ही घटना जेवढी संतापजनक आहे, त्याहून जास्त समाजात त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया हादरवून सोडणाऱ्या आहेत.
"मारहाण करणाऱ्यांनी चूक केली आहे, पण त्या विद्यार्थ्यांची सुद्धा चूक आहे"
"एवढ्या रात्री ते काय करत होते"
"मुलीने जे स्लीव्हलेस कपडे घातले होते ते संस्कृतिला धरून आहेत का?"
"तो मुलगा काय तिचा भाऊ नव्हता, मग ती कशाला आली होती?"
अशा स्वरात अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. हे प्रकरण फार गंभीर आहे, आणि त्याला अनेक पैलू आहेत.
1. "संस्कृति रक्षक" गट , त्यांचे अस्तित्व आणि पुनर्विचार
-> जेव्हा संवैधानिक व्यवस्था योग्य व निष्पक्ष पद्धतीने काम करत नाही, तेव्हा अशाप्रकारचे Vigillante Groups (पहारेकरी/संस्कृतिरक्षक वगैरे समूह) अस्तित्वात येतात. उत्तर भारतात धार्मिक दंगलींचा व पोलिसांच्या राजकीय हेतूने प्रेरित कार्यप्रणालीचा इतिहास ताजा आहे. कोणताही धार्मिक दंगा झाल्यावर त्यात involved असलेल्या दोन्ही समूहात पोलिसांचा समान धाक निर्माण व्हायला हवा असतो. पण या राज्यांमध्ये पूर्वीच्या अनेक पक्षांच्या सरकारांनी हिंदू समजविरोधात पक्षपाती काम केल्याचा राजकीय आणि सामाजिक आरोप केला जात असे. धर्मांतराच्या हेतूने खोटी ओळख दाखवून प्रेम करण्याला आज कायदेशीर रित्या लव्ह जिहाद म्हणतात, तशी प्रकरणं समोर आल्यावर पोलिसांची उदासीनता व कारवाईसाठी कायदेशीर आधार नसणे यामुळे हतबल झालेल्या समाजाने अशा गटांचे अस्तित्व एक उपाय म्हणून पाहायला सुरुवात केली. बजरंग दल, दुर्गा वाहिनी, इत्यादि संघटना मोठ्या झाल्या, त्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला. या संघटनात असलेले कार्यकर्ते फक्त अन्यायाविरोधात आलेले नव्हते, तर त्यांच्यापैकी काहींच्या मनात पोथीनिष्ठ पितृसत्ता घर करून बसलेली होती. स्वत:च्या धर्मातील, समाजातील, धर्मातील मुलींनी "हाताबाहेर" जाऊ नये याचीही त्यांना काळजी होती.
वास्तविक संस्कृति आणि धर्म काय आहे, यापेक्षा आमच्या झुंडीला समजलेला धर्म हाच आहे अशी ती मानसिकता असते. ही भावना सर्व जातीय-धर्मीय लोकांमध्ये आढळते. हिंदू धर्मात आणि ग्रंथात स्त्रियांना काय स्थान असावं यात वेगवेगळी मते आहेत, विरोधाभास आहेत. मनूस्मृति सारखे ग्रंथ काही ठिकाणी स्त्री अतिशय आदरणीय आहे असेही सांगतात, आणि काही ठिकाणी स्त्रीला स्वातंत्र्य मिळत नाही/ देऊ नये असेही सांगतात. अशी विरोधाभासाची उदाहरणे इतर हिंदू धर्मग्रंथात आणि इतर धर्माच्या पोथी-कुराण मध्येही देता येतील. पोथीनिष्ठ लोक, ज्यांना काहीही करून आमच्या धर्माच्या कोणत्याच ग्रंथात काहीच चूक नाही, हे सिद्ध करण्याची उर्मी असते, ते कोणत्याही थराला जाऊन असे उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे justify करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा संदिग्ध आणि subjective ग्रंथांच्या आधारावर आजचा बहुरंगी समाज चालू शकत नाही. त्याचसाठी सर्वसंमतीने संविधान, कोर्ट, लोकशाही हे आपण स्वीकारले आहे आणि या व्यवस्थेने समतेने व्यवहार करणे अभिप्रेत आहे. परंतु असे न घडल्याने संतप्त झालेल्या समाजाने, विशेषत: मागील पिढीने हा extra-constitutional असलेला, पण तात्पुरती समस्या सोडवणारा संस्कृति रक्षकांचा पर्याय पचवला.
