बॉम्बेचा मुंबई होण्यापूर्वीचा तो काळ होता. साऊथ बॉम्बे च्या गजबजलेल्या वस्तीत राहणाऱ्या काही पूर्ण शिक्षण न झालेल्या गृहिणी गप्पा मारायच्या.
सासा सुनांचे टिपिकल गाऱ्हाणे, फॅमिली पॉलिटिक्स किंवा "अमुक तमुक वहिनी असंच वागल्या हो ताई!" हे त्यांच्या चर्चेचे विषय नसावेत. त्यांना तळमळ होती स्वावलंबी होण्याची. पण स्वावलंबी होण्यासाठी सरसकट कुटुंब व्यवस्थेला दोष देत सुटणारा त्यांचा फेमिनिझम नव्हता. त्यांना स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक बळ द्यायचं होतं. त्यांच्या पार्टनर वरचा भार कमी करायचा होता.
पण प्रमुख प्रश्न हा होता की पूर्ण शिक्षणही न झालेल्या त्या स्त्रियांनी नेमकं करावं तरी काय? त्यातल्या 7 जणींना वाटलं आपण आपल्याला जे आवडतं, जे परफेक्ट जमतं, त्याचा वापर करून काही व्यवसाय करायला हवा. त्यांनी लवकरच काही पॅकेट भरून कच्चे पापड बनवले. हा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना 50 रुपये एवढं भांडवल लागलं होतं. आणि अशाप्रकारे लिज्जत पापड या ब्रँडची सुरुवात झाली.
ह्या अर्धशिक्षित महिलांच्या ब्रँड ने 45000 महिलांना रोजगार दिला. त्या 7 मैत्रिणींनी निर्माण केलेला हा उद्योग आज गगनभरारी घेतोय, पण आज त्यांपैकी सर्वाधिक काळ जगलेल्या 93 वर्षीय पद्मश्री जसवंतीबेन पोपट आजींचा काल मृत्यू झाला.
भारतीय स्त्रीचं कायम "बिचारी" अशा टाइप चं चित्रण सहसा केलं जातं. याला प्रतिवाद करताना थेट ऐतिहासिक उदाहरणं दिली जातात. मात्र खरोखर ज्यांच्यापासून आज प्रेरणा मिळू शकते अशा महिला अंधारात राहून नाटकी ऍक्टिव्हिजम करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळते. मग अंधारात राहिलेल्या ह्या महान स्त्रियांसाठी आपण एक दिवा माहितीचा लावायला काय हरकत आहे?
"देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा"
या बा.भ. बोरकरांच्या ओळींसह जसवंती बेन यांना नमन🙏
- प्रथमेश चौधरी
0 Comments