बाळासाहेब पुन्हा होणे नाही.

आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. बाळासाहेब गेल्यापासून 13 वर्षांत महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्यावरून सर्वात मोठा धडा हाच घेतला जाऊ शकतो: बाळासाहेब पुन्हा होणे नाही. 

"मी सुप्रीम कोर्ट मानत नाही", "दंगलीत शिवसैनिकांचा हात नव्हता, पाय होता", इत्यादी भूमिका आजच्या काळात कोणी घेतल्या, तर त्याला ठाम विरोध केला पाहिजे. अवघड आहे, पण पुढे वाचाच.

बाळासाहेबांची पार्श्वभूमी मुळातच वैचारिक व राजकीय होती. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अभ्यास केल्यास आमूलाग्र वैचारिक परिवर्तन या कुटुंबात नवे नाही याचा अंदाज येतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बदललेल्या राजकीय दिशेत आश्चर्य कमी वाटायला लागते. बाळासाहेब ठाकरे यांनीही इंदिरा काँग्रेसला समर्थन देणे, मुस्लिम संघटनांशी युती करणे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मराठीवादी पर्याय होण्याचा प्रयत्न करणे व शेवटी राम मंदिर आंदोलन व नंतरच्या काळात हिंदुत्ववादी भूमिका उघडपणे मांडणे असे अनेक विरोधाभासी निर्णय घेतलेले आहेत. यात अर्थात राजकीय दृष्टीने काहीही चुकीचं नसून काळानुसार तसे निर्णय घेणाराच पक्ष टिकून राहतो. 

परंतु, जेव्हा लोकशाही मार्गाने चालणारं सरकार लोकशाही पाळत नव्हतं, तेव्हा बाळासाहेबांच्या भूमिका लोकांना आपल्याश्या वाटल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पण कारवाई होऊ शकली नाही. मराठी पाट्या, बॉम्बे चं मुंबई करणे, मुंबईतील गॅंग वॉर विरोधातील भूमिका, या सर्व गोष्टी वस्तुतः सेक्युलर सरकारनेच करायला हव्या होत्या. पण ते न झाल्याने लोकांनी लोकशाहीलाच फारसं महत्त्व न देणाऱ्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारलं. स्ट्रीट पावरच्या जोरावर पक्ष वाढत गेला. 

पण अशाप्रकारे तयार झालेल्या नेतृत्वात कितीही प्रतिभा व लोकांच्या समस्यांची जाणीव असली, तरीही व्यक्तिकेंद्रित स्ट्रीट पावर दिर्घकाळात कुचकामी ठरते. हिंदूंच्या हितासाठी स्ट्रीट पावर नक्कीच गरजेची आहे, पण ती व्यक्तिकेंद्रित नसून विचारकेंद्रित असायला हवी. बाळासाहेब जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत शिवसेनेची स्ट्रीट पावर न्याय्य कारणांसाठी वापरली गेली. पण त्यांच्या नंतर?

ठाकरे सरकार आल्यानंतर मुंबईत निवृत्त सैनिकाला बेदम मारहाण झाली, त्याचे केस कापले गेले, कोणाच्या तोंडाला काळं फासलं गेलं, कोण्या पत्रकाराला बेकायदेशीर अटक झाली, महापालिकेने बेकायदेशीरपणे अभिनेत्रिचं घर पाडलं. हे सर्व प्रकार "आमचे साहेब" म्हणत घडले होते. पण हीच स्ट्रीट पावर पालघरमधील साधूंना मॉब लिंचिंग पासून वाचवू शकली नाही. 

बाळासाहेबांच्या काळात ते एक बाहुबली होते. पण असे लोकशाहीला पूर्णपणे न मानणारे बाहुबली लोकशाहीत तेव्हाच चांगले वाटतात, जेव्हा त्यांचे विचार आपल्यासारखे असतात. सुदैवाने बाळासाहेबांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली नाही व त्यांनी कधी नैतिकता सोडली नाही. उद्धव ठाकरेही त्यादिशेने जाण्यासारखे नाहीत. ही हिंदू सांस्कृतिक राजकारणाची achievement च म्हणावी लागेल.