मात्र त्याकाळी विरोधात असलेल्या हिंदुत्ववादी राजकीय गटाला आता त्या क्षेत्रात सत्ता प्राप्त होऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्याकाळच्या लव्ह जिहाद, धर्मांतर, दंगलीवर one sided वागणारे पोलिस हे सर्व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांना पुरेसा वेळही मिळाला आहे, आणि अनेक राज्यात त्यानुसार कायदे बनवल्या गेले आहेत. पण ह्या संस्कृतिरक्षक संस्था अजूनही अस्तित्वात असून त्यात आजही पोथीनिष्ठ लोक आहेत ज्यांचा Valentine's day , किंवा पाश्चात्य पोशाख या सर्व गोष्टींनाही विरोध आहे. त्यांना कायदेशीर मार्गाने विरोध व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकारही आहे, मात्र व्यक्ति स्वातंत्र्य आणि स्त्रियांचे अधिकार अडवण्याचा त्यांना कसलाही अधिकार नाही. ही गोष्ट त्यांना ठासून सांगण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी पक्ष आणि समाज दोघांचीही आहे, कारण या दोघांच्याही संगणमतानेच या संघटना अस्तित्वात आल्या आहेत. या संघटना कायदेशीर प्रक्रिया (तस्करी पकडणे, गोवंशहत्या बंदी राबवणे, लोकांपर्यंत कायद्यांची माहिती पोहोचवणे इत्यादि) राबवण्यासाठी सरकारला मदत करण्याच्या कामी येऊ शकतात. भविष्यात धार्मिक भेदभाव होऊ नये म्हणून दबावगटाप्रमाणे कामही करू शकतात, पण व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं त्यांना बंद करावच लागेल, नाहीतर त्यांच्या अस्तित्वावर कायदेशीर संकट येईल
2. मुलीचे कपडे, भेटण्याची वेळ
हिंदू संस्कृति ही दोन स्वरूपाची आहे. ती प्रवाही आणि मुक्त सुद्धा आहे, त्याच बरोबर संकुचित आणि पितृसत्ताक सुद्धा आहे. तुम्ही कोणत्या कालखंडात आणि कोणत्या प्रदेशाचा संदर्भ घेऊन बघता त्यावर तुम्हाला ती कशाप्रकारे दिसेल ते ठरतं. ज्याला आपण उत्तर भारत किंवा हिंदी पट्टा म्हणतो, तिथे इस्लामी आक्रमण होण्यापूर्वी स्त्रियांनी शिक्षण घेतल्याचे, धार्मिक वादविवादांत सहभाग घेतल्याचे आणि मुक्तपणे निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात आढळतात. अगदी काश्मीरची हिंदू राजकन्या कर्नाटकात येऊन लिंगायत पंथ स्वीकारतानाही इतिहासाने बघितले आहे. स्तन, योनि, लिंग असे स्त्री पुरूषांचे लैंगिक अवयव, मासिक पाळी describe करताना कसलाही taboo केलेला नाही. ही स्थिति अगदी रामायण महाभारत ग्रंथात तर नाहीच, उलट चाणक्याने चंद्रगुप्ताचा विवाह ग्रीक राजकन्येशी लावून दिल्याचे आपल्याला माहीत आहे. पण ही सर्व मुक्तता आक्रमणाच्या पूर्वीची आहे. त्याच भागाने स्त्री-पुरुषांना गुलाम होताना, बळजबरी धर्मांतर होताना आणि अत्याचार होताना पाहिले आहे, जोहर पाहीले आहेत. तेव्हा घाबरलेल्या समाजात स्त्रियांवर निर्बंध आणले जाणे आणि यथा राजा तथा प्रजा या न्यायाने जुलमी इस्लामी राज्यकर्ते , त्यांचे ग्रंथ स्त्रियांना जशी वागणूक देतात तिचे अनुकरण करणारे पायंडे , पोथ्या, पुराण लिहिल्या गेले असावेत याचीही शक्यता आहे. किंवा कदाचित यामागे वेगळी काही कारणेही असू शकतात. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेत आक्रमणे कमी झाली असल्याने तेथील स्त्रियांचे वर्तन, मुक्त राहणीमान यात त्याचा प्रभाव आढळतो. ही सर्व हिंदू संस्कृतीचीच विविध रुपे आहेत. इतिहासाबरोबरच आर्थिक सुबत्ता, बेरोजगारी याही गोष्टींचा मुक्त आचारणाशी जवळचा संबंध आहे. दरिद्री अफगाणिस्तानात स्त्रियांना शिक्षण घेण्याचाही अधिकार नाही, आणि संपन्न दुबई मध्ये वाटेल ते करण्याचाही अधिकार आहे. हे दोन्ही इस्लामिक देश आहेत, पण इथल्या स्वातंत्र्यात प्रचंड तफावत आहे, आणि ही तफावत आर्थिक आहे.
