मी सोनम वांगचुकला का सपोर्ट करतो?




 सोनम वांगचुक या व्यक्तिच्या इतिहासाबद्दल शेकडो गोष्टी ऐकल्यानंतर माझ्या किंवा लोकांच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण होईल असं वाटणाऱ्या भोळ्या भाजप समर्थकांसाठी:

बहुतांश लोकांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही, की कोणी कोणी कोणत्या गोष्टीला समर्थन दिलं आहे, किंवा इतिहासात कोणी काय बोललं आहे. प्रत्येकाच्या इतिहासात घडलेल्या घटना आणि भूमिका घेऊन बसल्यावर भारताचं राजकारण बंद पडेल. ठरावीक काळासाठी राजकीय लेखन न करण्याच्या स्वतःचाच नियम मोडत काही उदाहरणे सांगतो.:

हेमंत विश्वशर्मा हे भाजपचे फायर ब्रांड मुख्यमंत्री आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी हे पक्के काँग्रेसी नेते होते. पण राहुल गांधी यांनी त्यांचं उगवतं नेतृत्व मान्य न करता उलट त्यांचा कथित अपमान केल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली, भाजप जॉइन केली, आणि त्यांच्या विचारांत आमुलाग्र बदल दिसून आला. त्यांनी मोकळेपणाने हिंदुत्व स्वीकारलं आणि हिंदू समाजाने सुद्धा त्यांना स्वीकारलं.

सुबेंदू अधिकारी हे बंगाल भाजपमधील प्रमुख नेते आहेत, पण काही वर्षांपूर्वी तेही ममता बॅनर्जी सोबत होते. पण त्यांनी हिंदुत्वाचा विचार स्वीकारला, लोकांनी त्यांना स्वीकारलं.

अजित पवार राष्ट्रवादी गट विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत आला, हिंदुत्वाला असेलला त्यांचा विरोध निवळला, आणि लोकांनी त्यांना स्वीकारलं.

हे सगळं घडलं, कारण हिंदुत्वाची चळवळ व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य देणारी आहे. जातीभेद विरहित हिंदुत्वही याच साठी सांगितले जाते, कारण एक हिंदू व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, किंवा त्याची जातीय ओळख काय आहे, याचा विचार न करता त्याच्या कृती आणि विचारांना महत्त्व देण्यासाठीच समता महत्त्वाची असते.

वैयक्तिक दृष्टीने मी हिंदुत्वाचा विचार याचसाठी योग्य मानतो, की इथे विज्ञाननिष्ठता आहे, प्रयोग करण्याचं, नवा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. चूक करण्याचीही परवानगी आहे. ज्याला जिथे जेवढी उचित वाटेल तेवढी परंपरा जपत स्वतंत्रपणे वेगळे विचारही मांडण्याची मुभा आहे. ज्या विचारधारा “विरोधी“ प्रकारच्या मानल्या जातात त्या याचमुळे की तिथे मुक्त विचार नाही. मतभेदांना स्थान नाही. प्रयोग करण्याचं आणि फसलेले प्रयोग own करण्याचं धाडस नाही, म्हणूनच ते ठरावीक काळापुरते लोकांना relevant वाटले हे लक्षात घायला हवं. याच्या उलट संघ, भाजप, काँग्रेस या संघटना वेगळ्या ठरतात. कारण पूर्वी सेनाच नको म्हणणाऱ्या नेहरूंनी स्वतःचा वैचारिक प्रयोग फसल्यावर स्वतःच अणुबॉम्ब निर्मितीला परवानगी दिली. याला म्हणतात accountability. किंवा समाजवादी धोरण स्वीकारून देश कंगाल व्हायला लागला तेव्हा स्वतः काँग्रेसच्याच नेत्यांनी उदारमतवादी आर्थिक धोरण स्वीकारलं आणि देश पुन्हा आर्थिक दृष्टीने रुळावर आला. ही गोष्ट संघ आणि भाजपच्या बाबतीतही पाहायला मिळते. नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देणं, आणि चुकल्यावरही पुन्हा प्रयत्न करण्याची उमेद देणं ही भाजपची व आता नरेंद्र मोदींची खासियत आहे. त्याच आधारावर भाजपला आधी कुठेही मागमूस नसलेल्या राज्यांमध्येही सत्ता मिळत गेली. संघाचं हिंदुत्व सुद्धा प्रवाही आहे, म्हणून संघ वाढतोय. चुका करतोय, आणि सुधारतोय सुद्धा. याच आधारावर शिवसेना तोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले एकनाथ शिंदे योग्य ठरवले गेले.

