भाषेच्या द्वेषाचे गाढव : एक उदाहरण


सध्या महाराष्ट्रारात मराठी संवर्धनासाठी मानला गेलेला सर्वात हास्यास्पद उपाय म्हणजे हिंदीचा तिरस्कार मानला जात आहे. जगातल्या कोणत्याही "क्ष" भाषेचा तिरस्कार करून कोणतीही "य" भाषा जपली जात नाही. फक्त भांडण आणि वादविवाद तयार होतात. तिरस्कार करणाऱ्या सरसकट 100% लोकांना विषयाची काहीही जाण नसते. याची आज पुन्हा प्रचिती आली. त्यासाठी हा संवाद जशास तसा वाचा.

स्टोरीवरून भांडायला आलेला हा इसम जे काही बोलतोय, ते नीट वाचा. मला त्याची प्रसिद्धी किंवा बदनामीकरण्याची इच्छा नाही, त्यामुळे सर्व स्क्रीनशॉट वरील नाव क्रॉप केले आहेत. याचा केवळ शैक्षणिक हेतूने वापर करावा. 


संदर्भ असा आहे, की हिंदी भाषेमुळे हिंदी बोली (ज्यांना हा इसम भाषा समजत आहे) त्या नष्ट होत आहेत असा फुटीरतावादी narrative जाणीवपूर्वक पसरवला जातो. त्याला बळी पडलेल्या व्यक्तीशी झालेला हा संवाद आहे. हिंदी मुळे मराठी नष्ट होईल असा यांचा समज असून त्यामुळे हे महोदय हिंदी भाषेचा प्रचंड द्वेष करत आहेत



इथे ह्या व्यक्तीचा फार मोठा गैरसमज झाला आहे, की बोली आणि भाषा ठरवताना भाषिक उत्पत्ती हाच एक फॅक्टर असतो. याचा खुलासा मी शेवटी करेल. तरीही, पुढे वाचा.


माझी शंका खरी करण्यासाठी मी वारंवार फरक विचारत होतो. पण भरकटलेल्या व्यक्तींना फक्त ठराविक साचेबद्ध विचारच माहीत असल्याने समोरचा नेमकं काय बोलत आहे, हे ऐकून घेण्याची मानसिकता नसते. त्यांना फक्त आपल्याला माहीत असलेली उत्तरे कोणत्याही प्रश्नाला चिटकवून द्यायची असतात.


मी वारंवार फरक विचारूनही उत्तर काय आलं आहे बघा:


यावर कठोर शब्दात विचारूनही उत्तर शेवटपर्यंत आलं नाही. पण वादविवाद मात्र बरोबर सुरू झाले. वर सांगितल्याप्रमाणे ही एक मूर्खपणाची क्लासिक केस आहे. 

या संवादाच्या सुरुवातीलाच माझ्यावर वेगवेगळी लेबल लावून अपमानास्पद स्टोरी ठेवण्यात आली होती. सहसा मी अशा ट्रोलभैरवांना उत्तर देत नाही, पण यावेळी खास शैक्षणिक हेतूने काही मुद्दे दाखवता यावेत यासाठी हा संवाद केला. थोडीशी चिथावणी दिली की लोक कसे offend होऊ शकतात ते दाखवण्यासाठी जराशी शिवराळ भाषाही यात आहे.

या एका संवादावरून कोणताही निष्कर्ष काढून भांडायला लागलात, तर तुमचं पुन्हा तेच होईल जे आता झालंय. (मूर्खपणाची केस स्टडी). त्यामुळे आता शांतपणे काही गोष्टी लक्षात घ्या:

बोली आणि भाषा यात फरक काय?
बोली म्हणजे विशिष्ट प्रदेशातील लोकांनी संवादासाठी वापरलेलं भाषेचं एक मौखिक लघुरूप असतं. यात केलेल्या लिखित रचना मूळ भाषेच्या तुलनेत अत्यल्प असतात. याउलट भाषेला पुढील वैशिष्ट्य असतात:
1. व्याख्या : अमुक शब्द, वाक्य अमुक प्रकरेच बोलले लिहिले वाचले गेले पाहिजेत अशी रचना

