मराठमुघलांपासून मराठी संस्कृती वाचवा!


"मला तुझं मत पटलं नाही रे, निघ बिहारला"

"ए मराठी भैय्या, एवढा का त्या यूपी वाल्यांचा पुळका येतो तुला?"

"छठ पूजा तिकडे बिहारला जाऊन करायची, इथे तसली घाण नको"

असे अनेक मेसेज आणि कंमेंट यांचा भडिमार झाल्यावर मी ठरवलं, की आता या विषयावर व्यक्त झालंच पाहिजे. कधी उत्तर भारतीय, कधी दक्षिण भारतीय, तर कधी मारवाडी/राजस्थानी/गुजराती/जैन कोणी न कोणी शोधून तिरस्कार करणारा एक जंगली समुदाय महाराष्ट्रात तयार होतोय. तसाच मराठी माणसाचा तिरस्कार करणारा एक समूह महाराष्ट्राबाहेर तयार होतोय. दोघांचीही मनस्थिती सांगण्याचा हा एक प्रयत्न.

एका मारवाडी माणसाने मराठीचा अपमान केला, मग सगळ्या मारवाड्यांचा हे तिरस्कार करणार. एखाद्या गुजराती सोसायटीच्या बाहेर मराठी नको अशी पाटी लागली, तर हे सगळ्या गुजरात्यांना त्याच सोसायटीचे रहिवासी असल्यासारखं वागवणार. लोकलमध्ये कोणत्या बिहाऱ्याने जागा दिली नाही, की सोशल मीडियावर सगळे बिहारी म्हणजे कीड, भिकारी, आणि अजून काय काय बरळणार. एखाद्या मराठी माणसाने या अमर्याद द्वेषाबद्दल जरासं काही बोललं की लगेच त्याला मराठी भैय्या म्हणणार. ही सर्व लक्षणे असणाऱ्यांना मराठमुघल म्हंटले पाहिजे.

हे मराठमुघल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे वगैरे लोकांचं नाव घेत असतात, पण त्यांना ह्या दोघांचे विचार मात्र अजिबातच माहीत नसतात.

यूपी, बिहार, व इतर ठिकाणाहून स्थलांतर का होते?

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यात भरपूर प्रमाणात औद्योगिक विकास झालेला असल्याने रोजगाराच्या शोधत या ठिकाणी लोक येतात. स्वतःच्या राज्यात नसलेल्या सुविधा व संधीचा लाभ घेऊन पोट भरतात, स्वतःची व कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारतात. या सर्व प्रक्रियेत बेकायदेशीर काहीही नसून प्रगत राज्यातील लोक सुद्धा अशी संधी मिळाली की स्थलांतर करतात. हे स्थलांतर विदर्भातून पुण्यात, मराठवाड्यातून मुंबईत, किंवा पुण्यातून बंगळूर, मुंबईतून नोएडा, हैदराबाद अशा प्रकारचंही असू शकतं. हा स्थलांतरित लोकांचा समूह त्या त्या प्रदेशात तिरस्काराचा धनी ठरतो, कारण त्याच्या आधी स्थलांतरित झालेले स्वतःला मूलनिवासी समजायला लागतात. 

स्थलांतरीत लोकांकडून असणाऱ्या अपेक्षा 

जगातील सर्व ठिकाणी स्थलांतरित लोकच राहत आहेत. मानवतेचं मूळ आफ्रिकेत आहे. आपल्या सगळ्यांचे पूर्वज कुठून कुठेतरी स्थलांतरितच होत आले आहेत. मग याचा अर्थ देश, राज्य, भाषा यांना काहीच अर्थ नाही का? आहे. कारण एकदा स्थलांतरीत झाल्यानंतर अनेक वर्षे राहून प्रत्येक ठिकाणच्या लोकांची एक वेगळी राहण्याची, बोलण्याची आणि विचार करण्याची पद्धत तयार होते. त्यालाच आपण संस्कृती म्हणतो. जेव्हा या संस्कृतीच्या बाहेरचा व्यक्ती, मग तो थोडासा बाहेरचा असो (पुणेकरांसाठी कोल्हापूरचा माणूस थोडासा बाहेरचा) किंवा पूर्ण बाहेरचा असो (उदा. बिहार/नागालँड वगैरे) त्याला सामावून घेताना जड जाते. 

जो बाहेरून आलाय, त्याला अन्न, भाषा, सामाजिक मानसिकता यात तफावत आढळते. त्याच्या जन्मभूमीच्या या गोष्टी त्याला प्रिय असतात. नवीन ठिकाणचा रोजगार/ विकास/ संधी प्रिय असतात. मग काय सोडायचं आणि काय धरून ठेवायचं हा प्रश्न त्याला पडतो. 