याच आधारावर काँग्रेस तोडून वेगळी चूल मंडणारे शरद पवार, ममता बॅनर्जी, इत्यादी नेते लोकप्रिय ठरत गेले. भाजप मध्ये ही घटना घडली नाही, कारण भाजप जास्त भूमिकांच्या बाबतीत तुलनेने जास्त फ्लेक्सिबल आणि विचारांच्या बाबतीती तुलनेने जास्त रिजिड आहे (की होता?)

या सर्व उदाहरणंमधून हेच लक्षात येतं, की व्यक्तीपेक्षा भूमिका महत्त्वाची आहे. व्यक्तीचा इतिहास महत्वाचा असता तर भ्रष्टाचाराच्या आरोपात आत गेलेले छगन भुजबळ भाजप सरकार मध्ये मंत्री होऊ शकले असते का? हेमंत विश्व शर्मा काँग्रेस मधून भाजप मध्ये येऊन मुख्यमंत्री होऊ शकले असते का? किंवा मूळचे गांधी समर्थक आणि काँग्रेसी असलेले हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करू शकले असते का? 

आता जरा सोनम वांगचूक या व्यक्तीकडे बघू. भाजपत्ववाद्यांकडून खुलासे केले जात आहेत की या व्यक्तीने कोणतेही पेटंट घेतले नाही, त्याच्या संशोधनाला काही महत्त्व नाही, तो राजकीय घरात जन्मला आहे, त्याच्या NGO ला मिळणारी मदत बंद झाली आहे, तो विदेशी फंडिंग वर स्वतःचा अजेंडा चालवतो, तो पाकिस्तानात जाऊन आलेला आहे, इत्यादी.

या सर्व गोष्टी मला तरी पूर्वीपासूनच ठाऊक आहेत. ज्या IT cell च्या टूलकिट वरून हे सगळं घडतय त्यांनाही या गोष्टी आधीपासूनच माहीत होत्या. पण जेव्हा त्याने "गलवान के बलवान" नावाची सिरीज चालवली, चिनी मालाचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं, कलम 370 हटवण्याची मागणी केली, आणि ते हटवल्यावर समर्थन केलं, तेव्हा पंतप्रधान मोदींपासून माझ्यासह त्यांच्या सर्वसमर्थकांनी त्याच सोनम वांगचुक चा जयजयकार केलाच ना? तेव्हा हे विदेशी फंडिंग, खोटे पेटंट वगैरे खुलासे का बरं नाही झाले? कारण त्याची भूमिका भाजपशी मिळतीजुळती होती. त्यामुळे सोनम च्या पेटंट पासून भुजबळांच्या प्रमाणिकपणापर्यंत सर्वकाही सामान्य होतं. 

त्याने पाकिस्तानात जाऊन आल्यानंतर पुण्यात येऊन रिव्हर फ्रंटला विरोध केला होता. तेव्हाही वांगचुकवर टीका करणाऱ्यांमध्ये मी सुद्धा होतोच. जेव्हा त्याने लडाखमध्ये अंदोलन करताना  चिथावणीखोर वक्तव्य केली, त्याच्या आंदोलनात पोलिसांवर हल्ला झाला, तेव्हा त्याला अटकही झाली. त्या अटकेचाही मी समर्थक होतो. थोडक्यात सोनम वांगचुक हा काही धुतल्या तांदळाचा आणि न्यूट्रल माणूस नाही हे मलाही ठाऊक आहे. पण ते तर अशोक चव्हाणांपासून छगन भुजबळ यांच्या पर्यत आणि पार्थ पवारांपासून ओवेसीपर्यंत सगळ्यांना लागू होईल. पण तरीही वेळोवेळी सरकारने त्यांना एकतर मदत केली आहे, किंवा थेट सत्तेत सहभाग दिलेला आहे. कारण, "इतिहासापेक्षा वर्तमानातील भूमिका महत्त्वाची" हेच तत्व सांगितलं गेलं.

