झोहो कशासाठी? Arattai काय आहे?


श्रीधर वेम्बु यांनी अनेक वर्षांपूर्वी स्थापन केलेली झोहो ही संस्था सध्या चर्चेत आहे. ही संस्था मायक्रोसॉफ्ट व फेसबुक ला टक्कर देण्याची क्षमता असलेली भारतीय कंपनी आहे. पण अशी कंपनी गरजेची का आहे? सध्या जे सुरू आहे तेही चांगलं चालत असताना उगाच इकडून तिकडे का जायचं आहे? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यासाठी हा लेखनप्रपंच. 

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो, की फक्त भारतीय कंपनी आहे या भावनेच्या आधारावर हा लेख नाही. 

आपल्या जीवनात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन  यांचं महत्त्व काय आहे? ते आपल्याला जेवढं दिसतं तेवढं मर्यादित नाही. आपल्याला वाटतं गुगल म्हणजे सर्च, मायक्रोसॉफ्ट म्हणजे MS ऑफिस (वर्ड, एक्सएल, पॉवर पॉईंट वगैरे), आणि ऍमेझॉन म्हणजे होम डिलिव्हरी. पण या सर्व कंपन्यांचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत खूप वेगळे आहेत. एकेक करून समजून घेऊ. 

आपण इंटरनेटवर जे काही पाहतो, मग ते कोणतं app असो, व्हीडिओ असो, किंवा वाचलेले लेख, परीक्षांचा निकाल, बँकेचे ईमेल, फोन पे, गुगल पे सगळं काही, ह्या सर्व सुविधा आपल्याला कुठूनही वापरता याव्यात यासाठी होस्टिंग प्लॅटफॉर्मची गरज असते. म्हणजे एक अशी सुविधा जी इंटरनेटवर काहीही नवीन वेबसाईट किंवा app तयार करण्यासाठी लागते. त्या सुविधेचा वापर करून आपण इंटरनेटवर एक जागा विकत घेऊ शकतो. आपली माहिती इंटरनेटवर जाते म्हणजे नेमकी कुठे जाते? तर अशी मोठी इमारत असते जिथे भरमसाठ शक्तिशाली कम्प्युटर 24 तास 365 दिवस सुरू असतात ज्यांच्यामुळे जगभरातील सर्व इंटरनेट सुरू राहते. त्या इमारतींना म्हणतात डेटा सेंटर. त्याठिकाणी तुमचा माझा सर्व डेटा साठवला जातो, आणि तो जगभरात उपलब्ध होतो. 

ऍमेझॉनची सुरुवात जरी होम डिलिव्हरीसाठी झालेली असली, तरी आज त्यांचा मुख्य धंदा असे डेटा सेंटर आणि होस्टिंग देण्याचा आहे. (तुम्हाला स्वस्त वस्तू मिळण्यासाठी जे डिस्काउंट मिळतात, ते ऍमेझॉनला परवडतात ते यामुळेच)

हीच गोष्ट गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा(फेसबुक) साठी पण लागू होते. आपण जे chatgpt वापरतो, ते मायक्रोसॉफ्ट च्या मालकीचं आहे. जगभरातील बहुतांश कंपन्या जे इमेल वापरतात ते गुगल (जीमेल) चे असतात. व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचं आहे. थोडक्यात आपण सर्व गोष्टींसाठी या अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून आहोत. ही आज घाबरण्याची गोष्ट अजिबात नाही. कारण आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या सर्व कंपन्या कायद्याने बांधील आहेत. तसेच देशाच्या, रंगांच्या,लिंगाच्या आधारावर कसलाही भेदभाव न करण्याचीही त्यांची पॉलिसी आहे. त्यामुळे आज आपल्याला कसतीही चिंता करण्याची गरज नाही, असंच बहुतेक देशांना वाटत राहिलं. *मात्र*

जो स्वदेशीचा मंत्र गांधी आणि सावरकर दोघांनीही दिला होता, ज्याला अब्दुल कलामांनी व्यापक स्वरूपात पुढे आणलं होतं, त्या विचाराकडे पुन्हा जाण्यास भाग पाडणारी घटना काही महिन्यांपूर्वी घडली. 

रशियाकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या आणि त्यावर प्रक्रिया करून विकणाऱ्या एका भारतीय कंपनीला अमेरिकेने ब्लॅकलिस्ट केले. आणि मायक्रोसॉफ्टने अमेरिकन कायद्याच्या अनुसार त्या कंपनीचा सर्व डेटा ऍक्सेस बंद केला. एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही सकाळी उठून जावं आणि त्या जागेवर असलेली इमारतच गायब व्हावी, कागदपत्र गायब व्हावे, फक्त कर्मचारी लोक उभे दिसावे अशी ती अवस्था होती. 