2. सामायिक आकलन : एकाच भाषेच्या 2 बोली ती भाषा जाणणारा माणूस अंदाज बांधून समजू शकतो. पण 2 वेगवेगळ्या भाषा मात्र अशाप्रकारे समजता येत नाहीत. उदा. वैदर्भीय बोली पुणेरी माणसाला कसलाही अभ्यास न करता समजते. पण तामिळ भाषा येते म्हणून कन्नड भाषा समजेल याची काहीही शाश्वती नाही

3. मानकीकरण (Standardization) : भाषा ही बहुतांश वेळा मानकीकृत असते. उदा. ज्ञानेश्वरांची मराठी, तुकोबांची मराठी, समर्थांची मराठी, शिवकालीन पत्रातली मराठी आणि आपण आज जी बोलतो लिहितो ती मराठी exactly same नाही. मराठी ही भाषा असल्याने त्याचे मानक ठरवले गेले आहेत. मराठीला आजच्या काळात लिहिण्याचे, उच्चाराचे असे अधिकृत शासनमान्य नियम आहेत. त्या नियमांमुळेवेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या मराठी माणसांच्यालेखनात सुसूत्रता येते. त्यामुळे मराठीत अधिकृत व्यवहार/ ऑफिशियल वर्क शक्य होते.

4. प्रशासकीय मान्यता व सांस्कृतिक ओळख :
महाराष्ट्र शासनाची कामकाजाची भाषा मराठी आहे. त्यामुळे अधिकृत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची बोली कोणतीही असली, तरीही त्याला त्यातच लेखन करावे लागते. "माझी बोली कोंकणी आहे, म्हणून कोकणातील सरकारी कार्यालयात कोकणी पद्धतीचे लिखीत आदेश निघतील" असले प्रकार आपण करू शकत नाही. त्याशिवाय मराठी भाषेचे मीडिया, शिक्षण संस्था, साहित्य मंडळ, शब्दकोश या सर्व गोष्टींनाही शासकीय मान्यता आहे. उदा. मराठवाडी बोली वापरून कोणती शाळा उभारली जात नाही.

यातील सर्व मुद्दे भाषेच्या बाबतीत लागू होतात. पण बोलीच्या बाबतीत यातील 0 किंवा ठराविकच मुद्दे लागू होतात. उदा. अहिराणी बोली साठी शब्दकोष आहे, साहित्य चळवळ आहे, पण इतर गोष्टी नाहीत. 

एक भाषा तिच्याच बोलीवर आक्रमण करू शकते का?
याचं एका शब्दात उत्तर आहे : नाही.
भाषा ही बोलींच्या मानकीकरणातून बनलेली असते. आजच्या शासकीय अधिकृत मराठीवर पुणेरी बोलीचा वरचष्मा आहे. कदाचित भविष्यात वेगळ्या कोणत्या बोलीला अधिकृत मान्यताही मिळेल. ही अधिकृतता तेव्हा मिळते जेव्हा ती बोली बोलणारे लोक मोठ्या संख्येने शासकीय आणि साहित्यिक दोन्ही क्षेत्रात मोठ्या संख्येने असतात. त्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येक बोलीला अधिकार आहे. दुर्दैवाने सध्या ही गोष्ट लक्षात न घेता प्रमाण विरुद्ध बोली असा संघर्ष पाहायला मिळतो. वस्तुतः मराठीला दोन्हीची तेवढीच गरज आहे. पण हा विशिष्ट शहरात चालणारा फुटकळ संघर्ष भाषेवर आक्रमण ठरत नाही. अहिराणी प्रदेशात अहिराणी आजही बोलली जाते. प्रमाण मराठीनुसार तिचेही स्वरूप काळानुसार बदलत राहील, पण याला भाषिक उत्क्रांती म्हणतात. भाषिक आक्रमण नाही. 

