पेटण्याच्या तयारीत असेलला: मराठवाडा

विषय फार गंभीर आहे. तटस्थपणे वाचण्याची क्षमता असेल, तरच वाचा. आपल्या जातीचा माणूस नेहमी बरोबरच असतो, असं वाटणाऱ्यांनी पुढे वाचू नये.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न नव्या नव्या वळणांनी complex होत चाललाय. मराठा आरक्षणाच्या रास्त मागणीसाठी ज्या शिस्तीत अराजकीय आंदोलन निघायचे, त्यातून राजकारण करण्यासाठी पुरेसा स्कोप मिळाला नव्हता. मात्र सध्या तो मोठ्या प्रमाणात मिळतोय. 

विशेषतः मराठवाडा, जिथे आर्थिक विकास, साक्षरता तुलनेने कमी आहे, तिथे जातीय वातावरण उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फारच गंभीर आहे. आंदोलक आणि सरकार या दोन्ही घटकांचा तटस्थपणे विचार करा. थोड्या वेळासाठी आंदोलकांनी फडणवीसांवर, आणि पूर्वी भुजबळांवर केलेले आरोप/टीका सत्य मानले, तरीही हे 2 राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्यावर टीका करणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण त्यांच्या राजकारणासाठी ते ज्या जातीचे आहेत, त्या संपूर्ण जातीविरोधात युद्ध पुकारण्याएवढे नीच झालो आहोत का आपण? नाही ना? मग यावर गप्प बसून चालणारच नाही. 

काल आणि आज अनेक मराठवाड्यात राहणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थी असलेल्या मित्रांचे मेसेज आले, फोन आले. त्या सर्वांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. एकाला मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, की भावा कोणत्याच समाजातले सगळे लोक चांगले किंवा वाईट नसतात, काही फ्रिंज एलिमेंट सगळ्याच जातींमध्ये असतात. पण त्यावर त्याने जे व्हीडिओ पाठवले आणि जो प्रश्न विचारला त्याने निरुत्तर होऊन हे लिहीत आहे. खालचा व्हीडिओ पहा

3 मिनिटात "सगळे" ब्राह्मण संपवायची भाषा करणारा हा माणूस मराठवाड्यातल्या एका गावचा सरपंच Unverified चर्चा आहे!! आजूबाजूला असलेले लोक त्याच्या या भयंकर स्टेटमेंट वर एक मराठा लाख मराठा या घोषणा देत आहेत. ही गोष्ट लज्जास्पद नाही? 

(व्हीडिओ) तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवण्याची भाषा करणारा सरपंच

"दादा, जर हे फ्रिन्ज एलिमेंट आहेत, तर बहुसंख्य चांगले मराठे याच्या विरुद्ध का बोलत नाहीयेत रे? मूकसमर्थन नाही का हे? जबाबदार पदावर असलेली व्यक्ती हे बोलतेय. त्याच्या गावात काय वातावरण झालं असेल? " या त्याच्या प्रश्नावर काय उत्तर आहे?

एका नेत्यावर टीका म्हणजे सगळ्या समाजावर टीका नसते, पण जे लोक समाजाचं नाव घेऊन चिथावणी देत आहेत. त्यांच्या विरोधात व्यक्त होऊन त्या घटकांना आंदोलनापासून isolate केलं नाही, तर त्याने आंदोलन चिरडून टाकण्यासाठीच मदत होईल.

काल पर्वा परभणीच्याच एका सरकार समर्थक ओबीसी तरुणावर नांदेडमध्ये हल्ला झाला. हे चित्र पहा. 

चित्रा share करणाऱ्या व्यक्तीची पोस्ट : इथे पहा

लहान मुलाला सुद्धा बेदम मारहाण झाली. मारहाण करणारे स्वतःला मराठे म्हणवत होते असा दावा त्या माणसाने केला. कदाचित हा प्रकार planted असू शकतो, इतर कोणत्या कारणावरून झालेल्या वादाला वेगळं वळण दिलेलंही असू शकतं. पण याचा उपयोग तेढ निर्माण करण्यासाठी फार वेगाने होणार हे मात्र नक्की.

