्या तांबोळ्यांच्या नेत्याचा सन्मान करायचा?

याचे एका वाक्यात उत्तर आहे सन्मान. काळाचा context पाहता टिळकांनी ज्या पोथीनिष्ठतेचा प्रचार केला, त्या गोष्टींना कसलेही समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेषतः ब्राह्मणांनी फक्त एखादी गोष्ट टिळक म्हणाले आहेत म्हणून त्याला defend करण्यात काहीही अर्थ नसून वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक मतांचा relevance काळानुसार बदलत राहतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कम्युनिस्टांच्या विरोधाचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा मार्क्सपेक्षा बुद्ध बरा म्हणणारे आंबेडकर अधिक योग्य ठरतात; तर टिळकांची extreme पोथीनिष्ठा व आंबेडकरांच्या शेवटच्या काळातील हिंदुद्वेष यांपेक्षा शाहू महाराज व सावरकरांच्या भूमिका balanced वाटतात. पण हे तेव्हाच दिसू शकेल जेव्हा महापुरुषांना शिव्या देणारे आणि त्यांना defend करणारे दोघेही स्वतःच्या जातीचा चष्मा बाजूला ठेवतील. तेव्हाच कोणाकडून नेमकं काय शिकायचं हे आपल्याला कळू शकेल.

वेदोक्त आणि इतर तत्सम प्रकरणे या गोष्टी टिळकांच्या चरित्रात कमी महत्त्वाच्या असून त्यांची मूळ ओळख राजकीय पूर्ण स्वराज्याची मागणी करणे, बंगालची फाळणी रोखणे, सर्व विचारांच्या नेत्यांना एकत्र आणणे, देशासाठी प्रदीर्घ तुरुंगवास भोगणे, व जातीव्यवस्था पाळूनही सर्व जातीच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणे यात आहे, आणि त्याच गोष्टी टिळकांना लोकमान्य बनवतात. तेव्हा कोणत्याही महापुरुषाप्रमाणे टिळकांच्याही व्यक्तिपूजेला थारा न देता सर्व आयोग्य गोष्टी लक्षात ठेवून चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा घ्यावी यातच शहाणपण आहे. लोकमान्य टिळकांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

✍️ प्रथम उवाच

संदर्भ: 

जपानमधील शिवजयंती - लोकमान्य टिळक यांचे चरित्र उत्तरार्ध खंड 2 (न चि केळकर) पृष्ठ 215

कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कामगार संघटनांचे उपाध्यक्ष:
Jadhav, Praveen. "Lokmanya Tilak-Labour Movement." Nehru Institute of Social Sciences, Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune.

शिवसमाधी शोध :



Post a Comment

0 Comments