28 तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर एकदाचा अमेरिकेत येऊन टेकलो. पदव्युत्तर शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा निर्णय जून 2024 मध्ये घेतलेला. त्यानंतर जेमतेम एक-दीड महिन्यांच्या तयारीनंतर परीक्षा दिल्या आणि apply केलं. न्यूयॉर्क, व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया, इत्यादी ठिकाणच्या कॉलेजेस ची प्रवेशनिमंत्रणे आलेली होती. त्यांपैकी अमेरिकेतील टॉप 5 सरकारी विद्यापीथांमध्ये समाविष्ट असलेल्या व शिष्यवृत्तीही देणाऱ्या फ्लोरिडा विद्यापीठात संगणकविज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (CS and AI) शिकण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
परीक्षेचा अभ्यास, कॉलेज शोधणे, त्यानंतर आलेल्या प्रवेशपत्रांमधून एक कॉलेज निवडणे, आंतरराष्ट्रीय राजकारण, व्हिजाचे बदलते नियम, आर्थिक मंदीची शक्यता या सगळ्यात सततचा तणाव सहन करत व त्यासोबतच जॉब व इतर ऍक्टिव्हिटी करत मागचे एक वर्ष कसे निघून गेले कळले नाही. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक फार कमी लोकांना आधीपासून सांगितलेल्या होत्या, कारण आधीच जाण्याची अनिश्चितता आणि त्यात वेगवेगळ्या मत-मतांतरे यांचा मानसिक परिणाम नको होता. विशेषतः आई वडिलांना जेव्हा लोक "तिकडे गेले एकदा की येत नसतात, आमच्या xyz च्या pqr चा मुलगा तसाच गेला मग आलाच नाही, इकडे काय शिकत नाहीत का, तिकडे जाऊन पाश्चात्य होऊन जातात, इत्यादी" गोष्टी बोलतात, तेव्हा त्यांची घालमेल वाढते. हे असं बोलणारेही कोणी शत्रू नसतात. बहुतांश लोक काळजीपोटी सांगत असतात, तर काही लोक कुत्सितपणेही बोलतात. यातल्या कोणालाच उत्तरं वगैरे मी तरी दिली नाहीत. परंतु पुढच्या वर्षी किंवा भविष्यात विदेशात शिक्षण घेण्याचा डोक्यात विचार असेल, आणि या गोष्टींमुळे डोक्यात चक्र फिरत असतील, तशा विद्यार्थी आणि पालकांसाठी काही गोष्टी लिहिल्या आहेत.
विदेशात गेल्याने स्वदेशभक्ती कमी होते का?
नाही. सावरकर, आंबेडकर, नेहरू, अब्दुल कलाम, गांधीजी, विक्रम साराभाई, होमी भाभा हे सर्व विदेशात शिक्षण/ट्रेनिंग घेऊन आले होते, तसेच सुभाषचंद्र बोस, अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद, श्रीनिवास रामानुजन हे सर्व काही न काही कामांसाठी ठराविक वेळ विदेशात राहून आले होते. राषबिहारी बोस, दादाभाई नौरोजी, असे काही कायमस्वरूपी तिकडे स्थायिकही झाले. पण त्यांनी त्या ठिकाणी जी कामं केली त्याचाही देव देश धर्माला उपयोगच झाला.
इतिहासातले महापुरुष वेगळे, आजकाल कुठे तसे लोक राहिले, वगैरे वगैरे
वस्तुतः हे महापुरुष त्यांची कामं पाहून आपण बनवलेले आहेत. कधीकाळी हे सर्वच सामान्य माणूस होते. पण इतिहासातली उदाहरणे जरी सोडायची म्हंटली तरी सध्या सुंदर पिचाई हा गुगलचा CEO एक विदेशी हिंदू आहे. त्याच्या आणि नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळे jio येण्यापूर्वीच गुगलच्या सहकार्याने भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवर मोफत wifi (RailWire) सुरू झालं. यात गुगलचा थेट व्यावसायिक फायदा काहीही नव्हता. मग यामागचा driving factor देशप्रेम का म्हणू नये? अशी अक्षरशः हजारो उदाहरणे देता येतील. त्याचबरोबर काही नकारात्मक उदाहरणेही असतातच. मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की आपल्यासमोर सर्व प्रकारची उदाहरणे आणि आदर्श उपलब्ध असतात. आपण कोणाकडून काय शिकावं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे ज्यांचं नकारात्मक उदाहरण तुम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून ऐकवल्या जाईल, त्यांचे विचार चुकीचे असू शकतात. ते generalize करून आपल्या डोक्याला ताण घेण्यात काहीही अर्थ नाही.
एखाद्याला कायमस्वरूपी तिकडे जावंसं वाटतं. चूक आहे का?
