दिल्ली च्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या ब्लास्ट बद्दल रशिदा बातम्या बघत होती. तेवढ्यात 10 वर्षांचा हुसेन शाळेतून आला आणि अम्मीला म्हणाला
हुसेन : "आपण आतंकवादी आहोत का ग अम्मी? आतंकवादी म्हणजे काय?"
रशिदा जरा गडबडली. हुसेनला शाळेत कोणीतरी आतंकवादी म्हणलं आहे तिला कळलं होतं. पण ती समजावण्याचा स्वरात म्हणली.
रशिदा: नाही रे! आतंकवादी ते लोक असतात जे निष्पाप लोकांना त्रास देतात, घाबरवतात, मारतात, किंवा तसं करण्याला समर्थन करतात.
हुसेन: मग आपण तर असं काहीच करत नाही?
रशिदा: जगात खूप सारे धर्मांध मुसलमान आहेत. त्यांनी "ग्लोबलाईझ द इंतफिदा" नावाची चळवळ सुरू केली आहे. काही ठिकाणी आपले धर्मगुरू, आणि सामान्य लोक सुद्धा त्या दहशतवादी गटांना समर्थन करतात. कुराण मध्येही "Sword verse" सारखे काही अध्याय आहेत, ज्याचा वापर गैरमुस्लिमांचा (काफ़िरांचा) संहार करा असा संदेश देण्यासाठी केला जातो. याला जिहाद म्हणतात. आपल्या धर्माचे खूप लोक याला एकतर लपून समर्थन करतात, आणि काही प्रत्यक्ष सहभागी होतात.
हुसेन: पण तू तर म्हणालीस की आपण अहमदिया आहोत? आणि हे आतंकवादी विचाराचे लोक अहमदिया मुस्लिमांना पण पाकिस्तानात काफिर ठरवून मारत आहेत.
रशिदा: हो. ही चळवळच तिरस्कारावर आधारित आहे. आधी हिंदूंचा तिरस्कार करून स्वतंत्र पाकिस्तान मिळवला. पण तिरस्काराची विशेष गोष्ट ही आहे, की तोवाढत न्यावा लागतो. त्यासाठी नवे नवे टार्गेट शोधावे लागतात. पाकिस्तानात आणि अनेक इस्लामी देशात हिंदू लोकांना फार त्रास दिला. त्यांचा समूळ नाशच जवळपास झाला आहे. पण पुढे काय? पुढे "मोहाजिर"
हुसेन : मोहाजिर? हे काय?
रशिदा : जे मुस्लिम लोक फाळणीच्या वेळी भारतातून पाकिस्तानात गेले, त्यांना मोहाजिर(बाहेरचे) म्हणून त्रास द्यायला, भेदभाव करायला सुरुवात केली गेली. पण नंतर ते mix होऊन गेले.
हुसेन: मग द्वेष थांबला?
रशिदा: नाही रे बाळा... त्यानंतर शिया, अहमदिया, बोहरा हे पंथ मानणारे मुसलमान द्वेषाचे शिकार ठरले. सुन्नी मुसलमान त्या मुस्लिमांना मुस्लिम मानत नाहीत. काफिर मानतात. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात एका मशिदीत बॉम्ब ब्लास्ट झाला, आणि 10-12 वर्षांची लेकरं सुद्धा त्यात मेली.
हुसेन: तू आधी म्हणालीस आपण शिया आहोत. मित्र म्हणत आहेत आतंकवादी आहोत. मग नेमके आपण कोण आहोत?
रशिदा: संधी, chance.
(सॉक्स आणि बेल्ट काढून सोफ्यावर रेंगाळत हुसेन म्हणाला)
हुसेन: एक सांग यार! संधी म्हणजे? डिटेल सांग न ग मम्मा...
रशिदा: म्हणजे आम्ही तुला मदरश्यात न पाठवण्याचा आणि सच्चा मुसलमान वगैरे न बनवण्याचा निर्णय घेतला. तू जेव्हा बोलायला शिकलास ना आठ वर्षांपूर्वी, तेव्हा रामाला चांदीचे बाण अर्पण केले. तुझ्या अब्बूला त्यांच्या लहानपणी पृथ्वी चपटी आहे असं शिकवायचे, पण तू आता कलमांच्या स्पेस मिशनच्या गोष्टी ऐकतोस. त्यामुळे तू संधी आहेस. ज्यांना सगळ्या मुस्लिमांना आतंकवादी ठरवायचं आहे, त्यांच्यासाठी "हिरवी पिलावळ" म्हणण्याची संधी. ज्यांना तुला खरंच आतंकवादी बनवायचं आहे, त्यांच्यासाठी तुझ्यामार्फत जिहाद करण्याची संधी. आणि आपल्या भारतासाठी नवे कलाम घडवण्याची संधी. आता तू ठरवायचं आहेस की तुला कोणती संधी व्हायचं आहे.
हुसेन: मला तर कलाम आवडतात यार... पण मला माझे मित्र आतंकवादीच म्हणत आहेत शाळेत चिडवण्यासाठी. मी कुठे तसा आहे सांग बरं!
(रशिदाला याचं खूप दुःख होत होतं. पण लहानपणी हुसेनला हे सगळं कसं handle करायला सांगायचं या विचारात ती म्हणाली...)
रशिदा : तूच बघ ना, जे जे दहशतवादी असे काम करतात, त्यांची दाढी, कपडे, नावं, आपल्याच सारखे असतात. आधी असं म्हणायचे शिक्षण घेतल्याने लोक सुधारतात, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर, डॉक्टर, केमिस्ट सुद्धा दहशतवादी संघटना join करत आहेत.
हुसेन : म्हणजे तशा लोकांच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना मिळते. मग मी टोपी न घालता खेळायला गेलो तर चालेल का?
रशिदा : फा-इन्न म'अल 'उसरि युसरा (हा कठीण काळही जाईल..)
रशिदा कडे या निरागस प्रश्नांची उत्तरं नव्हती. ज्या अर्थी KK मुहम्मद, आरिफ खान आणि राष्ट्रीय मुस्लिम मंच सारख्या देशभक्त मुस्लिम व्यक्ती आणि संस्था वाढत आहेत त्या अर्थी अशा काही रशिदा नक्कीच आपल्या मुलांना इस्लामिक द्वेषापासून वाचवून सामान्य भारतीय म्हणून वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. जगाच्या एका कोपऱ्यातील युद्ध संपलं, की दुसऱ्या कोपऱ्यात ते सुरू करावंच लागतं. कारण द्वेष वाढवतच ठेवावा लागतो. त्याला वेगळे टार्गेट लागणारच. भारतातही अनेक दहशतवादी कारवाया वाढत आहेत. राजकीय इस्लाम वर इतिहासात औरंगजेब आणि वर्तमानात त्याच्या विचारांवर चालणाऱ्या संघटना यांवर उघडपणे टीका आणि प्रबोधन केलच पाहिजे. पण हे करताना रशिदा आणि हुसेन सारखे माय-लेकरं आपल्याला सोबत घ्यायचे आहेत आणि त्यांची संख्या वाढवायची आहे, कमी करायची नाही.
त्यामुळे जेवढं महत्त्वाचं इस्लामिक दहशतवादाचं स्वरूप समजून घेणं आहे, तेवढंच महत्त्वाचं भारतीय मुस्लिमांना त्यापासून दूर नेणं आहे हे लक्षात ठेवा. विभीषणाला दारं उघडी केल्याशिवाय रावण मारता येत नाही.
ll जिनके कपट दंभ नही माया, तिनके हृदय बसहू रघुराया ll
✍️ प्रथम उवाच
0 Comments