तसेच जे स्थानिक आहेत, त्यांना स्वस्त आणि skilled labour ची गरज असते. ती गरज हे स्थलांतरित भागवतात. पण त्यांच्या अनेक सवयी, सांस्कृतिक मतभिन्नता या सगळ्यांचा त्यांना कदाचित त्रास होऊ शकतो. उदा. 25 ते 30 वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या लोकांची एक संस्कृती होती. त्यात रात्री उशिरापर्यंत बाहेर न फिरणे, नाटक वगैरेंचा आस्वाद घेणे, कला साहित्य वगैरे जोपासणे आणि निवांत आयुष्य जगणे. पण नवीन स्वातंत्र्याचा आस्वाद घेण्यासाठी उतावीळ तरुण त्यांच्या वस्तीत रात्री गाडीवर धिंगाणा करत फिरताना पाहून, किंवा व्यसनाधीन झालेले पाहून त्यांना ह्या गटाबद्दल तिरस्कार वाटायला लागतो. हीच गोष्ट पुण्यातून विदेशात गेलेल्या लोकांनाही सहन करावी लागते. कारण गणेशोत्सव, दसरा दिवाळी हे सगळं सुद्धा एक उन्माद आणि थिल्लरपणा आहे असं समजणारा एक समुदाय त्या देशात राहत असतो. 

मग यात नेमकी खरी बाजू कोणाची? दोघांचीही. आपण ज्या ठिकाणी जातो तिथे भेटलेल्या लोकांशी समावेशकतेने वागणे, तिथल्या संस्कृतीबद्दल आदर दाखवणे आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करणे एवढ्या साध्या गोष्टी केल्या तर स्थलांतरित लोकांचं आयुष्य सोपं होऊन जातं. तसेच नवीन आलेल्या लोकांना सहकार्य करणे, आपली सांस्कृतिक मूल्ये शिकवणे व नवीन येणारा व्यक्ती खरोखरच मिळून मिसळून राहण्यासाठी तयार आहे का, याची खात्री करणे हे प्रगत ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे आणि व्यवस्थेचे काम आहे. 

जेव्हा या दोन्ही पैकी एक अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा तिरस्कार वाढतो. अनेकदा स्थलांतरित लोक मिसळण्याचा पूर्ण प्रयत्न करतात; पण तरीही द्वेषाने ग्रासलेले मूळ लोक त्यांच्याबद्दल आकस व पूर्वग्रह मनात ठेवतात. हे कधी वेगळ्या भाषेवरून घडतं, कधी वेगळ्या बोलीवरून तर कधी जातीवरून.

आता थेट मराठी अमराठी मुद्द्यावर येऊ:

यूपी व बिहात ही दोन राज्ये बिमारु (केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेली) होती. त्यापैकी यूपी ची लक्षणीय गतीने प्रगती झालेली असून आता ते राज्य या प्रवर्गातून बाहेर आले आहे. मात्र यूपी मधील व बिहार मधील सर्व लोक तसे झालेले नाहीत. 

नवीन तयार झालेल्या हायवे वरील light घरी घेऊन जाणार, नवीन रस्ता बनताना डांबर फोडून घरासमोर टाकणार, किंवा कचरा बाहेर फेकणार अशा अनेक सवयी तिथे सामान्य समजल्या जातात. महाराष्ट्रातील गावांमधून शहरात आलेल्या लोकांमध्येही या सवयी असूच शकतात. पण बातमी मात्र ठराविक प्रकारचीच चालत असल्यामुळे बिहारी घाणेरडे असतात अशी लोकभावना तयार होते. मग जे लोक हे असं वागत नाहीत, त्यांचाही द्वेष केला जातो. असं होऊ न देण्याची जबाबदारी आपली आहे. 

आपला नेमका प्रॉब्लेम ओळखून तो सोडवणे आणि आंधळा तिरस्कार करणे यातला फरक. 

