बहीण भावांचं नातं दृढ करणारा भाऊबीज उत्सव आपण सर्वच साजरा करतो. पण ही भाऊबीज जागतिक दृष्टीने सर्व हिंदूंकडे बंधुत्व मागत आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवर वर्णभेदाच्या घटना सातत्याने घडत आहेत. युरोपियन विद्यापीठामधूनही वंशभेद वाढत जातोय. ज्यू आणि हिंदूंच्या विरोधात वाढणारी असहिष्णुता मनाला चटका लावते.
पाकिस्तानातून दररोज न चुकता अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराच्या घटना येतच होत्या, त्यात आता बांग्लादेशची भर पडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्यांनी अत्याचार केले, त्यांना कायद्याने संरक्षण देऊन ज्या हिंदूंनी अहिंसक मोर्चा काढला, त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल होत आहेत.
या सर्वांना हिंदू-बहुसंख्य भारताकडून अपेक्षा आहेत,
पण भारतात आपण जात, भाषा, पंथ, आणि अजून शंभर मुद्द्यांवर विभाजित होत आहोत. फॉरेन पॉलिसी, राष्ट्रवाद, हे सगळं ठीक आहे; पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्या दुःखात आपण सहभाग नोंदवला तरीही त्यांची न्यायाची लढाई सोपी होऊ शकते.
आपल्याकडे अमेरिकेत स्थायिक होणं, किंवा देशाबाहेर जाणं हे अनेक हिंदुत्ववादी घटक चुकीचं समजतात. पण तिथे असलेली लोकसंख्या ही vote bank म्हणून पाहिली जात आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिकन हिंदूंनी बांग्लादेशी हिंदूंसाठी मोर्चे काढल्यावर तिथला राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीसाठी का असेना, पण तो मुद्दा उचलून धरतो. ही शक्ती अभूतपूर्व आहे. काश्मिरी हिंदूंच्या संकटाच्या वेळी हिंदू समाज फार कमकुवत होता, तसा तो आता नाही.
आता फक्त स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या माणसांच्या सोबत उभं राहण्याची गरज आहे. एखाद्याचा द्वेष करणं फार सोपं आहे. एखाद्याची भाषा, शहर, गरिबी, जात, राष्ट्रीयता हे सगळं आपल्याला जसं पटकन दिसतं, तितक्याच सहजपणे समोरच्यातला हिंदू दिसायला हवा. सर्वे भवन्तु सुखिन: म्हणता म्हणता जगाने आपल्याला शेकडो वर्षे लाथांनी तुडवलं आहे. कारण दुबळ्याची सद्भावना जग त्याची भीती समजते.
तेव्हा आधी हिंदु-बंधुत्वाची शक्ती ओळखून मग इतर सर्वांना सुखी ठेवण्याची किमया साध्य करण्याची सुबुद्धी सर्व हिंदु बंधु भगिनींना मिळो.
- प्रथम उवाच
0 Comments