तुम्हाला फक्त शिक्षणासाठी जायचं आहे/ कामानिमित्त जायचं आहे / की कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी जायचं आहे हा पूर्णपणे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा निर्णय आहे. फक्त आपला हेतू आई वडिलांना प्रामाणिकपणे कळवला पाहिजे. त्यांना आधी वेगळ्या आशेला लावून नंतर हिरमोड करणे त्रासदायक ठरते. त्याचबरोबर तुम्हाला भारतात राहण्याची ओढ नसेल, तरीही देशाचा आणि संस्कृतीचा तिरस्कार करण्याची चूक करू नका. भारत ही आपली जन्मजात पितृभूमी आहे. तुम्ही कितीही पिढ्या विदेशात राहूनही तुमची ओळख "भारतीय वंशाचे" अशीच राहते. तसेच कतारपासून युक्रेन पर्यंत कुठेही काही धोकादायक घडले तर ही पितृभूमीच मदतीला आली आहे व येणार आहे हे कायम लक्षात ठेवा.
"भारतात शिक्षण मिळत नाही का?" असं लोक म्हणतात.
हा अतिशय निरर्थक आणि असंबद्ध प्रश्न आहे. मी वेगळ्या तणावात असताना एका मित्राने वारंवार poke केल्यानंतर मी त्यालाच प्रश्न केला होता "दत्तगुरूंनी कुत्रा गाय अजगर इत्यादी 24 गुरू मानले होते व त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी ते शिकले. मग शाळा कॉलेज बंद करून थेट अजगरच पाळूया का? किंवा गौतम बुद्धांना जशी ज्ञानप्राप्ती झाली तसं आपणही पिंपळाखाली जाऊन बसूया का?" अतर्क्य प्रश्नाला दिलेलं हे उद्विग्न आणि उद्धट उत्तर आहे, त्याबद्दल नंतर मी माफीही मागितली. पण शांतपणे विचार करा. जगात सर्व गोष्टींचे सर्वोत्तम शिक्षण भारतात मिळते का? ज्याठिकाणी उत्तम शिक्षण मिळेल तिथे जाऊन ते शिकणे ही हजारो वर्षांपासून चालत आलेली गोष्ट आहे. गावाकडचा मुलगा पुण्याला/मुंबईला येऊन याचसाठी शिकतो. किंवा प्रत्येक जिल्ह्यात कॉलेज असतानाही लांब जाऊन IIT, NIT कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी याचमुळे तयारी केली जाते. भारताची लोकसंख्या, सरकारकडून शिक्षणावर केला जाणारा अत्यल्प खर्च, जातीय व आर्थिक आरक्षण, हे सगळे फॅक्टर असताना सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देणे आज तरी भारतात शक्य नाही. त्यामागे वेगवेगळी genuine कारणेही आहेत. आता हे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वाट पाहण्यापेक्षा जगभरात नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण कशाला घ्यायचं हा प्रश्न पडणे हास्यास्पद आहे. उलट जिथे जसं जे शिकता येईल ते घेऊन इथे ते वापरता कसं येईल हा विचार करायला हवा.
खर्च किती येतो? गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे परवडेल का?
सध्या वेगवेगळ्या जातसमूहातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी पातळीवर विविध आर्थिक योजना व शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय विविध banks व NBFC (वित्तीय संस्था) सुद्धा विनातारण (Non collateral) कर्ज देतात. तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा खर्च असून आपल्या बजेटनुसार व स्कॉलरशिपनुसार निवड करता येऊ शकते. त्याशिवाय वेगवेगळ्या खाजगी स्कॉलरशिपही गरीब विद्यार्थ्यांना (सर्वजातीय) दिल्या जातात.
त्यामुळे तुमची इच्छा आणि निर्धार असेल, चांगल्या-वाईट परिणामांना तोंड देण्याची तयारी असेल, तर वरील पैकी कोणत्याही कारणाने मागे हटण्याची गरज नाही. परंतु काही genuine नकारात्मक मुद्देही आहेत ज्यांचा विचार केला पाहिजे, ते मात्र पुढच्या लेखात सांगतो.
- प्रथम उवाच
1 Comments
मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, मी ग्रॅज्युएशन ला असतांनाच माझी परदेशात शिकायची आणि तिथेच नोकरी करायची इच्छा होती, पण ज्या पद्धतीने तुम्ही लेखात लिहिलंय माहिती, पैश्यांची कमतरता, वगैरे कारणास्तव हे स्वप्न स्वप्नच राहिलं. हो पण एक मात्र निच्छित, तुम्ही देत असलेल्या माहितीमुळे कित्येक मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात. म्हणून लिहीत रहा! अशीच माहिती इतरांना देत रहा. जेणेकरून इतर मुलांना ह्या लेखांद्वारे त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होईल.!
ReplyDeleteलिहितं रहा !
prathamuvach.in