हीच गोष्ट हिंदीच्या बाबतीतही लागू होते. काळजीपूर्वक बघितल्यास बोली आणि भाषा यांसाठी जे 4 मुद्दे सांगितले, त्यात भाषेची उत्पत्ती हा मुद्दा कुठेही येत नाही. वेगवेगळ्या roots पासून तयार झालेल्या वेगवेगळ्या बोलींसाठी एक छत्र भाषा म्हणूनच हिंदीचा राजकिय उगम झालेला आहे. अवधी, ब्रज, भोजपुरी या बोलींच्या शाळा, मीडिया, लेखनासाठी सरकारी मान्यता, या गोष्टी उपलब्धच नव्हत्या. हे सर्व वेगवेगळ्या बोलींसाठी करणं फार अवघड होतं, कारण त्या बोली एकमेकांना समजेल अशा होत्या, परंतु individually कोणतीच बोली मोठ्या प्रदेशात बोलली जात नव्हती. त्यामुळे मागील 200 वर्षात त्या बोलींच्या आणि संस्कृतच्या मिश्रणातून तयार झालेली हिंदी भाषा देशातील खूप मोठ्या वर्गाला जोडणारी ठरते. ऐतिहासिक दृष्टीने मराठीचं आजचं रूप असो, की हिंदीचं आजचं रूप असो, दोन्ही सुद्धा नवीन आहे. आजच्या अधिकृत भाषांपेक्षा अनेक बोली या जुन्या असणं साहजिकच आहे. याचा भाषिक आक्रमनाशी संबंध जोडणं चूक आहे. 

हिंदी भाषेमुळे एका सुलभ भारतीय भाषेचा पर्याय उपलब्ध झालेला असून हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नसली, तरीही जनभाषा झाली आहे. 200 वर्षांच्या हिंदी शिक्षणानंतरही घरगुती पातळीवर बोली भाषेत संवाद चालतात. महाराष्ट्रात राहणारे अनेक मारवाडी बांधव बाहेर मराठी/हिंदी बोलतात, पण घरी मारवाडी बोलीत संवाद साधतात. जर भाषिक आक्रमणाचा थोतांड सिद्धांत खरा असता, तर हे शक्य झालं असतं का?

हिंदीच्या प्राबल्यानंतरही भोजपुरी लोकांनी आपली बोली ही भाषेत establish करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. थेट बिहारमध्ये हिंदी विरुद्ध कोणताही द्वेष न पसरवता जर भोजपुरी भाषा वाढू शकते, तर हिंदीपासून कोणत्याही भारतीय भाषेला काहीही धोका नाही हेच सत्य सिद्ध होत आहे. हिंदी भाषिक लोकांनी हिंदीला राष्ट्रभाषा समजण्याचा हट्ट आणि इतर भाषांच्या अपमानाचा माज सोडला तर हे सांगणं अजूनच सोपं होईल. बाळासाहेब ठाकरेंनी याबाबत आणि मराठी पाट्यांच्या बाबतीत ज्या भूमिका घेतल्या, त्या हिंदी भाषेविरोधात नव्हत्या, तर हिंदी लोकांनी केलेल्या अरेरावीच्या विरोधात होत्या. 

मात्र काही हिंदी भाषिक लोकांच्या चुकांमुळे हिंदी भाषेची उपयुक्तता कमी होत नाही, हेही तितकेच सत्य आहे. टागोर, सावरकर, आंबेडकर इत्यादी सर्व विचार वंतांनी हिंदीचे महत्त्व सांगून ठेवले आहे.

या एका संवादाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मला काहीही निष्कर्ष काढायचा नाही, मात्र ह्या मानसिकतेचं एक छोटं उदाहरण देणं हाच माझा हेतू आहे. मराठी संवर्धन आणि हिंदी द्वेष या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मराठी संवर्धनासाठी मराठी भाषा, संस्कृती आत्मसात करून जगावी लागते. असं केल्याने मराठी भाषा समृद्ध होते. पण हे करताना कोणत्याही भाषेचा तिरस्कार करा असं जर कोणी म्हणत असेल, तर त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे कारण भाषिक संघर्ष हा देशविघातक फुटीरतावादी राजकारणाची पहिली पायरी आहे.

✍️ प्रथम उवाच

Post a Comment

0 Comments