बसवेश्वरांनी लोकशाही सांगितली, पण लोकशाहीला बसवेश्वर कोण सांगणार?
जन्म आणि प्रारंभिक जीवन
बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३१ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी (आता बसवन बागेवाडी) येथे एका वीरशैव ब्राह्मण कुटुंबात झाला. मात्र त्यांनी उपनयन (मुंज) विधी केला नाही. त्यांना वैदिक कर्मकांडाचा त्याग केला. परंतु वैदिक किंवा इतर कोणत्याही ज्ञान परंपरेचा अपमान कधीही केला नाही.
शिक्षणासाठी बसवेश्वर कुडलसंगम येथे गेले व तिथे त्यांनी विविध तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे आणि भाषांचा अभ्यास केला. बसवेश्वर हे प्रखर शिवभक्त होते. त्यांनी लिंगदीक्षा पद्धतीचा पुरस्कार केला.
ज्याप्रकारे महाराष्ट्रात संत परंपरेने जातीय उच्चनीचता सोडून सर्व हिंदूंसाठी एकतेचा संदेश दिला, त्याच प्रकारे कर्नाटकात बसवेश्वरांनीही वर्णव्यवस्था नाकारून लोकांना समतेचा संदेश दिला.
समाजसुधारणा आणि 'अनुभव मंडप'
बसवेश्वरांनी बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण येथे "अनुभव मंडप" या अद्वितीय लोकशाही मंचाची स्थापना केली, जिथे सर्व जातींचे, पंथाचे लोक एकत्र येऊन समाजसुधारणेवर विचारमंथन करत.
- स्त्री-पुरुष समानता
- श्रमप्रतिष्ठा (कायकवे कैलास)
- भेदमुक्त अध्यात्म
यांचा त्यांनी प्रचार केला.
बसवेश्वर हे थोर समाजसुधारक होते, पण त्यांच्या सुधारणा एका वर्गाला टार्गेट करून राजकारण करणाऱ्या नव्हत्या. ज्या वैदिक कर्मकांडाचा स्वतः बसवेश्वरांनी त्याग केला होता, त्या वैदिक विद्वानांचे सुद्धा अनुभव मंडपात चर्चेसाठी आदराने स्वागत होत असे.
लिंगायत पंथ आणि त्याची वैशिष्ट्ये
बसवेश्वरांनी लिंगायत पंथाची स्थापना करून एकेश्वरवादी, निर्गुण, निराकार शिवभक्तीला प्राधान्य दिले.
या पंथात जातीभेद नाही, कर्मकांड नाही, स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्यक्ष कर्माला महत्त्व आहे
वीरशैव आणि लिंगायत यांच्यातील भेद
कालांतराने बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या वीरशैव-लिंगायत विचारसरणीपासून लिंगायत हा पंथ वेगळा झाला. ही गोष्ट हिंदू समाजात अगदी सामान्य आहे. परंतु, लिंगायत हे हिंदूच नाहीत हे जनमत तयार करण्याचे प्रयत्न मागच्या काही वर्षांत सुरू झाले. हे सर्व प्रयत्न काही सेक्युलर लोकांच्या हिंदू धर्माला विभाजित करण्याच्या अजेंड्याला धरून आहेत.
विशेष म्हणजे, स्वतः लिंगायत पंथाचे धर्मगुरू व आध्यात्मिक नेते याच्या विरोधात असतानाही मीडियामध्ये सतत लिंगायत हिंदू नसून हा वेगळा धर्म आहे हे वातावरण पद्धतशीरपणे पेरले जात आहे.
वेदांना नाकारणारे लिंगायत हिंदू कसे?
हिंदू धर्म हा जीवनपद्धतीवर आधारित आहे. इथे कोणता एक प्रेषित, एक धर्मग्रंथ नाही. वेगवेगळ्या तत्वज्ञानाचे लोकही सामंजस्याने एका धार्मिक व्यवस्थेत राहू शकतात – हेच हिंदू तत्त्वज्ञान आहे.
महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपातून हीच गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणली. त्यामुळे त्यांना हिंदू जीवनपद्धतीपासून तोडणे कसे शक्य आहे?
वेदांना नाकारणे म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणे. हिंदू धर्मात असे अनेक संत आहेत ज्यांनी वेदप्रामाण्य नाकारले आहे, आणि तरीही ते हिंदू परंपरेत सामीलच आहेत.
बसवेश्वरांनी वैदिक कर्मकांड नाकारले, चांगले वैदिक विचार नाही. त्यांचा एकेश्वरवाद विवेकानंदांच्या वेदान्ताशी जवळचा आहे, ज्याचे मूळ उपनिषदांमध्ये – म्हणजेच वैदिक साहित्यात – सापडते.
तात्पर्य
शंकराची उपासना करणारे लिंगायत जर हिंदू नसतील, तर जगात कोणीच हिंदू असू शकणार नाही. म्हणूनच मीडियाच्या व राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या प्रचारापासून सावध राहण्याची गरज आहे.
हिंदू समाजाची दिशा काय असावी?
लिंगायत हिंदू आहेत की नाही, याचा निर्णय धर्माच्या जाणकारांवर सोडून देऊन – बसवेश्वरांची कीर्ती जागतिक स्तरावर कशी नेता येईल, हाच सामान्य हिंदूने विचार करण्याचा मुद्दा आहे.
१२व्या शतकात कोणताही सोशल मीडिया नसताना, काश्मीरची राजकुमारी बोंतादेवी लिंगायत विचारांनी प्रभावित होऊन कर्नाटकात आली आणि वचन रचले.
आजच्या युगात जेव्हा लोकशाहीच्या इतिहासाची चर्चा होते, तेव्हा फ्रांसचा रुसो आणि ग्रीक नगरराज्यांची नावे घेतली जातात. परंतु बसवेश्वरांचा अनुभव मंडप व मराठ्यांचे महाराष्ट्र मंडळ या दोन्ही लोकशाहीच्या पाऊलखुणा असलेल्या संस्था दुर्लक्षित राहतात. याला आपण सुशिक्षित हिंदू लोक जबाबदार आहोत.
विद्यापीठांमधून या पैलूंवर शोधनिबंध प्रकाशित होणं गरजेचं आहे. आज लाखो उच्चशिक्षित हिंदू वेगवेगळ्या विषयात पारंगत होतात, पण हिंदू साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं.
द फॉरबिडन व्हॉइस या इंग्रजी विचारमंचाला नक्की भेट द्या, व नव्या पिढीला इंग्रजीत हे विचार वाचायला लावा.
बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
✍️ प्रथम उवाच
0 Comments