मी आजही भाजप समर्थक आहे. आणि नेत्यांचा घोडेबाजार व वर सांगितलेल्या इतर घटना घडूनही भाजप समर्थकच आहे, कारण काँग्रेस सत्तेत असता तर त्यांनोही हेच केळं असतं, इतिहासात केलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने लक्षणीय कामगिरी केलेली असून अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे हे आकडेवारीतून सिद्ध होते. पण पक्षातील एखादा नेता त्या यशाला डाग लावत असेल, तर फक्त IT सेल म्हणते म्हणून त्या नेत्याचं समर्थन करायचं का, हे ज्याचं त्याने ठरवावं.

प्रश्न फक्त नीटचा पेपर फुटला एवढाच नाही. जानेवारी 2026 मध्ये शिक्षण मंत्रालयच्या अधिकारात येणाऱ्या युजीसी ने नोटिफिकेशन काढलं, की ओबीसी,एससी,एसटी विद्यार्थ्यांना जातीय भेदभाव झाल्यास एट्रोसिटी सारखी तक्रार करण्याचा विशेष अधिकार मिळणार होता. त्यावरून सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून बेदखल करण्यापर्यंतच्या शिक्षा होत्या. यावर जनरल प्रवर्गातील लोकांकडून प्रचंड विरोध व आंदोलने झाली. त्यांची मागणी होती की सर्व विद्यार्थ्यांना तक्रार करण्याचा अधिकार हवा, आणि कोणी खोटी तक्रार केल्यास त्यालाही शिक्षा व्हायला हवी. असं न केल्यास कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. ही मागणी कुठे चुकली होती? पण धर्मेंद्र प्रधान यांनी कसलंही सविस्तर उत्तर आंदोलकांना दिलं नाही. फक्त आश्वासन दिलं, की दुरुपयोग होणार नाही. पण नेमका कसा तो टाळला जाईल, हे न आंदोलकांना कळलं, न कोर्टाला. कोर्टाने त्या नियमाची अंमलबजावणी रोखली.

राजकीय हस्तक्षेपातून दबून जाऊन NCERT ने मराठ्यांच्या साम्राज्याचा नकाशा ऐतिहासिक तथ्यांच्या विरोधात जाऊन बदलला. याविरोधात अनेक मराठा सरदारांच्या वंशजांनी आंदोलन केलं. पण धर्मेंद्र प्रधानांना त्याचीही कसलीही दखल घ्यावीशी वाटली नाही. 

12वी च्या परीक्षाचा निकाल लावण्याचा घोटाळा घडला, आधीच गैरव्यवहार केलेल्या कंपनीला कंत्राट मिळालं, सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांच्या निकालात चुका आढळल्या, आणि कहर म्हणजे एका बारावीच्या विद्यार्थ्याने याची पोलखोल केली! हे सगळं घडत असताना मंत्री महोदय झोपा तर काढत होतेच, वरुन त्या विद्यार्थ्याला पण नरेटिव्ह वगैरे बोलून IT सेल ने टीका केली. ही राक्षसी वृत्ती आणि सत्तेचा माज नसेल तर आणखी काय आहे? 12वी चा विद्यार्थी ज्याच्या निकालात चुका आहेत आणि त्याने एक ब्लॉग लिहिलाय, तो विरोधी पक्षाचा माणूस ठरतो का? 