आता वर्तमान भारताकडे पाह. 1947 पासून भारताची आर्थिक स्थिति वेगाने सुधारते आहे. त्यानुसार पेहराव व वागणुकीतील फरकही आपल्याला चित्रपट, गाणी, जूने फोटो अल्बम पाहून लक्षात येतो. अनेकांना हे westernization वाटू शकेल, त्यात काही अंशी तथ्य सुद्धा आहे. पण व्यापक दृष्टीने विचार केल्यास स्वतंत्र हिंदू समाज हा मध्ययुगीन वैचारिक बुरशीला सोडून पुन्हा एकदा मुक्त वातावरणाकडे अग्रेसर झाला आहे. या वैचारिक स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत मला तर महिला आघाडीवर आणि पुरुषच मागे दिसत आहेत.
भारतीय पोशाख वापरण्यात आजही स्त्रीयाच अग्रेसर आहेत, त्यांच्या स्टाइल सुद्धा भारतीय पोषाखाला modify करून तयार झालेल्या आहेत. अगदी सामान्य दिवशीही साडी / पंजाबी ड्रेस/ इत्यादि भारतीय पेहराव भारतीय स्त्रीया ऑफिस, मॉल अगदी कुठेही धारण करतात. तसं औचित्य नसताना मॉल आणि ऑफिस मध्ये धोतर, पगडी, सदरा घालायची हिंमत कोणत्या भारतीय पुरुषात आहे का? मग सांस्कृतिक पेहरावात जर पुरुष स्वतःच मागासलेले असतील, तर कोणत्या अधिकाराने स्त्रियांनी कसं राहावं, कोणते कपडे घालावे हे सांगितले जाते? ही मध्ययुगीन बुरसटलेली मानसिकता उखाडून टाकावी लागेल. नऊवारी साडीपासून बिकिनी पर्यन्त काहीही परिधान करण्यापासून कोणताही कायदा स्त्रियांना अडवू शकत नाही, आणि धार्मिक आधारावर मंदिर इत्यादि परिसरात काही नियम असतील तर ते स्त्री पुरुष दोघांनाही असावेत ही ठाम भूमिका घायाची वेळ आलेली आहे.
परिसरातील गुन्हेगारीच्या प्रमाणानुसार कोणत्याही वेळी कोणाही सोबत, आणि कोणतेही कपडे घालून फिरण्यात काहीही गैर नसून गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण ही गोष्ट करण्यासाठी फक्त पोलिसबळ किंवा कायदेशीर सुधारणा किंवा शिक्षण उपयुक्त नसून आर्थिक समृद्धी सुद्धा निर्णायक आहे हे आपण वरील उदाहरणातून पाहिलं आहे.
4. भिन्नलिंगी मैत्री व प्रेम.
