गाईला एवढं महत्त्व देणं कधीपासून सुरू केलं आपण? खरं सांगायचं झालं, तर माहीत नाही. कारण जितक्या लांब इतिहासात जावं तितक्या लांब गोरक्षा दिसून येते.
महान संस्कृत कवी कालिदास याने रचलेल्या रघुवंश या नाटकात रघु हा क्षत्रियकुलावतंस राजा (हा राजा म्हणजे श्रीरामांचा पूर्वज) कित्येक संकटांना झेलून गोरक्षा करतो.
क्षत्रिय आई व ऋषि वडिलांचा पुत्र असलेले भगवान परशुराम सुद्धा कामधेनु गाईसाठी युद्ध पुकारतात.
श्रीकृष्ण व त्यांचा यादव वंश सुद्धा गाई पाळण्याचा व्यवसाय करत असे.
नंतरच्या काळात नेपाळमध्ये स्थापन झालेला क्षत्रिय राजवंश सुद्धा "गोपाळ" म्हणजे गाई पाळणारा या नावाने सत्ता चालवित असे.
ही गोपालन परंपरा राजपूत व मराठ्यांनीसुद्धा अविरत सुरू ठेवली. महाराणा प्रतापांच्या राज्यात गोहत्याबंदी करण्यात आली होती. शिवरायांनी तर गाईंच्या ट्रान्सपोर्ट वर tax सुद्धा माफ केला होता. "ब्राह्मणांकडून गुरांचे पाल घेऊ नये, त्यास सरकारातून माफ केली आहेत." हे वाक्य महाराजांच्या पत्रात जसं च्या तसं आलं आहे. हे पत्र पाठवताना शिवबा फक्त 18-19 वर्षांचे होते हे विशेष. (शि.च.सा. खंड 3, लेख 57)
क्षत्रियांची ही गोरक्षणाची परंपरा पुढेही सुरूच राहिली. पहिल्या तिन्ही छत्रपतींच्या मृत्यूनंतर जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात स्वराज्य काहीसं स्थिरस्थावर झालं, तेव्हा एकेक सरदारांनी आजच्या महाराष्ट्राबाहेर जाऊन बाहेरचे प्रदेश जिंकायला सुरुवात केली. त्यात अग्रणी होते पिलाजीराव गायकवाड. त्यांनी आजच्या गुजरात मधलं बडोदा मुघलांकडून जिंकून घेतलं. हे गायकवाड प्रखर गोरक्षक होते. यांचं आडनाव गाय-कवाड सुद्धा गाईंना कवडात (दारात/संरक्षणात) घेणारे अशा अर्थाचं आहे. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात आजही गायकवाड आडनावाचा गोरक्षक इतिहास सांगितला जातो.
पानिपत युद्धात मराठ्यांचं झालेलं नुकसान महादजी शिंद्यांनी भरून काढलं. त्यांचा दरारा एवढा प्रचंड होता, की त्यांनी मुघल बादशहाच्या गौरवमणी असलेल्या ताजमहालात स्वतःचे घोडे बांधले व आग्रा शहरात गोहत्याबंदीचा आदेश दिला. नाईलाजाने मुघलांना तो आदेश स्वीकारावा लागला.
पंजाबच्या रणजितसिंहांपासून ते कोल्हापूरच्या शाहू महाराजांपर्यंत सर्वांनी आपल्या राज्यात गोहत्याबंदी केली होती. हे सर्वच शासक गोप्रतिपालक व गोरक्षक होते. आजही अनेक NGOs, वैदिक पाठशाळा व तस्करी पकडण्यात पोलिसांना सहकार्य करणारे गोरक्षक ही परंपरा पुढे चालवत आहेत. त्यांच्या सन्मानात ह्या वसुबारसाला एक दिवा लावूया. शुभ वसुबारस 🏵️
- प्रथमेश चौधरी
@prathamuvach
0 Comments