त्या कंपनीचे सर्व अधिकृत कागदपत्र, प्रेसेंटशन, इमेल, थोडक्यात सगळाच डेटा एका क्षणात गायब झाला. ही अवस्था मायक्रोसॉफ्ट ने फक्त स्वतःच्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बंद करून आणली. जर अशाच होस्टिंग सर्व्हिस कधी बंद झाल्या तर? तुम्ही hdfc बँकेत पैसे काढायला गेलात, आणि बँकेच्या सर्व्हर ची सुविधा जर मायक्रोसॉफ्टने बंद केली, तर तुमच्या खात्यात पैसे किती हे सुद्धा मोजता येणार नाही. अर्थात या सर्व मोठ्या बँक व कंपन्या कोणत्याही एका होस्टिंग वर अवलंबून नसतात. पण जगातील सर्वच मोठ्या होस्टिंग पुरवणाऱ्या कंपन्या अमेरिकन आहेत. 

भारतीय पर्यायही उपलब्ध आहेत. उदा. Airtel cloud, गती, या कंपन्याही होस्टिंग पुरवतात, पण यांची कार्यक्षमता अगदीच नगण्य आहे.  

याचा अर्थ उद्यापासून सगळं बॉयकॉट करून जमणार नाही. एकेका गोष्टीला भारतीय पर्याय उपलब्ध करावे लागतील, ते वापरावे लागतील. ही प्रक्रिया एका वर्षात वगैरे होणारी नाही. झोहो ही 1996 साली सुरू झालेली कंपनी आहे. त्यांनी स्वत: जी-मेल, वर्ड, excel, गुगल-ड्राईव्ह, गुगल-meet, गुगल कीप नोट्स, कॅलेंडर, मायक्रोसॉफ्ट to-do list या सर्वांना पर्यायी प्रोडक्ट तयार केलेले आहेत आणि सुमारे जगभरातील दहा कोटी युजर ते वापरतही आहेत. 

परंतु गगनभरारी घेण्यासाठी गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ऍमेझॉन या सर्वांनी लोकाभिमुख प्रॉडक्ट्स वापरले. तसाच पहिला सोशल मीडिया प्रयोग झोहो ने सुरू केला आहे. त्यांनी व्हाट्सअप्प ला पर्यायी भारतीय app बनवलं आहे, त्याचं नाव "अरत्ताई". हा एक गप्पागोष्टी या अर्थाचा तमिळ शब्द आहे. 

यापूर्वी ट्विटर ला भारतीय पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न koo (कु) या कंपनीने केला होता. भारत सरकारने त्यालाही समर्थन व आर्थिक मदत केली होती. मात्र ती कंपनी बंद पडली. कारण लोकांनी त्याला विशेष वापरलं नाही. 

अशी वेळ अरत्ताई वर येऊ देऊ नका. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात भारताचे स्वतःचे गुगल, इन्स्टाग्राम व फेसबुक सारखे पर्याय लवकरच जनमानसांत रुजतील. व ते चालवण्यासाठी भरतात दर्जेदार होस्टिंग प्लॅटफॉर्म व डेटा सेंटरची निर्मिती होईल. या सर्व गोष्टींसाठी भारतात व विदेशातही भरपूर वैज्ञानिक अनेक वर्षांपासून झटत आहेत. 

भारताला खरोखर विकसित देश होण्यासाठी टेक्नो-क्रांती गरजेची आहे. त्यातच देशाची व देशातील लोकांची आर्थिक उन्नती आहे. पण हे करण्यासाठी सामान्य लोकांच्या हातात एवढेच आहे, की जास्तीत जास्त भारतीय प्रोडक्ट वापरा. ते वापरतानाचे व्हीडिओ बनवा, review पोस्ट करा, सर्व मित्रांना try करायला सांगा. यात काही सुधारणा सुचवा, हे सर्व कसं करायचं याचे व्हीडिओ बनवण्याचा मीही प्रयत्न करेलच. 

मग वेळ न दवडता अरत्ताई ( arattai ) हे app डाउनलोड करा व ते वापरायला लागा! कारण arattai वर तुम्ही जे काही पाठवाल, ते चुकूनही देशाबाहेरच्या डेटा सेंटर वर जाऊ शकणार नाही. त्या डेटाची जबाबदारी भारतीय संविधान, न्यायपालिका व तुम्ही निवडून दिलेली संसद करेल. दुसऱ्या देशाचं तिसऱ्या देशाशी युद्ध झालं तर चौथ्या देशाने आपल्या डेटाचं काय करायचं, अशी परिस्थिती येणार नाही.

✍️प्रथम उवाच

प्रथम उवाच अरत्ताई गृप लिंक: https://aratt.ai/@prathamuvach


Post a Comment

0 Comments