जेव्हा आपण adult व्यक्ती स्वतंत्र आहेत हे मान्य करतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचे निर्णय आणि त्याचे चांगले वाईट परिणाम यांची ownership सुद्धा त्या व्यक्तीवर सोपवणे गरजेचे असते. पौगंड अवस्थेत किंवा teenage मध्ये हॉर्मोन्स मध्ये घडणाऱ्या बदलामुळे मुली मुलांमध्ये आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. पूर्वीच्या पिढीत ही सामान्य वैज्ञानिक गोष्ट दडपून टाकली गेल्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोनच लैंगिकतेने भरलेला आढळतो. जर सभ्य सुसंस्कृत असलेली पिढी ही खरोखर स्त्रीदाक्षिण्य आणि परस्त्री मातेसमान मानणारी असली असती, तर इंटरनेट भारतात येताच सर्वाधिक लोकांनी पॉर्न पाहायला सुरुवात केली नसती. Item songs आणि रेप सिन चित्रित करणारे चित्रपट हॉउसफ़ुल्ल झाले नसते. शारीरिक वासना असताना ती दाबून ठेवून वरवरच्या संस्कृतीक आचरणाचे ढोंग करण्यापेक्षा कोवळ्या वयातच प्रामाणिकपणे या गोष्टींना स्वीकार करण्यात काय हरकत आहे? तात्विक दृष्टीने दोघांचंही वय 18 पेक्षा कमी असल्याने निर्जन जागी जाण्यापेक्षा त्यांना कोणत्या मंदिराबाहेर किंवा शाळेत किंवा कोणाच्या घरात बसणं जास्त योग्य ठरलं नसतं का? पण त्यांनी बाहेर भेटण्याचा निर्णय घेतला यात चुका काढण्यापेक्षा समाजात अशा मित्रांकडे किंवा कपल्सकडे विचित्र गुन्हेगार असल्याच्या दृष्टीने का पाहिले जाते याचा विचार करायला हवा. मुलांनी मुलांशी आणि मुलींनी मुलींशी मैत्री करावी असा कडक कायदा घरात केल्यामुळे अगदी वेगळ्या gender च्या व्यक्तीशी संवाद कसा साधायचा हे सुद्धा मुलांना लक्षात येत नाही. याचे परिणाम ऑफिस, कॉलेज इत्यादी ठिकाणी तर जाणवतातच पण पूर्वीच्या पिढ्यांचे तर विवाहानंतरही आपल्या पार्टनरशी संवेदनशील विषयावर संवाद सहजपणे होऊ शकतात का याचं स्वतःच निरीक्षण करा. एखादी गोष्ट/भावाना जी अस्तित्वात येणारच आहे तिच्याबद्दल बोलणं टाळण्यापेक्षा ती भावना योग्य प्रकारे चॅनेलाईझ कशी करावी याचा संवाद अधिक उपयुक्त ठरतो. हिंदू धर्मशास्त्रातही या गोष्टींचा मुक्तपणे उल्लेख केलेला असताना त्याचा आज टॅबू करणारे कोणत्याही प्रकारे संस्कृती रक्षक तर असू शकत नाहीत. पण हा लांबलचक लेख वाचून तुमच्या डोक्यात काय चाललं आहे त्याचं मात्र comments मध्ये रक्षण करा :)
बाकी संस्कृती टिकवायची असेल, तर तिचे रक्षण भीतीने, मारहाणीने किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालून होणार नाही. बदलत्या काळाबरोबर स्वतःतील अन्यायकारक रूढी मागे टाकण्याची क्षमता ज्या संस्कृतीत असते, तीच संस्कृती खऱ्या अर्थाने जिवंत असते. मुलीचे कपडे, त्यांची मैत्री आणि आपली संस्कृती यांचा निवाडा एखाद्या झुंडीने नव्हे, तर व्यक्तिस्वातंत्र्य, कायदा आणि विवेक या मूल्यांनी व्हायला हवा. कारण संस्कृती माणसाला अधिक स्वतंत्र आणि सुसंस्कृत करण्यासाठी असते; माणसावर मालकी सांगण्यासाठी नाही.
- प्रथम उवाच
२४ सप्टेंबर २०२६
0 Comments