महाराष्ट्रात येणारे अमराठी लोक मराठी संस्कृतीमध्ये मिसळून गेले, त्यांनी स्वतःची ओळख न सोडता नवी मराठी ओळखही आपलेपणाने स्वीकारली तर बहुतांश लोकांच्या तक्रारी दूर होऊ शकतात. पण काही लोक मुळातच प्रादेशिकतावादी असतात व काहीही केलं तरी त्यांचा तिरस्कार करण्याचा स्वभाव बदलत नाही. अशा मराठमुघलांना सुध्दा आवरण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच आहे. मुळात मराठीवादी लोकांना जे हवं आहे, ते कायदेशीरपणे कोणत्याही पक्षाने मांडलेलं नाही. उदा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात दुकानांच्या पाट्या मराठीत नव्हत्या. अनेकदा मुंबईत फक्त मल्याळम किंवा तमिळ पाट्या दिसत असत. ही एक जेन्यूईन समस्या होती. त्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारने कारवाई करून मराठी नावे अनिवार्य केली असती, तर शिवसैनिकांना तोडफोड करावीच लागली नसती. पण त्या तोडफोडी सारख्या घटना घडल्या, आणि त्या चुकीच्या पद्धतीने मीडियात मांडल्या गेल्या. यातून अमराठी लोकांना शिवसेना म्हणजे गुंड आणि मराठी लोकांना शिवसेना म्हणजे मराठी हक्काचे संरक्षण करणारी अशी ठिणगी पडली. 

अशा अनेक ठिणग्या वेगवेगळ्या प्रकरणात पडत आलेल्या आहेत. नुकतेच माही खान नावाच्या युट्युबरने स्वतः चिथावणीखोर वक्तव्य करून मूळच्या बंगाली महिलेला मराठी बोलणार नाही असं म्हणत दमदाटी केली. पण मराठी संस्कृतीशी एकरूप झालेल्या त्या महिलेने त्याला जे प्रत्युत्तर दिलं, त्याचा त्याने व्हीडिओ बनवला. लाखो लोकांना आता हे वाटलं असणार की मराठी बोला असं म्हणणारे गुंड आहेत. मनसे सारख्या पक्षांनी हे सत्य समोर आणलं, पण जो माफीचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला, त्यात हा पूर्ण घटनाक्रम सांगितला गेला नाही. म्हणजे पूर्वी तयार झालेलं मराठी लोक गुंड असतात हे perception तसंच राहणार. 

या गोष्टी अमराठी लोकांच्या डोक्यात साचत जातात. जेव्हा ते किंवा त्यांच्या घरातील कोणी महाराष्ट्रात येतो, तेव्हा ते प्रत्येक मराठी माणसाला पूर्वग्रहाने बघतात. तसेच मराठी लोकांमध्येही पूर्वग्रह तयार झालेले असतात. मग एखादा पूर्वग्रहग्रस्त मराठी माणूस छठपूजेवर आक्षेप घेतो, तर एखादा पूर्वग्रहग्रस्त गुजराती HR कामावर मराठी लोक नको अशी पोस्ट लिहितो. थोडक्यात, हे वाद सुरूच राहतात. 

इतिहासातून शिका

अशा वादविवादांमुळे देशाचं नुकसान झालं आहे. आणि आजही होत आहे. फाळणीपूर्वी मुंबई सारखं कराची हे प्रगत शहर होतं. तिथे अनेक मराठी लोक रोजगारासाठी जात असत. त्यांच्या मराठी भाषेचा त्रास होऊन सिंध प्रांतात मोठं आंदोलन झालं होतं. मुंबई प्रांतातून सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. पण अवघ्या काही वर्षात तिथे धार्मिक लोकसंख्या समीकरण बदललं, आणि सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. आंदोलन करणाऱ्या सिंधी हिंदू लोकांची पुढची पिढी सुटकेस मध्ये बसेल एवढं समान घेऊन भारतात शरणार्थी म्हणून आली आणि जगली. जे हिंदू सिंधी लोक तिथेच राहिले त्यांच्यावर आजही अत्याचार होत आहेत. 

तिथल्या मुस्लिमांची आणि सिंध प्रांताची भाषा आजही सिंधी आहे. अशी भाषा ज्यांना टिकवायची असेल त्यांनी खुशाल हिंदी भाषेचा आणि लोकांचा तिरस्कार करावा. पण अमराठी हिंदू बहुसंख्य असलेल्या प्रदेशात मराठी माणसांवर कधीही हल्ले झालेले नाहीत हे लक्षात ठेवा. गुजरात मध्ये गायकवाडांची सत्ता होती. त्यामुळे आजही बडोदा व आसपासच्या प्रदेशात मराठी लोक राहतात. हरियाणात पानिपत काळापासून रोड मराठे राहतात तर इंदोर मध्येही होळकरांच्या काळापासून मराठी लोक राहतात व तामिळनाडू मधील तंजावर मध्ये व्यंकोजी राजांच्या काळापासून मराठी लोक राहतात. त्या सर्व ठिकाणी आजही मराठी संस्कृती टिकून आहे, भरपूर सरमिसळ झालेली आहे. पण सिंधी हिंदूंसारखी त्यांच्यावर कधीही परिस्थिती आली नाही. इतर संस्कृतीचा विनाकारण द्वेष करत मीच श्रेष्ठ हा फुकटचा माज मुघलांना आदर्श मानणाऱ्यांचा आहे. 