यातून ही गोष्ट स्पष्ट आहे, की काही घटक आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. 3 जिल्ह्यात संचार बंदी लागू असूनही ह्या घटना घडत आहेत. सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट पडत आहेत. यातून दहशत पसरणार नाही तर काय होईल?

मागच्या 2 दशकांपासून जातीयवादी इतिहासाच्या माध्यमातून मराठवाड्यात फार विषारी 'प्रबोधन' झालेलं आहे. माझा संपर्क आणि वास्तव्य महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांसोबत झालेलं असल्याने मी हे फार विश्वासाने सांगू शकतो, की इतर महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात जातीयवाद प्रचंड जास्त आहे. कारण इथे कधी मुद्द्यावर निवडणूक होतच नाही. त्यामुळे ह्या राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या वैचारिक गुंडांचा प्रभाव इथे वाढत गेला आहे. 

जे लोक कोणत्याही जातीविरुद्ध द्वेष पसरवू नका असं आवाहन करतात, त्या मराठ्यांना "भटाळलेला" असले लेबल लावून गप्प केलं जातं. 

ही वेळ फार नाजूक आहे. अनेकांचं हिंदुत्व जातीपुढे निष्फल ठरत आहे. यावेळी बंधुता नष्ट होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मराठे राष्ट्ररक्षक आहेत, दहशतवादी नाही. त्याच बरोबर ब्राह्मणही नासक्या जातीचे नाहीत.

 

आरक्षण मिळवण्यासाठी काही लोकांना सरकार वर विश्वास असेल, तर काही लोकांना आंदोलकांवर. सरकार पूर्वी झालेला लाठीचार्ज थांबवू शकलं नाही हे सरकारचं अपयशच आहे. त्याच बरोबर आंदोलकांच्या "बामणी कावा", "महाराष्ट्र पेटवू", "एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय" या विधानांचा ट्विस्टेड वापर करून फार सहज दंगल होऊ शकते. आंदोलनकर्त्यांची भावना तशी नसेलही, पण ज्यांनी ब्रिगेडी इतिहासाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे फूट पाडण्याची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते परतावा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. याने गालबोटही आंदोलनालाच लागेल.

अशावेळी तुमच्या ब्राह्मण आणि OBC मित्रांना केलेला एखादा फोन, एखादी स्टोरी, साधं स्टेटस की "I stand for Maratha Reservation but I'm not against Brahmins and OBCs" एवढंच जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पुरेसं आहे. ही गोष्ट ब्राह्मण आणि OBC समाजातल्या लोकांनाही लागू होते. जितका जास्त ऐक्य वाढवणारा संवाद घडेल, तितकं हिंदुत्व बळकट होईल आणि राजकारणातून प्लांट केलेला दशकांचा दुरावा नष्ट होईल हे लक्षात ठेवा. 

आपल्या एक-दोन पिढी आधीच्या लोकांनी फार हिंसक महाराष्ट्र पाहिलेला आहे. 

"बजाव टाळी-हटाव माळी" यासारख्या प्रक्षोभक घोषणा ऐकल्या आहेत, जातीय हिंसा पहिली आहे. यापुढे हे होऊ द्यायचं नाही असं मला वाटतं. तुम्ही तयार आहात?

- प्रथम उवाच

Post a Comment

4 Comments

  1. व्हिडीओ कुठे आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य आणि विचार करायलाच हवा यावर

      Delete
  2. अगदी योग्य माहिती 💯⛳

    ReplyDelete
  3. ह्या मताशी सहमत आहे मी पण माराठा आहे
    ते ओबिसी मराठा मराठा ब्राह्मण वाद पेटवतील आपण हिंदू म्हणू एक रहा आपल्याच भावंडाच्या सोबत उभे रहायला पाहिजे

    ReplyDelete