पण समजा जर बाळासाहेबांच्या ताकदीचा नेता, निरंकुश सत्तेत गेला, आणि तो लोकशाहीपेक्षा स्ट्रीट पावर ला जास्त महत्त्व देत असेल तर काय घडू शकतं हे आपण इतिहासात पाहिलं आहे. बिहारमध्ये त्यालाच जंगलराज असं म्हणत असत. समाजवादी आणि जातीय समिकरणातून निरंकुश सत्ता जेव्हा यादव घराण्याची बिहारमध्ये आली, तेव्हा अगदी जिल्हाधिकार्यांच्या बायकोवर सुद्धा अतिप्रसंग करेपर्यंत सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात शिरली. यातून बिहारचा विकास तर लांबच राहिला, पण एक सामाजिक विकृती समाजमनावर बिंबविल्या गेली. ती विकृती अजूनही काढायला अवघडच जात आहे. 

दुर्दैवाने लोकशाहीचे मोठे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांच्या वंशजांनीही तोच मार्ग निवडला आहे. त्यांना सत्ता न मिळताही ज्याप्रमाणे कार्यकर्ते कुठेही जाऊन धुडगूस घालतात, मारहाण करतात, त्यावरून सत्ता मिळाल्यावर काय होईल हे सांगणे कठीण नाही.

मग बिहारमध्ये जंगलराज, आंबेडकरवाद्यांचा बेकायदेशीर धुडगूस आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकवणे यात साम्य जरी परिवरवादाचं आणि स्ट्रीट पावरचं असलं, तरीही 

शिवसेनेचा भगवा आपली नैतिकता सोडत नाही; कारण बाळासाहेब ज्या वातावरणात वाढले ते वातावरण सुसंस्कृत व वैचारिक होतं. पण प्रत्येक स्ट्रीट पावर मधील नेता तसा असेल असं नाही! 

हा विचार औषधासारखा आहे, कडू असला तरी गुणकारी.

लोकशाही मानणारे नेते कितीही वाईट असले, तरी ते जंगलराज आणू शकत नाहीत व ते बदलायला सोपे असतात. मात्र एकदा एक बाहुबली नेता मोठा झाला आणि तो कितीही चांगला असला, आणि तो किंवा त्याची पुढची पिढी वैचारिक दृष्टीने बांधील नसेल, तर त्यांना संपूर्ण सत्ता मिळाल्यावर जंगलराज अटळ असतो

बाळासाहेब हे एक उत्कृष्ट वक्ता होते, चतुर राजकारणी होते,  हिंदुहृदयसम्राट होते, कडवट हिंदुत्ववादी होते, सामान्य कार्यकर्त्यांवर जीव लावणारे होते, पण तरीही आता बाळासाहेब पुन्हा होणे नाही. महाराष्ट्रात आजही सर्व विचारांच्या अशा अनेक संघटना आहेत, ज्या व्यक्तिकेंद्रित आहेत. पण त्या सत्तेवर पूर्ण नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. त्यांची ताकद मर्यादित ठेवणे हे लोकशाही मानणाऱ्या सत्तेतील लोकांचेच काम आहे.

बाळासाहेबांना लोकशाही पूर्णपणे न मानताही लोकमान्यता मिळाली, कारण त्या वेळी लोकांना सेक्युलर सत्तेकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या सपशेल अपूर्ण ठरल्या व विरोधात असूनही बाळासाहेबांना अन्याय थांबवता आला. आजही बंगाल, केरळ व काश्मीर मध्ये जे अत्याचार हिंदूंवर होत आहेत, ते लोकशाहीवादी सत्ताधारी रोखू शकलेले नाहीत. ते वेळीच रोखले जावेत, अन्यथा तिथेही पुन्हा हिंदुत्ववादी बाहुबली तयार होतील, जे विचार केंद्रित नसून व्यक्तिकेंद्रित असतील. हे सर्व टाळले जावे याच हेतूने बाळासाहेबांचे वैचारिक पुण्यस्मरण.

✍️प्रथम उवाच

Post a Comment

0 Comments