मराठी व हिंदू संस्कृती एकच असून फक्त भाषा वेगळी आहे.

नेमकं कशाकशातून आपण मराठी वेगळे काढणार आहोत? 

महाराष्ट्रात शेकडो मंदिरं उध्वस्त झालेली असताना महाराजांनी शेवटच्या क्षणी काशीचा विश्वेश्वर सोडवा असं का म्हंटलं? अहिल्याबाई होळकरांनी फक्त मराठी प्रदेशातील घाट बांधले का? गुजरात मधील द्वारकेवर हल्ला झाला आहे हे पंजाब मध्ये जाऊन पंजाबी भाषेत नामदेवांनी का सांगितलं? मध्य प्रदेशातील बुंदेलखंड वाचवण्यासाठी पेशवा बाजीराव जेवणाच्या ताटावरून उठून का धावून गेले? संभाजी महाराजांसोबत अमराठी कवी कलशाने का यातना भोगल्या? शिवछत्रपती आग्र्याहून येताना उत्तर भारतीय ब्राह्मणाने जीवाचा धोका पत्करून कोवळ्या वयातील शंभू राजांना स्वतःच्या घरात का ठेवून घेतलं? गुजरात मधील सोमनाथावर हल्ला झाल्यावर उत्तर प्रदेशातील सुहेलदेव आणि तामिळनाडू मधील चोलांनी प्रतिशोध का घेतला? काश्मिरी हिंदूंवर संकट आल्यावर महाराष्ट्राने त्यांना अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आरक्षण का दिलं? वैष्णोदेवी यात्रेवर दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची धमकी दिल्यावर "मुंबईतून एकही विमान हज ला जाऊ देणार नाही" ही धमकी बाळासाहेब ठाकरे यांनी का दिली? या सर्वांचं कारण एकच आहे. *भाषेपेक्षा आणि मराठी संस्कृती पेक्षा जास्त महत्त्वाची हिंदू संस्कृती आहे*

अमराठी लोक मराठी बोलायला लागावेत अशी इच्छा असेल तर 2 पर्याय आहेत. 

पर्याय 1 : जर्मन, इंग्रजी या भाषांच्या जशा सर्वमान्य परीक्षा असतात, तशी मराठी भाषेची बेसिक ओळख तपासणारी परीक्षा तयार करावी. त्यात पास होणारे लोक ज्या कंपन्या कामावर ठेवतील त्यांना सरकारने सबसिडी द्यावी किंवा टॅक्स कमी करावा. जेव्हा 2 अमराठी लोकांपैकी एकाला मराठी येत असल्यामुळे नोकरी मिळेल तेव्हा अजून 4 लोक ते पाहून मराठी शिकतील. कसलीही सक्ती नसताना जशा जर्मन आणि जपानी भाषांच्या ट्युशन आपल्याकडे तयार झालेल्या आहेत, तशा बिहार मध्येही स्पोकन मराठी कोचिंग सुरू होतील. किंवा बिहारच्या शालेय पाठ्यक्रमात तिसरी भाषा म्हणून मराठी ला स्थान देण्याचा करारही महाराष्ट्र व बिहार सरकारमध्ये होऊ शकतो. याने मराठी भाषिकांची संख्या आणि BA मराठी सारख्या पदवी घेतलेल्या लोकांच्या रोजगार संधी या दोन्ही मधर वाढ होईल. 

पण हा शासकीय पातळीवरचा पर्याय असून न कोणी याची मागणी करतो, न कोणी पूर्तता करतो. हा उपाय प्रॅक्टिकल असून यातून मराठी भाषा वाढते. ही गोष्ट कोणाला नको असून फक्त भावना भडकावून निवडणूक जिंकण्यासाठी मराठी भाषा वापरण्यात राजकीय पक्षांना रस आहे.

पर्याय 2 : Be the change you want. हा वैयक्तिक उपाय आहे. मला वाटतं ना, की अमराठी लोकांनी माझ्या संस्कृतीला मान द्यावा, तर यासाठी कायदा होईल तेव्हा होईल, पण आधी मी त्याच्या संस्कृतीची माहिती घेतली पाहिजे. 