नीट च्या परीक्षेचा पेपर फुटला, नेट परीक्षेचा पेपर फुटला. हे नेमकं चाललय काय? पंतप्रधान नरेंद्र मोदीना त्यात हस्तक्षेप करावा लागला याहून मोठी शोकांतिका काय असू शकते? ह्या सर्व प्रकरणात अकार्यक्षम मंत्री शिक्षण खात्याला मिळाला आहे हीच एक गोष्ट वारंवार समोर येत आहे. मी सांगितलेल्या घटना या अनेक महिन्यांपासून घडत आहेत. त्याविरोधात कोणताही हिंदुत्ववादी मला आंदोलन करताना दिसला नाही. अगदी मराठा साम्राज्याचा नकाशा बद्दलल्यावर आंदोलन करतानाही कोणी विशेष समर्थन केलं नाही. ते तर हिंदुत्ववादीच आंदोलनाला बसले होते. जनरल प्रवर्गातील अंदोलन करणारे पालक सुद्धा प्रामुख्याने हिंदुत्ववादीच होते. आणि ज्यांना पेपरफुटीचा त्रास झाला त्यातही हिंदू विद्यार्थी होतेच. तरीही माझ्यासह सर्व भाजप समर्थकांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. राग मनात ठेवला. काहींना तर राग आलाच नाही (ते धन्य आहेत, त्यांनी हा लेखही वाचू नये. जय मोदी जय भाजप) 

आता धर्मेंद्र प्रधान हा मंत्री त्या पदासाठी योग्य नाही, हे ठामपणे सांगणारा एकही आवाज नसताना सोनम वांगचुकने ते काम केलं. कॉक्रोच पार्टी ही बोगस संकल्पना त्याने स्टेज म्हणून वापरली. त्या स्टेजवर अनेक डाव्या विचारांचे आणि हिंदूविरोधी लोक येऊन भाषण करून जात आहेत. हे सर्व सत्य आहे. त्यांना समर्थन देण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्याचसाठी मोदी सरकार सत्तेत बसवलं होतं ना? जेव्हा डाव्यांनी समर्थन दिलं नाही, तेव्हा 2 आंदोलनं फसली आहेत. मग सरकारच्या कानात आवाज पोहोचवण्यासाठी दुसरा कोणता पर्याय उरला आहे का? सोनम वांगचुकने पूर्वी घेतलेल्या चीनविरोधी भूमिका, कलम 370 ला विरोध करणं, काश्मीर च्या विभाजनाची मागणी करनं हे सगळं डाव्यांना तेव्हा पटलेलं नव्हतं, पण तरीही आज ते वांगचुकला समर्थन करतच आहेत ना? मग देशाच्या हितासाठी आणि शिक्षण क्षेत्रात जबाबदारी घेण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी का पुढे येऊ नये? डावे लोक समर्थन करत आहेत म्हणून मी समर्थन करणार नाही यासारखा विचित्र तर्क पुढे केला जातोय. हा तर्क तेव्हा का नाही आला जेव्हा भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलेल्या भुजबळ यांनी भाजपला पाठिंबा दिला? तेव्हा का अशी भूमिका नाही आली की भ्रष्ट नेते ज्या भाजपला पाठिंबा देत आहेत त्यांना निवडणुकीत हरवू! हे तेव्हा का सुचलं नसेल? कुणाल कामराने स्टेजवरून रामाचा अपमान केला तसा भुजबळ यांनी सुद्धा सरस्वतिचा अपमान केलाच होता ना? तेव्हा का प्रखर धर्मनिष्ठा उफाळून आली नसेल बरं? कारण ही धर्मनिष्ठा नसून पक्ष निष्ठा होती. भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग करणारे शरद पवार आज मोदींची स्तुती करत आहेत. मग त्यामुळे मोदींना विरोध करायचा का? नाही ना! मग डाव्यांनी समर्थन केलं म्हणून वांगचूक चा विरोध का करता?

त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला पाहिजे, या मागणीला जे जे समर्थन करत असतील त्यांनी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे. आणि यासाठी कोक्रोच पार्टीनेही आंदोलनासोबत चालवलेला हिंदूविरोध बंद केला पाहिजे. हे अंदोलन यशस्वी व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आंदोलकांना हार्दिक शुभेच्छा! 

एखादा मंत्री सातत्याने अपयशी ठरत असेल, तर त्याच्यावर टीका करणे हे सरकारविरोधी किंवा देशविरोधी नसून उत्तरदायित्वाची मागणी आहे. व्यक्ती कोणत्याही विचारसरणीची असो, योग्य मागणीला योग्य वेळी पाठिंबा देणे हेच लोकशाहीचे लक्षण आहे.

- प्रथम उवाच   

Post a Comment

0 Comments