मराठीवादी लोकांना अमराठी इतिहास, भाषा, गाणी इत्यादी बद्दल 5 चांगल्या गोष्टी बोलायला सांगा. त्यांना ते जमणार नाही. मुळात कोणाचा विरोध केला पाहिजे हे सांगता सांगता आपण कोणाशी प्रेमाने वागले पाहिजे हेच आपण विसरलो आहोत. जेव्हा हिंदी भाषा शिकवण्याचा विषय होता, तेव्हा अवधी, ब्रज, भोजपुरी भाषांचा हिंदीने खून केला, हिंदीला रक्ताची चटक लागली वगैरे जोरदार प्रचार केला गेला. मग तुम्ही कधी या समदुखी असलेल्या भोजपुरी, अवधी ब्रज भाषेतील एखादं गाणं ऐकता का? असा प्रश्न विचारल्यावर मात्र शांतता पसरते. हिंदी ला वाईट म्हणताना अवधी अन्यायग्रस्त वाटते, पण सोसायटीच्या मंदिरात अवधी भाषेतील रामचरितमानस लागलं की मराठी संकटात येते. म्हणजे थोडक्यात मराठीच सर्वश्रेष्ठ आणि इतर तुच्छ ही भावना आहे. जशी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तशी मराठी सुद्धा नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नोकरी व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषा आलीच पाहीजे असा कसलाही कायदा नाही. तेव्हा फक्त आपल्याला वाटलं म्हणून त्यांनी मराठी शिकावी असं होणं शक्य नाही. या गोष्टीचा संताप येत असेल तर एकतर कायदा करण्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करा किंवा प्रेमाने मराठीचा प्रचार करा. 

दुसरा उपाय माझ्यासाठी तरी नेहमीच उपयुक्त ठरला आहे. काही दिवसांपूर्वी बंगालमधील एक सेलिब्रिटी वगैरे असलेला प्रसिद्ध सरोद वादक माझ्या मित्राच्या घरी आला होता. तिथे अर्ध्याहून अधिक लोक बंगाली होते. मी त्यांना वंग भंग आंदोलन आणि त्यात बंगाली कवींची मोठी भूमिका वगैरे सांगून रवींद्र संगीतातील एक गाणं ऐकवलं. तसेच लता मंगेशकरांचं "मी डोलकर दर्याचा राजा" हे गाणं त्याच चालीत बंगाली भाषेत "डोल डोल डोल" नावाने प्रसिद्ध आहे हे सांगितलं. मी त्या पूर्ण संवादात कुठेही मराठी बोला असं म्हणालो नव्हतो. पण तिथे असलेल्या प्रत्येक बंगाली व्यक्तीने स्वतःला माहीत असलेली सर्व मराठी स्वतःहून बोलून दाखवली. असं केवळ एक उदाहरण नसून फक्त थोडीशी आपुलकीयुक्त चर्चा करून काशीच्या घाटावर अभंग गायला लावणे, बिहारी मित्रांना धर्मवीर चित्रपट बघायला नेणे, आणि राजस्थान मध्ये 2 घरांमध्ये गणेशोत्सव सुरू करणे, इत्यादी प्रकार दुसरा पर्याय वापरून मी स्वतः केले आहेत. जर देशभरात मराठी संस्कृतीचा आदर already केला जात असेल, तर 2-4 उदाहरण बघून छठपूजेला विरोध सहन करू शकत नाही. त्यापेक्षा स्वतः छठपूजेत सहभागी होऊन त्या लोकांनाही गुढी उभारायला का लावू नये हा प्रश्न पडतो.

पण मराठीचा असा प्रचार करण्यासाठी विनाकारण द्वेष करणे सोडावे लागेल, स्वतः मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा आधी अभ्यास करावा लागेल. शेकडो वर्षांपूर्वी नामदेवांना पंजाबात जाऊन मराठी संस्कृतीचा मान वाढवता आला, आणि आपल्याला महाराष्ट्रात हे काम जमत नसेल, तर आपली पद्धत चुकीची नसू शकते का? जेव्हा एक व्यक्ती मराठीचा द्वेष करतो तेव्हा त्या व्यक्तीला समजेल अशा भाषेत उत्तर देणे वेगळे आणि सरसकट त्या समुदायाचा तिरस्कार करणे वेगळे आहे.

याव्यतिरिक्तही विनाकारण अमराठी हिंदूंचा, त्यांच्या सणांचा तिरस्कार केला गेला तर कसल्याही लेबलची चिंता न करता मी अभिमानाने मराठी भैय्या व्हायला तयार आहे; पण मराठी भाषेला गुंडगिरीचं लेबल लागू देणार नाही💯

जय हिंद जय महाराष्ट्र जय बिहार🗿

✍️प्रथम उवाच

Post a Comment

0 Comments